“यशवंतला आम्ही एक पत्र लिहिले होते,” नामदेव म्हणाला.
“कशासंबंधी?” स्वामींनी विचारले.
“यशवंताला आम्ही लिहिले होते की, तू भावापासून वेगळा हो. आणि वाटणीला जे येईल ते घेऊन त्याने अमळनेरला यावे. अमळनेरला त्याने छापखाना काढावा, तुम्ही वर्तमानपत्र काढावे. एखादी पुस्तकमाला काढावी. वगैरे त्याला सुचविले होते,” नामदेव म्हणाला.
“आम्ही छापखान्याचे नावसुद्धा मनांत योजिले आहे. ‘भाऊ छापखाना.’ आपण सगळे भाई, सारे भाऊ. भाऊ हा खानदेशी शब्द आहे. खेड्यापाड्यांत बाया, माणसे ‘भाऊ’ या नावानेच इतरांना संबोधितात. मुद्रणालय वगैरे अगडबंब शब्द नकोत. भाऊ छापखाना. सुटसुटीत नाव. वर्तमानपत्राचे नाव स्वधर्म, आणि पुस्तकमालेचे नाव चैतन्यमाला,” रघुनाथ म्हणाला.
“स्वधर्म हे नाव सुंदर आहे. स्वधर्मात सारे येते. माझा स्वधर्म सर्वव्यापी आहे. माझ्या स्वधर्मात अद्वैत आहे, साम्यवाद आहे, प्रेम आहे, वर्णाश्रम आहे. सारे आहे,” स्वामी म्हणाले.
“यशवंताने लिहिले आहे मी विचार करतो आहे. यशवंताला घरी चैन पडत नाही. तुम्ही त्याच्या जीवनात क्रांति केलेली आहे. ती त्याला स्वस्थ कशी बसू देईल?” रघुनाथ म्हणाला.
“ब-याच घडामोडी तुम्ही करीत आहांत,” स्वामी म्हणाले.
“परंतु सफळ होतील तेव्हा खरे. यशवंत जर येऊन मिळाला तर झपाट्याने काम होईल. विचारप्रसार जोराने होईल. मग तुम्हाला हाताने दैनिक लिहावयास नको,” नामदेव म्हणाला.
“हाताने लिहिल्याशिवाय छापता कसे येईल,” स्वामी हसून म्हणाले.
“पण त्या हस्तलिखिताच्या हजारो प्रती खानदेशांतील खेड्यापाड्यांत जातील, खानदेशातील खेडी उठतील. माझा खानदेश सारा पेटू दे ! माझा खानदेश सारा भडकू दे,” नामदेव म्हणाला.
“कोठे तरी ठिणगी पडू दे. कोठे तरी तेज प्रकट होऊ दे. मग महाराष्ट्रभर वणवा पेटल्याशिवाय राहाणार नाही. जिल्ह्याजिल्ह्याला ज्वाला निघत आहेत, प्रांताप्रांतात घर्षण होत आहे, चैतन्य स्फुरत आहे. सर्व भारतवर्षांत क्रांतीच्या ज्वाला पेटल्याशिवाय राहाणार नाहीत. पारतंत्र्य, जुलूम सारा खाक होईल,” स्वामी म्हणाले.