“नको रडू वेण्ये,” आई सांत्वना करीत होती. जा आई तू जा, किती वेळ बसशील. तू नदीवर जा, वेणू आतां फुकट गेली,” आईला वेणू महणाली. आई उठेना. आईनें वेणूला ओढून पोटाशी धरले. वेणूचे हृद्या भरून आले. “आई येतील का ग डोळे? सांग येतील का ?” वेणूने वर मान करून विचारले.
“येतील गेले तसे येतील. गेलेली पाखरे परत येतील. गेलेली माणसे परत येतील बारा वर्षे वनात गेलेले रामलक्ष्मण परत आले. गलेले परत येते. हरपलेले सापडते वेण्ये ! येतील. तुझे डोळे येतील. एक दिवस येतील. उगी. रडू नको,” आई संबोधीत होती. अमर आशा देत होती.
“आई! तुझे म्हणणे खरे ठरो. तुझी आशा माझी आशा होवो. मी वाट पाहत बसेन. एक दिवस माझे डोळे येतील. उजेड येईल. अंधार जाईल. होय ना आई ? नको ना मी रडू ?” वेणूने विचारले
“नको रडू. मी आहे तो पर्यंत तरी नको रडू ?” मी तुझा हात धरीन. तुझे सारे करीन. उगी बाळ,” आई म्हणाली.
“नाही मी रडणार. आई ! तुला वाईट वाटू देणार नाही. आई, सा-यांची तुला चिंता. तिला सुख नाही. आई! धन्य आहे तुझी,” वेणू म्हणाली.
“आई! आता नवीन काही दिसणार नाही. जुने पाहिलेलेच आठवायचे. तुझे तोंड आठवायचे, भाऊचे तोंड आठवायचे. आता आठवण म्हणजेच डोळे. ही आठवण तरी राहो. भाऊ म्हणे, ‘वेण्ये तुझे डोळे चांगले आहेत.” परंतू ते चांगले डोळे गेले. स्वामी म्हणत, ‘वेण्ये, तुझ्या स्मरणात किती राहते ! तुझी स्मृती चांगली आहे.’ आता डोळ्यांप्रमाणे ती स्मृती न जावो. स्मृतीची दृष्टी तर नष्ट न होवो. आई! आता सा-यांना मी आठवत राहीन, आठवून पाहत राहीन. आठवणींचे माझे राज्य! जा. आई, तू जा. मला सवय होईल. मग मी तुला मदत करीन. डोळे मिटून चालण्याचा मी आभ्यास करीत असे. डोळे मिटून वाळवंटात नदीकाठी हिंडत असे. डोळे मिटून प्रार्थना करीत असे. डोळे मिटून कोणाला तरी बघत असे. डोळे मिटून कातीत असे, डोळे मिटून दळीत असे. देवाने दिलेले डोळे मिटून ठेवण्याचा प्रयत्न करीत असे. म्हणून तर नाही ना तो डोळे देणारा रागवला ? आंधळ्या वेणूला लवकरच सारी सवय होईल. आई तू जा.”
भिकाने रघुनाथला पत्र लिहले. ती सारी करुणकथा त्या पत्रांत त्याने लिहली. आदल्या दिवशीतच वेणूचे गोड पत्र आले होते. रघुनाथ व नामदेव यांनी ते वाचले होते. रघूनाथ मंडईत गेल्यावर नामदेवाने ते काढून कितीदा तरी वाचले होते. आणि आज पुन्हा रघुनाथला दुसरे पत्र आले! देवपूरचे दुसरे पत्र ! रघुनाथने काप-या हातींनी फोडले. बाबांनी तर येऊन नाही ना काही अत्याचार केला, असे त्याच्या मनात आले. पत्र वाचता वाचता रघुनाथचे डोळे भरून आले.
“नामदेव! अरे माझी वेणू आंधळी झाली ! नामदेव, वेणूचे डोळे एकाएकी गेले. नामदेव, वाच ही सारी कथा वाच. वेणू आंधळी झाली ! हाय रे देवा,” रघुनाथ शोक करू लागला.