स्वामी, नामदेव, रघुनाथ नदीवर गेले.
पाणी फार नव्हतें, पोहण्यासारखें नव्हतें
“डोह लांब आहे,” रघुनाथ म्हणाला.
“येथेंच करू आंघोळ,” स्वामी म्हणाले.
“तुम्ही चालून थकला असाल,” नामदेव म्हणाला.
“आणि आपले वादविवाद?” रघुनाथ म्हणाला.
“मला शांतपणे सावकाश बोलताच येत नाही,” स्वामी म्हणाले.
नामदेव व रघुनाथ यांनी एकमेकांच्या पाठी चोळल्या.
“आणि माझीरे चोळील?” स्वामींनी विचारलें.
“तुमची देऊ चोळून?” नामदेवानें विचारलें.
“चोळ. सारा मळ काढ,” स्वामी म्हणाले.
“दगड घेऊं का एक?” नामदेवानें विचारलें.
“दगडानें तर सालेंच काढशील,” स्वामी हंसत म्हणाले.
“आम्ही शेतकरी लोक दगडानेंच अंग घासतों. तोच आमचा साबण.” रघुनाथ म्हणाला.
“आईच्या प्रेमप्रवाहानें गुळगुळीत झालेले दगड. काळेकाळे साबण.” नामदेव म्हणाला.
“बरें दगडानें घास पाठ,” स्वामी म्हणाले.
शेवटी स्नानें झाली.
“येथे दगड नाही का रे धुवायला?” स्वामींनी विचारलें.
“खानदेशांत दगड कमी” नामदेव म्हणाला.
“सारा भुसभुशीतपणा कणखरपणा कोठेंच नाही,” स्वामी म्हणालें.
“परंतु मातीच अशी चिकट असतें कीं, पायाला चिकटली तर लवकर सुटत नाही. काळ्या मातीची ढिपळे दगडापेक्षा टणक होतात. बोटाला पायाच्या लागलें तर रक्त येते. मातीच्या भिंती परंतु अभंग असतात. भरतपूरचा किल्ला मातीचाच होता. पण अजिंक्य होता,” नामदेव म्हणाला.
कपडे धुऊन मंडळी निघाली. घरीं आली. स्वयंपाक तयार झाला होता. केळीनीं पानें होतीं. बोरीच्या कांठी देवपूरला पुष्कळ केळीचे मळे होते. वेणूनें स्वच्छ लोटे भरून ठेविलें.
बाजरीची भाकर व बेसन होते.
“कशी खुसखुशीत आहे भाकरी,” स्वामी म्हणाले.
“माझी आई हातावर भाजते,” रघुनाथ म्हणाला.
“हातावर वर नाही. करीत, हातांत करते,” स्वामी म्हणाले.
“आपण सगळे बोललों, परंतु हे बोलतच नाहीत,” वेणू म्हणाली.
“त्याची मुद्याशी गांठ असतें,” स्वामी म्हणाले.
“म्हणजे बेसनभाकरीशी ना?” वेणूने विचारले.