“आई ! भाऊ कसें छान पत्र लिहितो नाही ? मला येईल का ग लिहायला ? मीं लिहितें हो भाऊला पत्र. लिहूं ? भिकाच्या चिठ्ठीबरोबर माझें पत्र जाईल. लिहूं ?” वेणूनें विचारलें.
“लिही,” आई म्हणाली.
वेणूनें पत्र लिहिलें. किती वेळ तिला लागला. तिनें पूर्वी रघुनाथला पत्रें लिहिलीं होती. परंतु आजच्या इतका वेळ तिला कधीहि लागला नव्हता. हातांत कागद घेऊन घेऊन ती बसली. कोराच कागद पाठवावा असें तिच्या मनांत आलें. त्या विचारानें ती हंसली. कोर्या कागदांत काय लिहिलें आहे याचा शोध भाऊ व नामदेव करीत आहेत, डोळे फाडफाडून पाहात आहेत, कागद उलटा सुलटा करून पाहत आहेत, विस्तवावर धरून पाहात आहेत ! सारें चित्र तिच्या डोळ्यासमोर उभें राहिलें. ती हंसली. पण नंतर रडली. काय लिहूं, कसें लिहूं, किती लिहूं ? तिच्या हृदयाला भावनांच्या भारानें कळा लागूं लागल्या. त्या भावना बाहेर फुटू देत. गाण्यांत उठूं देत, शब्दांत उमटू देत. अश्रूंतून, हास्यांतून बाहेर येऊं देत. वेणू ! गा, हंस, रड, नाच ! परंतु या सार्या क्रिया म्हणजे कांहीं पत्र नव्हे. काय तरी लिहूं मी पत्रांत ?
शेवटी वेणूनें हिय्या केला. पत्र एकट्याला लिहायचें का दोघांना ? काय लिहूं वर मी ? दोघा भावांस नमस्कार असें लिहूं ? दोघे भाऊ ? एक माझा भाऊ आणि दुसरा ? तो कोण, त्याचें माझें काय नातें, कोणतें नातें ? ते भाऊचे भाऊ झाले आहेत. परंतु ते माझे कोण ? शेवटीं तिनें ठरविलें की मोघम लिहावें.
“दोघांना वेणूचे सप्रेम नमस्कार.”
एकच ओळ ! एकच गद्यकाव्याचा चरण ! हृदयांतील तानसिंधूतील ती एक अस्पष्ट तान होती ! हृदयातील अनंत सारस्वतांतील ते अल्पदर्शन होतें ! वेणू त्या ओळीकडे पाहात राहिली. शब्दांकडे पाहात राहिली. त्यांतील अनंत अर्थाकडे पाहूं लागली ! त्या मोघम ‘दोघांना’ या शब्दांत केवढा भाव होता, केवढे मनोरथ होते, बुड्या होत्या ! शेवटी पत्र पुढें सुरू झालें.
“मी काय लिहूं ? मला काहीं लिहीता येत नाहीं. तुम्ही पुन्हां आलेत म्हणजे मी भाकर देईन, काय काय तरी देईन. सारे देईन. त्यांना शिकवीन भाकर भाजायला. कंदिलावर त्यांचा हात भाजला होता. तव्यावर हात भाजेल हो. त्यांना भाकर नको भाजूं देऊं. तू भाकर भाज व ते बांसरी वाजवतील. तुझें मन रमेल. आज किं नाहीं येथें एक किनरीवाला आला होता. कसें वाजवी, कसें गाणें म्हणे ! तो आपल्या अंगणांत किती वेळ वाजवत होता. आई म्हणाली, ‘जा रे आतां. तुला द्यायला कांहीं नाहीं.’ तो म्हणाला, ‘मला कांहीं नको. या पोरीचे डोळे पाहिले. हिरे मिळाले, माणिकमोतीं मिळालीं मला. पोरीच्या डोळ्यांना जपा बरें, आई.’ आई त्याच्यावर रागावली. तो गेला. त्यानंतर गांवांत त्यानें गाणें म्हटलें नाहीं, किनरी वाजवली नाहीं. गांवाला नमस्कार करून गेला असें मुलें म्हणालीं. म्हातारा किनरीवाला !