“काय रे नामदेव, बाहेरसा फे-या घालीत आहेत? स्वामी गेले की काय?” एकानें प्रश्न विचारला.

“ते आंत झोंपले आहेत,” नामदेव म्हणाला.

“जेवण वगैरे झालें वाटते?” त्यांनी विचारलें.

“नाहीं. खिचडी होत आहे. ते घोंगडीवर पडले. झोंप लागली. काल रात्रीचें जागरण होतें,” नामदेव म्हणाला.

“आम्ही सहज आलों होतो. म्हटलें कांही बोलू,” नारायण म्हणाला.

“बोला ना. आम्हाला पण ऐकायला सांपडेल,” नामदेव म्हणाला.

“अरे तुम्ही तर किती वर्षे ऐकत आहात,” गोविंद म्हणाला.

“ऐकण्यापेक्षा पाहात आहोत. स्वामींचे रोजचे निरलस, प्रेममय व त्यागमय जीवन पाहाणे म्हणजेच शिक्षण. मी प्रश्न असे त्यांना कधीच विचारले नाहीत. कोणी विचारले तर ते काय उत्तर देतात ते मात्र ऐकतो. परंतु  त्यांच्या मुक्या प्रवचनांनीच माझ्या शंका नाहीशा होत असतात. गाईला ढुशा देणारा वत्स भेटला तर तिला अधिकच पान्हा फुटतो. तुम्ही द्या ढुशा,” नामदेव म्हणाला.

“नामदेव, चल रे,” रघुनाथ म्हणाला.

स्वामीही जागे झाले.

“नमस्कार !” त्या मुलांनी अभिनादन केले.

“बसा,” स्वामी प्रेमाने म्हणाले.

जेवण सुरू झाले व मधून प्रश्नोत्तरे चालली होती.

“आपले मिश्रविवाहासंबंधी काय मत आहे?” एका मुलाने प्रश्न विचारला.

“आज सारे एकप्रकारे मिश्र विवाहच होत आहेत. जातीय  विवाहाच्या नावांवर मिश्रविवाह होत आहेत, परंतु आजच्या विवाहांना काय म्हणावे हेच मला समजत नाही,” स्वामी म्हणाले.

“म्हणजे काय? आम्हाला नाट समजले नाही,” नारायण म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel