म्हणून गोपाळरावांच्या तोंडून चांगला शब्द फारसा बाहेर पडत नसे. गोपाळरावाच्या तोंडून ‘चांगले’ म्हणवून घेणें म्हणजे ती कसोटी होती. गोपाळरावांनी ज्याला चांगले म्हटलें, त्या माणसाच्या अंगावर मूठभर मांस पढे. कांहीतरी दुर्मिळ वस्तु आपण मिळविली असें त्या माणसास वाटे.

गांवांत वाड्मय मंडळ म्हणून एक संस्था होती. शिक्षक, वकील, व्यापारी या संस्थेचे सभासद होते. त्या तिन्ही वर्गांतील लोकांना एकत्र आणणारें तें मंडळ होते. निरनिराळे लोक निबंध वाचीत. अल्पोहाराची पाळीपाळीनें व्यवस्था ठेवण्यात येई. निबंधावर चर्चा होत असे. या मंडळातर्फे कधींकधी गायनाचे, वादनाचे कार्यक्रमहि होत. गायनाचार्य मित्र म्हणून, ‘गाणें हाच आमचा निबंध. दुसरा कोणता निबंध आम्ही वाचू?” सतार उत्कृष्ट वाजविणारे एक शिक्षक म्हणत, ‘एक दिवस मी सतार वाजवीन. माझ तोच निबंध समजा.’

एके दिवशीं गोपाळरावांच्या पाठीमागे मंडळी लागली. गोपाळराव म्हणाले, “माझा निंबध तुम्हांला आवडणार नाही.”
“आवडेल, आवडेल. तुम्ही लिहा तर खरा,” मंडळी म्हणाली.

“ऐका माझा निबंध. तीन हात खोल दोन हात लांब, दीड हात रुंद असा एक खळगा खणावयाचा व त्यांत एक झाड लावून त्याला पाणी घालावयचें हा माझा एक निबंध. छात्रालयाच्या आवारांतील किंवा शाळागृहाच्या सभोवतालची सारी घाण उचलून जाळून टाकणें, हा दुसरा निबंध. छात्रालयाच्या इमारतींवरील कौलें चाळणें, हा तिसरा निबंध. ‘छात्रालयाच्या म्हशी धुणें, हा माझा चौथा निबंध, छात्रालयाचे गडी संप करतील तर भांडी घासणें व आचारी संप करती तर स्वयंपाक करणें, हा माझा पाचवा निबंध,” गोपाळराव भराभर निंबध वाचू लागले.

गोपाळरावांना लिहिणे आवडत नसे. एखादें नवीन पुस्तक त्यांच्याजवळ नेलें तर ते म्हणत, ‘या पुस्तकावर किती कप चहा होईल? या, तें जाळू.’ गोपाळरावांची अशी वृत्ति कां बरें झाली होती?

देशांत गो्ष्टीवेल्हाळ लोक फार. भराभर भाराभर लिहितील व खंडीभर बोलतील; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या नांवाने शून्याकर. देशांत बोलणा-याचा व लिहिणा-यांचा सुकाळ झाला आहे. प्रेमाच्या कथा व प्रेमाच्या कविता परंतु जीवनाची काव्यें सर्वांची रडकी व भिकार! जीवन हेंच महाकाव्य आहे परंतु हे लक्ष्यांत कोण घेतो? जीवनांत त्याग नाही, यज्ञ नाही, संयम नाही, विवेक नाही, सेवा नाही, प्रेम नाही, सहकार्य नाही, उदार ज्ञान नाही! आणि ग्रथनिष्पत्ति करतात! ज्यांची जीवनें मेलेलीं आहेत ते काय उठवणार? भराभरा साहित्याचे आचार्य व साहित्याचे सम्राट निर्माण होत आहेत. परंतु किती जीवनांत त्यांनी क्रांति केली, किती जावनात चैतन्य ओतलें, किती लोकांस दिव्य अमर स्फूर्ति दिली, किती जणांस कर्तव्यासाठी खेचून आणलें, किती जणास दीनदरिद्रि देशासाठी मरावयास उठविले? गुलगुल गोष्टी करणारे, व्रात्य विनोद करणारे, गुळमुळीत लिहिणारे- असे लोक का राष्ट्र तयार करतात? पलंगपंडित बनून, चुलीजवळ चहाबिस्किटें खातखात स्वातंत्र्याची काव्यें कोणाला लिहिता येतील? सरकारची नोकरी करणारे हृदयाला पीळ पाडणारी देशभक्तीची कादंबरी काय लिहिणार? स्वत:च्या देशबांधवांस फांसावर चढवून शिवाजीची आग्रयाहून सुटका पुस्तक लिहिणा-याच्या आम्ही मानसन्मान करतों. धिक् आमचे जीवन, धिक् पुरुषार्थ, धिक् स्वाभिमान!

मनांत ध्येय नाही, कृतीत तळमळ नाही, जीवन पेटलेले नाही, स्वदेशाचा गंध नाही, स्वदेशाची आचारांत स्मृति नाही, ज्यांना फक्त लिहावयाचे वेळी पुस्तक खपावें म्हमून देशाची आठवण येते त्यांचें लिखाण का मेलेल्या मुर्द्यांना खडबडून उठवील? भाडोत्री लेखक, पैसे मिळवू लेखक-गोपाळ रावांना या सर्व गोष्टींची चीड येई. प्रेम, सेवा वगैरे शब्दांची ते टर उडवीत. कोणी रडू लागला म्हणजे त्यांना हंसूं येई. जगांत खरा अश्रू दुर्मिळ आहे असें ते म्हणत. एखादा मित्र परगांवी जाऊ लागला म्हणजे गोपाळराव त्याला म्हणत, ‘पावशेर रडून दाखवू का रे? नाहीतर मी प्रेमशून्य ठरावयाचा या प्रेमपूर्ण जगात! ‘मी वाटेल तेव्हां व वाटेल तितकें रडून दाखवीन, पैज मारा,’ असें ते म्हणावयाचे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel