“आई ! मी तरी कोठे जाऊ, कोठे शोधू? माझी का कोठे ओळकदेख आहे ? मीही अजून व्यवहारात लहाना आहे. मामा असते तर त्यांनी केले असते सारे. परंतु तेही गेले. होईल तेसे होईल. आणखी एक दोन वर्षे राहू दे ताशीच. माझे शिक्षण पुरे झाले म्हणजे मग पाहिन,” रघुनाथ म्हणाला.
“अरे मग मोठी झाली म्हणून कोणी करणार नाही. रघुनाथ ! तुला चिंता वाटत नाही, परंतु मला चैन पडत नाही. एकदां वेणूचे लग्ना झाले म्हणजे मी मोकळी झाले,” आई म्हणाली.
“आई ! माझे सुद्धा अभ्यासात लक्ष नसते हो. बाबा मध्ये आले व तुला मारीत मारीत त्यांनी तुला घरांतून बाहेर ओढीत आणले, वेणू कशी मध्ये पडली व तिच्याही कानशिलात त्यांनी कशी भडकावली-सारी हकीकत भिकाने मला कळवली होती. मी रडलो. रड रड रडलो. नामदेवाला माहितहि नाही. माझे तोंड उतरून गेले होते. मी एकटाच रात्री बाहेर हिंडत होतो. मला सारी काळजी आहे. परंतु मी काय करू ? वेणूला कोणाच्या गळ्यात का बांधायची आहे ? किती गोड आहे वेणू ! कशी बोलते, कशी हसते ! तिला गाणी किती येतात, वाचते किती छान ! तिच्या लक्षातही कसे राहते ! वेणू म्हणजे रत्न आहे,” रघुनाथ म्हणाला.
“अरे पण उकिरड्यावरच्या रत्नाला विचारतो कोण? गावातील बाया मला विचारतात मी काय बोलणार?” आई म्हणाली.
“देव सारे बरे करील. नाही तर आश्रमाशी लावू लग्न,” रघुनाथ म्हणाला.
“असे रे काय बोलतोस?’ आई म्हणाली.
इतक्यात वेणू आली.
“काय रे भाऊ बोलता? तू केंव्हा परत जाणार?” वेणूने विचारले.
“आठ दिवसांना रघुनाथ म्हणाला.
“मला ते पुस्तक पाठव हो. भारतीय स्त्रीरत्ने,’” वेणू म्हणाली.
“एक तू रत्न !” रघुनाथ हसत म्हणाला.
“आणि तू हिरा!” वेणू म्हणाली.