“यंत्रांमुळे जीवनांतील काव्य कमी होईल असे मला वाटते. मनुष्याच्याभोवती वाफेचा नांगर, शिवण्याचे यंत्र, सायकल, मोटार अशी सारी निर्जीव यंत्रे जमा केल्यावर घोडा, बैल वगैरेंची आपणांस जरूरच नाही. परंतु माझ्याभोवती घोडा आहे, माझा बैल माझ्याजवळ आहे—असे माझे चित्र असावे असे मला वाटते. घोड्याला मी खाजविले की, घोडा प्रेमाने फुरफुरतो, बैल माझा आवाज ओळखतो. माझ्या प्रेमाला त्यांच्याकडून उत्तर मिळते. मी सायकलला कितीहि खाजवले, कुरवाळले तर सायकल का मला चाटील? वाफेचा नांगर का मला पाहून नाचेल? प्रेमाच्या संबंधाने माणसे व पशु एकत्र सहकार्याने नांदत आहे—हे दर्शन मला पवित्र व पावन वाटते.” स्वामी म्हणाले.

“तुम्हाला काव्य दिसते, पण मला गुलामगिरी दिसते. मोटेला तासनतास जुंपलेला बैल मानवाला धन्यवादच देत असेल नाही? बैलाला बोटबोट आरा टोचतात, त्याच्या अंगाची चाळण करतात हे काव्यच नाही का? बैलगाडीत कधीहि बसावेसे मला वाटत नाही. तुम्ही प्रेमाचे पोवाडे गाणारे लोक बैलास फटके मारीत व आरा टोचीत खुशाल जाता, आणि पुन्हा त्याला काव्य म्हणता? माझ्या अंगणांतील दाणे खायला चिमणी येईल व उडून जाईल. तिला पिंजरा ठेवण्याची काय जरूरी? गायीगुरे राहू देत रानांत. भोगू दे स्वातंत्र्य. आपण हरणे उड्या मारताना पाहातो, त्याप्रमाणे दुरून गायीगुरांना पाहू,” नारायण म्हणाला.

“तुम्हाला गायीगुरांचे प्रेमाचे संबंध दिसत नाहीत का?” स्वामींनी विचारले.

“गुलामहि काही स्वामिनिष्ठ असतात. परंतु तेवढ्यावरून गुलामगिरीची पद्धति राहावी असे का म्हणाल? एखादा घोडा मालकासाठी मेला, एखादा कुत्रा प्रेमाने मेला, एखादे मांजर प्रेमाने मेले, परंतु तेवढ्यावरून त्या प्राण्याची गुलामगिरी क्षम्य ठरत नाही,” नारायण म्हणाला.

“आणि सायकलला पुसल्यावर सायकलहि आम्हांला धन्यवाद देत नसेल कशावरून? चैतन्य सर्वत्र आहेना” नामदेवाने विचारले.

“जाऊ दे. हे पाहा, तुम्हांला यंत्रे हवी असली तरी आज काही निर्माण करता येत नाहीत. स्वराज्य मिळाल्यावर यंत्रे आणावयाची की चरखे वाढवावयाचे हा प्रश्न उभा राहील. तोपर्यंत आपण आपल्या विचारांचा प्रचार करीत राहू. लोकांना वाटले की यंत्रे हवीत, यंत्रे आणली जातील. लोकांना वाटले ग्रामोद्योग हवा तर त्याची तजवीज करू. आधी स्वराज्य मिळवू या.” स्वामी म्हणाले.

“परंतु या खादीच्या वगैरे अटी आम्हाला भोंवतात ना?” एकजण म्हणाला.

“गरीब लोकांना त्यामुळे थोडासा आधार देता आला तर का न द्या?” स्वामी म्हणाले.

“लोकांना असा आणा अर्धा आणा मिळू लागला, त्यांना थोडे खायला मिळू लागले तर ते समाधानी होतील व क्रांतीसाठी उठणार नाहीत. क्रांतीची भूमिका लवकर तयार करावयाची असेल तर असंतोष हवा,” नारायण म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel