“माझे डोळे ! तुम्ही सारे गेलेत नी माझे डोळे सारखे गळत होते. पाणी खिळेना. जसें आकाश भरून येतें, तसें झालें होतें. कां रे असें होतें ? त्यांना का वाईट वाटत होते ? सारखे तुम्ही त्यांना समोर हवे होतेत का ? तुम्ही गेलेत व त्यांचा आनंद जणूं गेला. हा आनंद त्यांना परत केव्हां मिळेल ? असे रडून रडून, गळून गळून नाहीं तर डोळे आपले जायचे. हो, माझ्याजवळून तुमच्याकडे यायचे !
“आई बरी आहे. तिला माझी आहे काळजी. परंतु मी तर पांखरासारखी डोळे मिटून गाणी गुणगुणतें, घरांत नाचतें, हसतें ! त्या दिवशी केसुअप्पा एकदम आले तों मी घरांत नाचत होतें ! ‘वेण्ये ! अग वेड तर नाहीं लागलें पोरी तुला ?’ ते म्हणाले. मी म्हटलें, ‘मला पाखरू होऊ दे. उंच उंच आकाशांतील तार्यांकडे उडून जाऊ दे.’ ते हसले.
“मी दैनिके वाचतें. पुष्कळ वाचीन. वेणू चांगली होईल. मला पत्र पाठवा. वेडी वेणू.”
वेणूनें पत्र कितीदा तरी वाचलें. तिला तें आवडलें. ‘कसें लिहिता आलें मला पत्र ! आवडेल, त्या दोघांना आवडेल ! वेणूचे पत्र दोघांना आवडेल !’
“वेणू ! तुला कांहीं द्यायचे आहे का लिहून ?” भिकानें येऊन विचारलें.
“हो. हें बघ लिहून ठेवलें आहे. थांब, घडी करतें नीट.” असें म्हणून वेणूनें घडी करून तें पत्र भिकाजवळ दिलें. भिका गेला.
‘उद्यां त्यांना मिळेल ! इकडचें पत्र, भाऊ म्हणाला, दुपारी चार वाजतां मिळतें. कॉलेजमधून येतील तों वेणूचें पत्र ! माझें पत्र वाचतील. दोघे वाचतील. वाचतील आणि नाचतील. म्हणतील वेड्या वेणूचे पत्र, मोठ्या डोळ्यांच्या वेणूचें पत्र, गोड भाकर्या भाजणार्या वेणूचें पत्र, गोड प्रार्थना सांगणार्या वेणूचें पत्र ! हो. खरेंच असें ते म्हणतील, मनांत तरी म्हणतील, मनांत गुणगुणतील !’
सायंकाळ झाली. वेणू नदीवर गेली होती. नदीच्या पाण्याशीं खेळत बसली. घडा भरून न्यायचें तिला भानच राहिलें नाहीं. किनरीवाल्याच्या गाण्यांतील गवळण तिला आठवली. यमुना आठवली. वृंदावनांतील वेणू आठवली ! वार्यानें पाण्यावर तरंग उठत होते. सायंकाळच्या संध्येचे शतरंग पाण्यांत पसरत होते. पाणी नाचत होतें, रंगत होतें. वेणूचें हृदय नाचत होतें, रंगत होतें. तिचे डोळे नाचत होतें, गाल रंगत होते. भरलेल्या डोळ्यांनीं व भरलेल्या हृदयानें रिकामाच घडा घेऊन वेणू निघाली ! रिकामा घडा ? छे, त्या घड्यांतहि भावना होत्या. जीवनाच्या घड्यांत प्रेमसिंधु उसळत होता. त्या मातीच्या घड्यांतहि तो शिरला, भरला !