“पुस्तक लिहिताना तुम्ही स्वत:शी हसले असाल, रडले असाल, सुस्कारे सोडले असतील, पेटले असाल; खरे की नाही? हे पुस्तक जीवंत पुस्तक आहे. नारायण वगैरे माझ्या येथल्या मित्रांनाहि ते फार आवडले. देवापूरचा आश्रम भग्यवान आहे. त्या आश्रमांतून सूत केव्हा निघू लागेल, खादी केव्हा विणली जाईल, ती आमच्या अंगावर केव्हा पडेल ते माहित नाही. परंतु त्या आश्रमाच्या निमित्ताने तुमचे विचार, तुमच्या भावना ग्रंथनिविष्ट होऊन सर्वांना सुखवू लागल्या आहेत, हालवू लागल्या आहेत हे मात्र खरे. एकाने कोणी म्हटले आहे की, गांधी सूत काततात. अरविंद विचार काततात!” परंतु गांधींचे सूत नुसते सूत नसून त्याच्याबरोबर शेकडो विचारहि कातले जात असतात. ते सूत कातताना समाधि लागून नवविचारदर्शन होत असेल नाही?”
नामदेवचे पत्र मोठे सुंदर होते. आश्रमाबद्दलची नामदेवाची शंका लौकरच दूर झाली. भिका व जानकू हे लौकरच शिकून आले. मनुष्याच्या मनाची ओढ व तळमळ निम्मे काम करते. उरलेले निम्मे अभ्यासाने होते. भिका व जानकू हे राममंदिरात राहिले. पारोळ्याहून मागाचे सामान आणण्यांत आले. राममंदिरात उद्योगमंदिर थाटले गेले. ‘समारंभ वगैरे सध्या काही नको,’ असे स्वामी म्हणाले. ‘काम सुरू होऊ दे. कामात राम येऊ दे.’ चरके, पिंजणे, लोढणी, टकळ्या सारे सामान जमा होऊ लागले. गावातील मुलेमुली वेळ असेल तेव्हा कातावयास येत. पुष्कळ बायकांना कातण्याची जुनी सवय होती. त्यांचे चरखे दुरुस्त करून देण्यांत आले. माळ्यावर पडलेले चरखे खाली आले. भाग्यलक्ष्मी खाली आली, घरांत आली. गावांत संगीत सुरू झाले.
जानकू व भिका सकाळी प्रार्थना झाल्यावर गावांत हिंडत. कोठे घाण फार असली तर दूर करीत. नंतर ते कामाला लागत. दुपारी बारा वाजता भाकर खात. नंतर पुन्हा काम. रात्री प्रार्थनेनंतर ते वर्तमानपत्रे वाचीत. स्वामी वर्तमानपत्रे पाठवून देत. तसेच दैनिक जुने झाले की पाठवून देत. जुन्या दैनिकाचे काही अंक एकदा भिका घेऊन आला. गावक-यांना विचाराचे खाद्य मानवे.
“स्वामी! तुमच्या आश्रमांत पहिला धोतरजोडा माझा विणला जावो,” गोपाळराव म्हणाले.
“आणि गोदुताईंची पातळे?” स्वामींनी विचारले.
“तिने आधी सांगितले असेल तर माझा दुसरा नंबर,” गोपाळराव म्हणाले.
“सूत बांधून ठेवा. वजन करून, आपले नाव वगैरेंची चिठ्ठी, सारे व्यवस्थित करून ठेवा. धोतर का शर्टिंग, पुन्हा काय, सारी माहिती द्या,” स्वामी म्हणाले.
“ते सारे काही मी करून ठेवतो,” गोपाळराव म्हणाले.