“नामदेवाला स्वामीबद्दल काय वाटे ते शब्दांत सांगता येणार नाही. तुळशीदासांच्या शब्दांत सागावयाचें तर असे म्हणता येईल.

‘ब्रह्म तूं हूं जीव तू ठाकुर हूं चेरो
तात मात गुरू सखा तू सबविधिहि तु मेरी
तोहि मीहि नाते अनेक मानिये जो भाव.

स्वामीची काय सेवा करावी तें त्याला समजत नसे. परंतु एके दिवशी त्याला सेवेचा मार्ग दिसला. शाळेंतून येतांच तो स्वामीच्या खोलीत आई त्यावेळेस स्वामी खोलीत नसत. स्वामीचा कंदील तो पुसून ठेवी. त्यांत तेल वगैरे सर्व भरून ठेवी. स्वामी रात्री येत तो कंदील पुसून ठेवलेला! कोण कंदील पुसतें, त्यांना कळेना. एके दिवशी खोलींतच राहावयाचे त्यांनी ठरविले. शाळा सुटताच नामदेव छात्रालयांत आला. आधी स्वामीच्या खोलीकडे निघाला. स्वामीच्या खोलीला कुलूप नसे.त्याने दार उघडले तों आंत स्वामीजी!

“नामदेव! काय पाहिजे?” त्यांनी विचारिलें.

“कांही नाही,” तो लाजत म्हणाला.

“ उगीच आला होतास? कंदील पुसावयास आला होतास, होय ना?

मी ओळखलें की नाही? स्वामीनीं विचारलें.

“होय,” नामदेव म्हणाला.

“नामदेव, मी कधी आजरी पडलों तर करा माझे काम. परतु मी जोंपर्यंत हिंडता फिरता आहे, निरोगी आहे, तोंपर्यंत माझें काम मीच करीन दुस-यानें माझें काम केलेले मला आवडत नाही,” स्वामी विरक्तपणे म्हणाले.

“तुम्ही मात्र आमचें काम करावें का? तुम्ही आमच्यासाठी किती काम करता? रोज पहाटे उठून दैनिक लिहिता, प्रार्थना सांगता. आमचे निरनिराळ्या विषयांचे तास घेता. आजारी पडलों तर शुश्रूषा करता. आमच्या खोल्याहि झाडता, कपडेंहि धुता. दैनिकात नवीन नवीन माहिती देण्यासाठी किती वाचता, किती चाळता! तुम्ही सेवा आम्ही घ्यावी, आमची तुम्ही कां घेऊ नये? तुम्हाला आमच्याबद्दल परकेपणा वाढतो, होय वा. तुम्हाला आमची सेवा घ्यावयाचा अधिकार आहे. आईबापापेक्षा अधिक अधिकार तुम्ही प्राप्त करून घेतला आहे. पुसू का मी कंदील? घेऊं?” नामदेवानें विचारले.

“घे हो नामदेव, तुला त्या सेवेंत आनंद असेल तर घे. तुझा आनंद मी कां हिरावून घेऊ ?” स्वामी म्हणाले.

“माझा आनंद म्हणजे जर तुमचें दु:ख असेल, तर तो आनंद मला काय करावयाचा आहे?” नामदेव म्हणाला.

“माझा कंदील तु पुसलात तर मी दु:ख करणार नाही. नामदेव! आज माझा कंदील पुशीत आहेस. परंतु भारतमातेच्या लाखों झोपड्यात प्रकाश न्यावयाचा आहे. तें काम पुढें कर हो. तें काम विसरूं नकोस,” स्वामी म्हणाले.

नामदेवानें कंदील पुसला. कंदील पुसताना त्याचें तोंड किती सुंदर व सात्विक दिसत होतें. हृदयांतील आनंदाचा व कृतज्ञतेचा दिवा, त्याची प्रभा तोंडावर उमटली होती.

एके दिवशी स्वामी पहाटे स्नानास गेले होते. ते आंघोळ करून खोलींत आले. ते दैनिक लिहावयास बसले. तों तेथे त्यांना चिठ्ठी आढळली. कोणाची होती ती चिठ्ठी? ती नामदेवानें लिहिली होती. स्वामी आंघोळीला गेल्यावर ती त्यानें हळूच तेथे आणून ठेवली होती. त्या चिठ्ठीत काय होते?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel