गावात एक किनरीवाला भिकारी आला. किनरी वाजवीत तो गाणी म्हणत होता. गोड मंजुळ किनरी ! गोड गोपीचंदाची गाणी ! ते संगीत वा-यावरून आले व वेणूच्या कानात घुसले. ती उठली, पुलकीत झाली. नामदेवांची बासरी तिला अठवली. ‘नामदेव गाणी गोड म्हणतो. स्वामींचे शब्द आठवले. वेणू अंगणात आली. टपोरे डोळे पाहू लागले. कान टवकारून ऐकू लागले. आला, किनरीवाला आला. वेणूच्या अंगणात आला. तो किनरी वाजवू लागला. गाणे म्हणू लागला. वेणू तटस्थ होऊन ऐकू लागली. तिचे हृद्य विरघळू लागले.

तो किनरीवाला वेणूकडे पाही व त्याला स्फुरण येई. वेणूला गाणे पुरे वाटेना; किनरी थांबावे असे वाटेना. किनरीवाल्याला आपण येथून जावे, गाणे थांबवावे, किनरी थांबवाबी असे वाटेना.

नदीवरून आई धुणी घेऊन आली. परंतु वेणूची धूव लागली होती. तिला भान नव्हते.

“अरे, पुरे कर बाबा तुझी किरकिर. जा आतां,” वेणूची आई म्हणाली.

“वाजव रे वाजव. आईचे काय ऐकतोस? म्हण छानदार गाणे. म्हण कृष्णाचे गाणे. गोकुळातील गाणे,” वेणू म्हणाली.

“वेण्ये, अग त्याला द्यायला काय आहे घरांत? ना मूठभर दाणे, ना पैसाअडका. जा रे बाबा तू,” आई म्हणाली.

“माझी भाकर त्याला दे. माझी भूक गेली,” वेणू म्हणाली.

“मला तुमचे काही नको. दाणे नको, आणे नकोत आई, मी फुकट वाजवीन. ह्या डोळ्यांसाठी फुकट वाजवीन. असे डोळे मी कोठे पाहिले नाहीत. आई! पोरीच्या डोळ्यांना जपा,” तो किनरीवाला म्हणाला.

“जा बाबा तू,” आई म्हणाली.

“चाललो मी. त्या डोळ्यांना जपा,” किनरीवाला जाताना म्हणाला.

किनरावाला गेला. त्याने गावात मग कोठे वाजवले नाही, गाणे नंतर कोठे म्हटले नाही. पोरे त्याच्या पाठीस लागली होती. परंतु त्याने कोणाचे ऐकले नाही. त्याला दाणे कोन होते, काही नको होते. तो गावांतून निघून गेला. ‘ए किनरीवाल्या, म्हण की एक गाणे’ असे म्हणत पोरे त्याला पोचवीत गावाबाहेर गेली. किनरीवाल्याने एकदा पाठीमागे पाहिले. मुलांना वाटले की हा आता वाजवणार! परंतु किनरीवाल्याने गावाला डोळे मिटून एक प्रणाम केला व तो एक शब्दही न बोलता निघून गेला. वा-यावर आलेले भटकणारे दिव्य संगीत निघून गेले. कोठून आले, का आले? आले आणि निघून गेले !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel