एक वेळ करी या दु:खावेगळें
दुरिताचें जाळें उगवावें |
आठवीन पाय हा माझा नवस
पुरवावी आस पांडुरंगा ||
हें चरण ते पुन्हा पुन्हां घोळीत होते. ‘आठवीन पाय हा माझा नवस,’ हा चरण म्हणतां म्हणतां ते तल्लीन झाले.
शेवटीं ते उठले. गांवांत जावें असे त्यांच्या मनांत आलें. त्यांनी घोंगडी उचलली, झटकली. इतक्यात कोणीतरी आपल्याकडं येत आहे असें त्यांना वाटलें.
ते एक चाळीशीच्या वयाचे गृहस्थ होते. अंगावर खादीचीं वस्त्रे होती. त्यांचें कपाळ उंच होतें. डोळ्यात एक प्रकारचे भावनाचें पाणी खेळत होते. त्यांच्याबरोबर दोन मुलेहि होती. ती तिन्ही माणसें स्वामींकडे आली. त्या तिघांनी स्वामींना प्रणाम केला. स्वामीनीं त्यांना केला. स्वामी घोंगडी पसरुं लागले. इतक्यात त्या दोन मुलांनी ती घोंगडी त्यांच्या हातांतून घेतली पसरुं लागले. इतक्यात त्या दोन मुलांनी त घोंगडी त्यांच्या हातांतून घेतली व नीट खालों घातली. स्वाप्ती म्हणाले, “ बसा.” ते सभ्य गृहस्थ बसले. ती दोन मुलें विनयानें जरा बाजूला बसलीं. स्वामिहि बसले.
“आपण मला भेटावयास आलात ?” स्वामीनीं विचारलें.
“आपला परिचय व्हावा म्हणून आलों आहोंत,” ते गृह्थ म्हणाले.
थोडा वेळ कोणीच कांही बोललें नाही. सूर्यचंद्रासारखे, गुरुशुक्रासारखे ते दोघे तेथे शोभत होते. गंगेस भेटावयास यमुना आली होती, कृष्णा गोदावरीस भेटू पाहात होती.
“आपण कोठून आलात?” त्या गृहस्थांनी विचारलें.
“कोठून असें काय सांगू? मी भटकत असतों, हिंडत असतों. कधी पायी, कधी आगगाडीनें मी फिरत असतो. जेथे उतरावेसें वाटेल तेथें उतरतों. माझें जीवन म्हणजे वा-यावरची वावडी आहे,” स्वामी म्हणाले.
“या वावडीला परमेश्वर उडवीत असला, तर सारें भलेंच होईल. तुम्ही आपल्या जीवनाचा पतंग त्याच्या हातांत दिला आहे ना? तो तुम्हाला इकडे तिकडे नाचवीत आहे ना?” ते गृहस्थ म्हणाले.
“शेवटीं तसेंच सर्वांना म्हणावें लागतें,” स्वामीजी म्हणाले.
“आपले नांव काय?” त्या गृहस्थांनी विचारलें.