“गावात हिंडावयास मला संकोच वाटतो. ज्यांची थोडीफार सेवा करता येते, त्यांच्याजवळ मी मागू शकतो; इतरांपुढे तोंड वेंगाडण्याची मला लाज वाटते,” स्वामी म्हणाले.
“परंतु जगांत असे लाजून कसे चालेल ? काम कसे होईल ? लोक आपण होऊन थोडेच काही देणार आहेत ?” आबा म्हणाला.
“मी गोपाळरावांचा सल्ला घेऊन काय ते ठरवीन,” स्वामी म्हणाले.
“मग संपला आजचा कार्यक्रम ?” हरीने विचारले.
“हो संपला,” स्वामींनी सांगितले.
मुले गेली. स्वामी मैदानात येरझारा करीत होते. कितीतरी विचार त्यांच्या डोक्यांत घोळत होते. इतक्या मुलांच्या भोजनाची व्यवस्था आपण आपल्याकडे करार करून घेतली तर कसे होईल याचा विचार ते करीत होते. परंतु तो विचार त्यांना शेवटी कठीण वाटू लागला. आपण मासिके, वर्तमानपत्रे यांना लेख पाठविले तर ? काही पुस्तके लिहिली तर ?
ते एकदम आपल्या खोलीत आले. त्यांनी आपली पेटी उघडली. कितीतरी दैनिकांचे ढीग त्या पेटीत होते. त्या दैनिकांतून लिहिलेले निबंध, दैनिकांतून लिहिलेल्या कविता, दैनिकांतील गोष्टी यांची आपणांस स्वतंत्र पुस्तके नाही का करता येणार ? सहज करता येतील. ते दैनिके चाळू लागले. गोष्टींवर खुणा करू लागले. निबंधांवर खुणा करू लागले. किती वाजले याचे त्यांना भान राहिले नाही.
ते शेवटी अंथरुणावर पडले व एक गोष्टींचे पुस्तक तयार करण्याचे त्यांनी ठरविले. दुस-या दिवशी उठल्यापासून त्याच कामाला ते लागले. लिहिलेलेच पुन्हा नीट लिहून काढावयाचे होते. दोनतीन दिवसांत दोनशे पाने छापून होतील इतकी पाने त्यांनी लिहून काढली. ‘गोड गोष्टी’ हे त्या पुस्तकांस ते नाव देणार होते.
“तुम्ही हल्ली फारसे लिहीत असता ?” गोपाळरावांनी विचारले.
“पैसे मिळविण्याच्या आता पाठीमागे लागलो आहे संसार वाढवू म्हणत आहे.” स्वामी म्हणाले.
"लग्न करणार की काय ? करा बोवा लग्न, म्हणजे आमची चिंता कमी होईल. आमचा त्रास कमी होईल," गोपाळराव म्हणाले.