आंधळी वेणू
१०
रघुनाथ व नामदेव पुन्हा पुण्यास निघुन गेले. कॉलेजमधील पहिली परिक्षा त्यांची पास झाली होती. दुस-या वर्षाचा अभ्यास सुरू झाला. पूर्वीप्रमाणे एका खोलीत ते राहत. हाताने स्वयंपाक करीत. घरून येताना रघुनाथला खूप वाईट वाटले. आईच्या मन:स्थितीबद्दल त्याल चिंता वाटे. वेणूचीहि त्याला नाही म्हटले तरी थोडी काळजी वाटू लागली. आपण गरीब, वेणू कोठे द्यावी ? वडील असून नसल्यासारखे झालेले. त्यामुळे कुळाला एकप्रकारे काळीमा आलेला. कसे होईल सारे?
“रघुनाथ ! तू खिन्न का दिसतोस? माझ्या मनात एक शंका आली आहे ती तुला
विचारूं?” नामदेवाने प्रश्न केला.
“विचार,” रघुनाथ म्हणाला.
“तुला माझ्यावर विसंबून राहावे लागते, मी तुझा खर्च चलवतो म्हणून तिला मिंधे वाटते का? ही गोष्ट तुझ्या मनाला जाचते का? नामदेवाला आपण त्रास देतो असा भाव तिझ्या मनात येतो का ? खरे सांग. संकोच नको करू,” नामदेवाने विचारले.
“नामदेव ! तुझी कोणतीहि वस्तु घ्यावयास मला संकोच वाटत नाही वाटत. आपण
दोघांनी एकमेकांचा हृद्ये एकमेकांच्या हृद्यात ओतली आहेत. त्या रात्री छात्रालयाच्या गच्चीवर आपण एकमेकांस मिठी मारून रडलो होतो. आठवते तुला ? त्या अश्रूंनी आपणास कायमचे जोडले आहे. त्या अश्रूंनी परस्परातील दुजाभाव वाहून नेला आहे. आपण एक आहोत. आता तुझे ते माझे व माझे ते तुझे. हो,” रघुनाथ म्हणाला.
“मग तू खिन्न् का दिसतोस ? तुझ्या दु:खाचे कारण काय ?” नामदेवाने प्रश्न केला.
“नामदेव ! सध्या मला वेणूची काळजी वाटत आहे. तिचे पुढे कसे होणार ? आमची सारी स्थिति तुला माहितच आहे. वडिलांच्या एकंदर वर्तनामुळे थोडा कुळाला काळिमा आलेला. घरची गरिबी. वेणू किती गुणी मुलगी आहे ! तिच्या गुणांची का माती होणार सारी ? आई मजजवळ रडली. ती म्हणाली , ‘वेणूची व्यवस्था लाव.’ मी कोठून लावणार व्यवस्था ? कोणाच्या गळ्यात बांधणार ?” रघुनाथ दुखा:ने बोलत होता,