“आई ! मी अमळनेरहून परत येईन. नामदेवाला आगगाडीत बसवून परत येईन,” रघुनाथ म्हणाला.
नामदेव आईच्या पाया पडला. तिने आशिर्वाद दिला.
“वेणू जातो हां. धोतरे घेतली. किंमत दिली,” नामदेव म्हणाला.
“किंमत खरोखर पटेल तेंव्हा,” वेणू म्हणाली.
“पटेल एक दिवस पटेल,” नामदेव म्हणाला.
स्वामी तयारच होते. भिका, जानकू यांचा निरोप घेऊन नामदेव म्हणाला. तिघे पायीच निघाली.
अनेक विषयांवर चर्चा करीत तिघे जात होते. आश्रमाचा व्याप कसा वाढवावा या बद्दल चर्चा चालू होती.
“मी स्वता:च आता हिंडू लागावे असे वाटते,” स्वामी म्हणाले.
“तुम्हाला वर्तमानपत्र असते तर छान झाले असते. यशवंत जर येऊन मिळाला तर छान होईल. सध्याच्या काळात वर्तमानपत्र ही प्रचंड शक्ति आहे,” रघुनाथ म्हणाला.
“तुम्ही आल्याशिवाय त्या फंदात पडू नये असे वाटते. वर्तमानपत्र चालविणे म्हणजे सर्कस आहे ती. तारेवरचे बोलणे आहे ते. फार तोल सांभाळावा लागतो. नाहीतर तुरुंगात पडायचेत. तुरुंगात पडण्याची भीति नाही. परंतु लगेच दुसरा संपादक तयार हवा,” स्वामी म्हणाले.
“तरुणांची कर्तव्ये’ हे पुस्तक तुम्ही लिहलेले आहे. त्यांचे काय झाले?” रघुनाने विचारले.
“काय व्हायचे आहे? पडून राहिले आहे,” स्वामी म्हणाले.
अमळनेर स्टशनवर मित्र आले. गाडी उभी होती. नामदेव उभा होता. स्वामी व रघुनाथ उभे होते.
“नामदेव एकटा असलास म्हणजे ऱडत बसू नको. रडणे हे तुमचे काम नाही. तुमचे सर्वांचे रडणे मी पुर्वी रडून टाकले आहे. तुम्ही हसा व कांम करा. आश्रमाचे काम वाढवा,” स्वामी म्हणाले.
“आश्रमाचे काम वाढू लागताच आश्रमच नाहीसा व्हावयचा,” नामदेव म्हणाला.
“सारा खानदेशच मग आश्रम होईल. जेथे जाऊ तेथें आपलेच मित्र, समान ध्येयाचे, समान आचारविचारांचे ! छोटा आश्रम मरेल, कांम करता करता मरेल व मोठ्या आश्रमाला जन्म देईल. दाणा मरतो व हजारो दाण्यांचे कणीस मिळते. एक आश्रम सरकारने जप्त केला तर शेकडों आश्रम त्या आश्रमाच्या मरण्याने जन्माला आलेले आज ना उद्या दिसतील,” स्वामी म्हणाले.