“त्या किनरीवाल्याची दृष्ट पडली. पापी मेला. त्याचीच दृष्ट पडली. म्हणे असे डोळे मी पाहिले नाहींत. पोरीच्या डोळ्यांना जपा म्हणे. त्याचेंच काम. त्यानेंच फुंकर मारली ! त्याचेंच हें दुष्ट काम. वेण्ये, पाहूं दे बरें पुनः ? पुसूं का ?” आई पुनः पुसूं लागली. परंतु कांहीं दिसेना.

भिका आला. त्याला काय झालें समजेना. भिकाचा आवाज ऐकून वेणू म्हणाली, “भिका ! मी आंधळी झालें. भिका, माझे डोळे गेले. आतां मी दैनिक कशी वाचूं, पत्र कसें लिहूं, पत्र आलेले कसें वाचूं ? भिका, मला काहीं दिसत नाहीं. सारा अंधार अंधार ! तू दिसत नाहींस, आई दिसत नाहीं. मला आतां कांहीं नाहीं दिसणार ! फुलें नाहीं, फुलपाखरें नाहीं. नदीं नाहीं, राई नाहीं. सूर्य नाहीं, तारे नाहीं. गायीगुरें नाहीं. मला कोणी दिसणार नाहीं. रामाची मूर्ति दिसणार नाहीं, स्वामी दिसणार नाहींत. भाऊ नाही, भाऊचे मित्र नाहीं ! आई ! वेणूचे डोळे कां गेले ? कुठें गेले ? कोणीं नेले ? मी काय करूं ? ही आंधळी वेणू काय करील आतां ?”

वेणूचें रडें थांबेना. ती उठे व बाहेर जाऊं लागे. कांहीं दिसेना. आईनें तिचा हात धरला. “आई ! कोण तुझ्या आंधळ्या वेणूचा हात धरील, कोण तिचा हात हातांत घेईल ? मला कोण चालवील ? कोण माझें बोट धरील ? माझ्याबरोबर हळूहळू कोण चालेल ? मी पडेन. मी पडूं नये म्हणून कोण मला आधार देईल ? मला हात देणार्‍याला मी अडखळून पाडायची एखादी ! माझ्या अडखळण्यामुळें माझा हात हातांत घेणाराच पडायचा ! बुडणारा हात देणार्‍याला मिठी मारून त्यालाहि बुडवितो ! माझ्यामुळें दुसरे पडायचे ! माझ्याबरोबर कोण पडेल, कोण रडेल ? मला बरोबर घेऊन कोण चढेल ? आई ! तुझा हात किती दिवस तू देणार ! धर, माझा घट्ट हात धर. आई ! सोडूं नको माझा हात. मला अंगणांत ने. बघूं दे बाहेर दिसतें का ?”

वेणू आईचा हात धरून बाहेर आली ! पाहूं लागली, चैफेर पाहूं लागली.

दिसेना, काही दिसेना. काही नाही हेच सगळीकडे दिसे. न दिसणे दिसत होते अनंत अंधार दिसत होता. अद्वैत दिसत होते. एकता दिसत होती.

“आई, मला घरात ने. मला कोप-यात बसू दे. कसे गेले माझे डोळे? सर्वांना आवडणारे डोळे! आई ! भाऊ रडेल, त्याचे मित्र रडतील. सारे रडतील. माझ्यामुळे सारे रडतील. कशाला मी जगू ? सा-यांना ओझे, सर्वांना भार !”

वेणूच्या आईला काय करावे सुचेना, गावातील औषधे जाणणारे एक दोन आले. परंतु तो म्हणाले, “आम्हाला आशा नाही.” स-या गावात वार्ता गेली. मुलेमुली पाहू आली. लाहानमोठी पाहू आली ! आकाशातील तारे तुटावे, मोती फुटावी, फुले गळावी –तसे झाले ! ते हसणारे हसवणारे डोळे ! सारा गाव हळहळला ! त्या किनारीवाल्याची जादू ! त्याचा मंतर तंतर ! त्यने फुक मारली ! दृष्ट किनारीवाला !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel