“मीं एका वहींत लिहिल्या आहेत माझ्या कविता. त्या कोठेहि मी प्रसिद्धिसाठीं पाठविल्या नाहीत. माझ्या पेटींत वही आहे. तुम्हांला पाहायच्या आहेत? जा. घेऊन ये वही. पेटींत खाली असेंल,” स्वामी म्हणाले.

तो पाहा नामदेव पेटी शोधीत आहे. सांपडली वाटतें वही? होय तीच ती.  नामदेवानें उघडली. स्वच्छ सुंदर अक्षर. नामदेवांनें ती वही हृदयाशी धऱली. तें स्वामींचे हृदय, ते स्वामीचें अश्रु, ती त्यांची धडपड सारें त्या वहींत होतें. ते सारे जीवन नामदेवानें दोन्ही हातांनी घट्ट हृदयाशी धऱले. शेवटी तो उठला व स्वामीजवळ आला.

“तुम्हीच यांतील कांही म्हमून दाखवा,” तो त्यांना म्हणाला.

स्वामीनीं कांही कविता म्हटल्या

“तुम्ही देशावर नाही लिहिल्यात कविता?” रघुनाथने विचारलें.

“तेथे दुसरी एक वही होती. तिच्यांत त्या आहेत. नामदेव, ती रे कां नाही आणलीस? पेटींत धुंडाळून सारें आणावयाचें होतेंस की नाही? संकोच कसला? मी आणि तुम्ही कां निराळे आतां आहोत? माझ्या धडपडी तुमच्याच आहेत. माझें सारे तुमचेंच आहे. आपल्या सर्वांच्या जीवनांचा एक संयुक्त प्रवाह होऊन देवाकडे वाहात जाणार आहे. आपल्या सर्वांची धडपड एकत्र व्हावयाची आहे. नाही का? मला तापातील वातांत दिसे की आपण सारे एकत्र धडपडत आहोंत. तुम्ही माझ्याबरोबर धडपडावयास, माझ्याबरोबर हंसारडावयास येणार कीं नाही? दोन तुकडे तापवून एकजीव होतात. मी एकवीस दिवस तापलों, तुम्ही तापलें होतेत की नाही? या तापांत तापून आपल्या जीवनांचे तुकडे एकत्र – एकजीव झालें की नाही?

“नामदेव, रघुनाथ! मी आतां तुमच्यापेक्षां निराळा नाही. मी कोठेंहि गेलों, मेलों तरी तुमच्यांत आहे. देव हरवला तर भक्तांजवळ शोधावा. स्वामी हरवले तर नामदेव, रघुनाथ, यशवंत यांच्या हृदयांत शोधावेत, यांच्या जीवनांत, यांच्या कृतींत शोधावेत. पृथ्वीचा गंध फुलांतून बाहेर येतो. माझे सारें चांगले तुमच्यांतून प्रकट होवो. माझ्या सदिच्छा तुम्ही मूर्त करा. नाही का? तुम्ही बोलत कां नाही? आपला तिघांचा त्रिवेणीसंगम झाला आहे नाही? त्रिवेणीसंगम म्हणजे तीर्थराज होय!”

नामदेव व रघुनाथ यांना स्वामीचे वातांतील शब्द आठवले; स्वत:ची प्रतिज्ञा आठवली; गच्चीमधील तें मिठी मारून रडणें आठवलें. होय, ते दोघे स्वामींत मिळून गेले होते. स्वामी त्यांच्यांत मिळून गेले होते. एकमेकांत मिळून ते पुढे जाणार होते. सारीं धडपडणारी मुलें! छोटी, मोठी धडपडणारी मुलें! हंसणारी, रडणारी, चढणारी, पडणारी मुलें!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel