“तुम्ही माझ्या घरी केव्हा याल?” रायबा मागे मला म्हणाले, ‘स्वामींना घेऊन एकदा.’ सांगा ना. तुम्ही केव्हा याल?” नामदेवाने विचराले.
“येईन, केव्हा तरी येईन. नामदेव! तुझ्या घरात मी नेहमीच आहे व माझ्या घरात तू नेहमी आहेस, ” स्वामी म्हणाले.
“रायबा आता म्हातारे झाले आहेत, ” नामदेव म्हणाला.
“नामदेव! स्वामींना घेऊन जा. थोडे दिवस विश्रांति मिळेल. जाच तू घेऊन. तू चल म्हटलेस की ते नाही म्हणू शकणार नाहीत, ” रघुनाथ म्हणाला.
“काही दिवस मी प्रचारककांबरोबर हिंडणार आहे. छात्रालय सुरू झाले म्हणजे मला जाता येणार नाही. थोडे दिवस सुटीचे आहेत तो हिंडावे. निरनिराळ्या खेड्यांतून ओळखी झाल्या पाहिजेत. संबंध जडले पाहिजेत. म्हणून आता मी येत नाही. विश्रांति कशाला? न्यायमूर्ति रानडे म्हणत, ‘जीवंत असेपर्यंत विश्रांति नको. मेल्यावर विश्रांति आहेच,’ ” स्वामी म्हणाले.
“अरे तुम्ही कराल ते योग्यच कराल. आम्ही तुम्हाला काय सांगणार?” रघुनाथ म्हणाला.
“मला आतां जरा एकटाच बसू दे. कधी कधी मला अगदी एकटे असावेसे वाटते. जा तुम्ही बाहेर. आईजवळ, वेणूजवल, वेणूजवळ बोला. गरीब पोर किती आनंदात असते! आंधळी असून आंनदी, आणि आम्ही डोळस असून रडके! जा, वेणूजवळचा आनंद जरा लूटा, ” स्वामी म्हणाले.
नामदेव व रघुनाथ गेले. स्वामी एकटेच बसले होते. त्यामशिदीत बसले होते. एकदम त्यांना विरक्ति आली. बोलता बोलता वैराग्य आले. ते फे-या घालू लागले. निराशेचा झटका आला. महिनाभर उत्साहात गेला. त्याची प्रतिक्रिया आली. त्यांचा चेहरा एकदम खिन्न झाला. ते शेवटी तेथे चटईवर पडले. स्वामींना त्या मशिदीत झोप लागली.
बाहेर अंधार पडला. तरी फकीर मशिदीत पडलेलाच होता. परंतु एकाएकी ते जागे झाले. तेथे ते बसले. ते फकीरीच्याच विचारात होते.
मन लागो मेरी यार फकीरीमें
जो सुख पावो रामभजनमें
सो सुख नहिं अमीरीमें ।।मन.।।
हे गाणे ते म्हणू लागले व बोलू लागले. ‘मी कसला पसारा मांडीत आहे? बावळट आहे सारा. एक राम मात्र सत्य आहे. बाकी सारे फोल आहे. या सर्व आधिउपाधि साडून निघून जावे,’ असे त्यांच्या मनात येऊ लागले. या चिखलात कशाला ही धडपड! थोडीशी टुरटुर करायची व त्याचा पुन्हा अहंकार जडायचा! मूर्खपणा आहे सारा झाले! मी गुरफटला जात आहे. संन्याशी असून संसारात रमत आहे. आसक्तीत गुंतत आहे. जाऊं का सोडून सारे? कशाला हा व्याप? जाऊं दे पक्षी उडून. निळ्या निळ्या आकाशांत उडू दे. स्वैर हिंडू दे.’