सारे निघून गेले. स्वामी पडून राहिले. ते रामराम म्हणत होते. मध्येचं त्यांचा डोळा लागे, झापड येई, पुन्हा जागे होत. दहाचें बिगूल झालें.
“स्वामी! कसे काय वाटते?” गोपाळरावांनी विचारलें.

“बरें वाटतें. तुम्ही आंता झोपा,” स्वामीनीं सांगितलें.
गोपाळराव गेले, मुलें निजली की नाही तें पाहात पाहात गेले.

सारीं मुलें झोंपली. सर्वत्र स्तब्धता होती. स्वामी अंथरूणावर जागे होते. नाना विचार त्यांच्या डोक्यांत घोळथ होते. विचारांची वेदना सहन झाली नाही म्हणजे ते रामराम म्हणत. अभंग गुणगुणत.
ते पाहा नामदेव व रघुनाथ दोघे येत आहेत. स्वामींच्या खोलीचें दार उघडलें गेलें.

“कोण गोपाळऱाव?” स्वामीनीं विचारलें.
“ आम्ही अद्याप झोंपले नाहीत? बिगूल झालें ना? जा झोपा, शिस्त पाळली पाहिजे,” स्वामी म्हणाले.
“तुमचे जरा पाय चेपू?” नामदेवानें विचारलें.

“नको , माझे पाय चेपायला नकोत; तुम्ही जा,” स्वामी म्हणाले,
ते दोघे मुलगे निघून गेले. स्वामींना ज्यामुळें वाईट वाटेल तें कां म्हणून करा? त्यांचें समाधान, त्यांतच आपलें समाधान! असें म्हणत ते गेले. दोघे विचार करीत अंथरुणांवर पडले.

पहाटेंच्या वेळेला स्वामींचा जरा डोळा लागला होता. नामदेव त्यांच्या खोलींत येऊन गेला. तो हळूच आला व हळूच गेला. मुलांची प्रार्थना झाली. गोपाळराव स्वामींच्या खोलींत आले. तो स्वामी अंथरुणांवर बसलेले होते. ते प्रार्थना म्हणत होते. गोपाळराव तेथेंच उभे होते. स्वामींनी डोळे उघडले.

“कसें काय वाटतें?” गोपाळरावांनी विचारलें.
“जरा बरें वाटतें, हुशारी वाटते आहे,” स्वामी म्हणाले.

“ताप किती आहे पाहा,” गोपाळरावांनी सांगितलें.
स्वामींनी तापनळी लावून पाहिली. १०२ ताप होता. ताप उतरला नव्हता.
“डॉक्टरला बोलावू का,” गोपाळरावांनी विचारलें.

“ आजच नको,” स्वामी म्हणाले.
“वेळींच आणलेला बरा,” गोपाळराव पुन्हा म्हणाले.
“तुम्हाला बरें दिसेल तसें करा. मी तुमच्या हातांतील आहे. तुमच्या संस्थेत असेंपर्यंत तुमच्या स्वाधीन मी आहे,” स्वामी म्हणाले.

“पण येथून तुम्ही जाऊंन नका,” गोपाळराव म्हणाले.
“आणि बोलावणें आलें तर,” स्वामींनी विचारलें.

“बोलावणे इतक्यांत येणार नाही,” गोपाळरावांनी सांगितले.
“कोणाचें बोलावणें तुम्ही समजलेत?” स्वामींनी हसून प्रश्न केला
“देवाघरचें, होय ना?”


“नाहीं, भारतमातेचें. देश केव्हां पेटेल याचा नेम नाही. महात्माजी केव्हां रणशिंग फुंकतील ते सांगता येणार नाही,” स्वामी म्हणाले.
“तें पाहाता येईल पुढें. देशाची व देवाची हांक आमच्या हांकेपेक्षा थोर आहे. तोंपर्यंत तर येते राहा. देशाची हांक दुस-यांच्याहि कानांत घुसेल, हृदयांत शिरेल असें करा. मग मी डॉक्टर आणतोंच,” असें म्हणून गोपाळराव गेले. त्यांनी एका मुलाला सायकलवरून डॉक्टरांकडे पाठविलें.
नामदेव आला.

“तुम्ही तोंड धुतलेत?” त्यानें विचारलें.
“नाही, धुतों, मी बाहेरच जाऊन धुतों. तू माझ्याबरोबर अस म्हणजे झाले,” असें म्हणून ते उठले.
बाहेर येऊन त्यांनी तोंड धुतलें. स्वच्छ पुसलें. नामदेवाचा हात धरून ते खोलींत आले व अंथरुणावर पडून राहिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel