“नामदेव, तो पत्रा दे,” स्वामींनी सांगितलें.
स्वामींनी मळावर माती टाकली व पत्र्यांवर दुस-या तुकड्याने ओढून घेतली घाण. ती घाण बादलीत जमविण्यांत आली.
गांवांत वार्ता गेली. गांवची मंडळी पाहावयास आली.
रघुनाथच्या ओळखीचीं गांवांत माणसें होती. तुकाराम मास्तर, मगन वगैरे त्याच्या परिचयाचे होते. तुकाराम मास्तरांनी अपमान झाल्यामुळे शाळेंतील नोकरी सोडून दिलेली होती. मारवडला किराणामालाचें त्यांनी दुकान घातलें होतें. मगन हा एक भावनाप्रधान तरुण होता. तुकाराम मास्तर स्वत:सूत कांतीत व त्या सुताचें कापड विणकरांकडून विणवून घेत. त्यांच्या घरीं पिंजण, चरका सारें काही होतें. मगनहि खादी वापरी, मगनच्या घरी कितीतरी वर्तमानपत्रें येत. हिंदी पत्राची त्याला आवड होती. दिल्लीचें चांद मासिक तो घेत असे. खादीबरोबर कांहीतरी विचार जातच असतात. खादी नवीन कल्पना, नवीन ध्येयें बरोबर घेऊन जात असते. प्रत्येक वस्तूच्याभोवतीं एक सहकारी तत्त्वांचें वलय असतें. प्रत्येक वस्तूच्याभोंवती एकप्रकारचें तत्त्वज्ञान येतें. तुकाराम मास्तर गांवांत निरनिराळ्या चर्चा करीत असत. महात्मा गांधी म्हणजे काय त्याची गांवाला ओळख होती. आपला स्वच्छ करण्यासाठी अमळनेरचीं मुलें आलीं आहेत, इंग्रजी शिकणारी सुखवस्तु लोकांची मुलें आलीं आहेत हें ऐकून तुकाराम मास्तर आनंदले. ते निघाले, मगनहि त्यांच्याबरोबर निघाला.
“काय रघुनाथ, हे काय?” मगननें विचारलें.
“तुमचा गांव झाडावयाला आम्ही आलों आहोंत,” रघुनाथ म्हणाला.
“ आम्ही देवाचे मजूर – आम्ही देशाचे मजूर,” नामदेव म्हणाला.
“ महात्माजींचा वाढदिवस आहे. त्यांना आवडणारी गोष्ट करावयास आम्ही आलों आहोत,” यशवंत म्हणाला.
“आपल्या राष्ट्राला नवजीवन देणा-या, राष्ट्राची मान उंच करणा-या महात्म्याबद्दल आपण कृतज्ञता नको कां दाखवायला? महात्माजी म्हणजे राष्ट्राचे जनक आहेत,” स्वामी म्हणाले.
“मगन! घे, तूहि एक झाडू घे,” तुकाराम मास्तर म्हणाले.
“ आणि तुम्ही नाहीं का घेत?” रघुनाथनें तुकाराम मास्तरांना विचारलें.
“मी फावडे घेतो. आमच्या विहिरीजवळ घाण आहे. माझ्याबरोबर कांही मुलें चला. आपण तेथें स्वच्छ करु,” तुकाराम मास्तर म्हणाले.
“कलावान् नामदेवाला जा घेऊन. नामदेव, जा त्यांच्याबरोबर,” स्वामी म्हणाले.
नामदेव व कांही मुलें तुकाराम मास्तरांबरोबर गेली.
गांव स्वच्छ होऊ लागला. मो-या उपसल्या गेल्या. घाण बादल्यातून भरून दूर शेतांत नेऊन टाकण्यांत आली. ठिकठिकाणीं फिनेल टाकण्यांत आलें.
“ए भाऊ, तेथें घरांतील मोरींत टाक रे थोडें तें पाणी. फार डांस असतात बघ,” एक बाई म्हणाली.
एका स्वयंसेवकांनें त्या मोरींत फिनेलचें पाणी टाकलें.
गांवांतील हरिजनवस्तींत आता मुलें आलीं. काय त्या झोंपड्या, काय तेथील स्थिती! मातीच्या मडक्यांशिवाय तेथे भांडे नव्हतें.