प्रचारकांना कोठे कोठे पाटलाचा त्रास होई. परंतु प्रचारक खंबीर होते. “येथे व्याख्यान द्यायचे नाही, आम्हाला तसा हुकूम आहे,” असे कोणी सांगे. कोणी म्हणे, “व्याख्यान द्याल तर मार खावा लागेल.”
“आम्ही व्याख्यान तर देणार. सारे कायदे आम्हांला माहीत आहेत. तुमच्यावरच कायदेशीर इलाज आम्ही करूं; नाहीतर गप्प बसा व आम्ही काय सांगतो ते ऐका,” असे प्रचारक त्यांना बजावीत.
ज्या गांवांतून सत्यशोधकी चळवळ पूर्वी गेलेली होती, त्या गांवांत राष्ट्रीय विचार लौकर पटत. कोणत्याहि निमित्ताने झालेली बुद्धीची हालचाल ही शेवटी उपयोगी पडतेच पडते. म्हणून विवेकानंद म्हणत, ‘पडून राहण्यापेक्षां चोरीहि कर.’ सत्यशोधकी चळवळींचे एक प्रकारे काम झाले. महात्मा गांधींची चळवळ सुरू झाली व भेदाभेदांचे पाखंड कमी होऊं लागले. कनिष्ठपणाचे थोतांड कमी होऊ लागले. सर्व सेवेची कामे पवित्र आहेत ही भावना उत्पन्न झाली. सुशिक्षितांचे तोंड खेड्यांकडे वळविण्यांत आलें. ऐट जाऊन जीवनांत साधेपणा येऊ लागला. शेतकरी व कामकरी यांच्या जीवनांतील दिव्यता व मोठेपणा वरच्या पांढरपेशांस कळून येऊं लागला. धर्मातील टिळेमाळांचे स्तोम कमी होऊन सेवेला महत्त्व आले. बोलघेवड्या धर्माचे महत्त्व जाऊन त्यागाची पारख होऊ लागली. सत्यशोधक समाजाचे कार्य कॉन्ग्रेसने एक प्रकारे आपल्या हातांत घेतले. सत्यशोधक समाज म्हणजे प्रेम, स्नेह, समता पाहाणारा समाज, अन्यायाशी, खोट्या उच्चनीचपणाच्या भावनांशी झगडणारा समाज! सत्यशोधक समाजाचे हे कार्य होते.
प्रचाररकांना हा मोलवान अनुभव आला. सत्यसमाजी गांवे भराभरा राष्ट्रीय वृत्तीची होऊ लागली. प्रेमाने खादी घेऊ लागली. कॉन्ग्रेसचे सभासद होऊ लागली. कॉन्ग्रेसचे प्रचारक अहंकार न बाळगता प्रेमाने आपली गांवे झाडावयास येत आहेत हे पाहून कोणा सत्यशोधकाचे हृदय फुलणार नाही? कोणाला आपला पंथ कृतार्थ झाला असे वाटणार नाही?
स्वामी प्रत्यक्ष या प्रचारकांशी संबंध आहे असे दाखवीत नसत. दूर राहून सारी सूत्रे ते हलवीत होते. देवपूरच्या आश्रमांत ते दर रविवारी जात. सर्व प्रचारकांची त्या दिवशी गांठ पडे. सारे अनुभव ते ऐकत. सर्वांचा विचारविनिमय होई. काम फार व्यवस्थितपणे चालले होते.
स्वामीजी एके रविवारी प्रचारकांना म्हणाले, “तुमच्याबरोबर राष्ट्रीय झेंडा नेहमी ठेवीत जा. संन्याशाचा दंडा, तसा आपला हा झेंडा. वारक-यांची पताका त्याच्या खांद्यावर. आपला झेंडा आपल्या खांद्यावर राष्ट्राचे हे निशाण सर्वत्र फडफडले पाहिजे. लहान लहान झेंडे आपण तयार करूं व गांवोगांव मुलांना वाटू. जो मुलगा झेंड्याचे गाणे व वंदमातरम् पाठ म्हणेल, त्याला झेंडा बक्षीस असा उपक्रम सुरू करा. मुलाबाळांच्या हातांत हे झेंडे जाऊ दे. मुलाबाळांच्या तोंडी राष्ट्राची गाणी जाऊ दे.”
ही कल्पना सर्वानाच आवडली. तसेच ज्या गांवांत मुक्काम असेल त्या गांवांत पहाटे प्रभात फेरी काढावी, नाना गाणी म्हणावी. आता शेतक-यांचे कमक-यांचे राज्य येणार. आम्ही उद्यांचे मालक. आमच्या देशाचे स्वामी! अशा अर्थाची गाणी म्हणा. स्वाभिमा, निर्भयता, संघटना व सेवा ज्यामुळे उत्पन्न होतील अशी गाणी म्हणत जा. ही गाणी आपण छापूनच काढू आणि गांवोगांव वांटू.