“मी हात जरा सोडतो,” नामदेव म्हणाला.
नामदेवाने हात सोडला व जाते भरभर फिरू लागले. जाते हलके येऊं लागले.
“तुम्हाला जाते धरता येत नाही. खुंटा आवळून धरता. खुटा सैल धरावा लागतो. घट्ट पकडून नाही ठेवायचा. तुम्हाला घट्ट धरून ठेवण्याची सवय झाली आहे. वस्तू हातांत आली की घट्ट धरता,” वेणू म्हणाली.
“देवाचे पाय घट्ट धरावे,” नामदेव म्हणाला.
“खुंटा म्हणजे देवाचा पाय वाटते?” वेणूने विचारले.
“हो देव ज्याप्रमाणे विश्व फिरवतो, त्याप्रमाणे हा खुंटा या जात्याला फिरवतो. खुंटा म्हणजे देवाचा पाय,” नामदेव म्हणाला.
“पुरे आता दळणे. चल नामदेव,” रघुनाथ म्हणाला.
“भाऊ धोतरे घातलीत रे,” वेणूने वाचारले.
“हो आणि नामदेवने त्याचे पाच रुपये दिले आहेत,” रघुनाथ म्हणाला.
“मी नवीन धोतरजोडा घेणारच होतो,” नामदेव म्हणाला.
“परंतु फुकट काही घेऊ नये. घरी तुम्हाला अडचण असते. नुसती मदत तशी देता येत नाही व ती घेणेही मिंधेपणा वाटते. म्हणून हे पाच रुपये असूं देत,” नामदेव म्हणाला.
“आणि वेणू ! तू आता आंधळी. तुझ्या लग्नासाठी आता पैसे लागतील. पैशाशिवाय तुला कोण घेणार ? पैशाची पिशवी बरोबर घेशील तेव्हा कोणीतरी तुला गळ्यात बांधून घ्यावयास तयार होईल. आई हल्ली पै पै जमवीत आहे. मी म्हटले, ‘आई, इतकी कां रात्रंदिवस श्रमतेस ?’ ती म्हणाली, ‘वेणूच्या लग्नासाठी.’ वेणू ! तूही सूत कात. पैसे जमव. स्वावलंबनाची कास धर,” रघुनाथ सांगत होता.
“भाऊ ! काय हे तुम्ही बोलत आहात ? कोणाजवळ बोलत आहात ? तुम्ही दगडाशी बोलता का वेणूशी डोळे गेले. वेणूचे प्राणहि जावेत अशी का इच्छा आहे ? प्रेमाच्या वस्तूचे विक्रे रे काय मांडता ? त्या धोतरांचे रुपये मोजणार ? त्यांचा का पाच रुपये किंमत आहे ? त्यांची किंमत द्यायला तुम्ही तयार आहात ?” वेणूने विचारले.
“बारीक सूत आहे म्हणून फार तर साहा रुपये,” रघुनाथ म्हणाला.
“त्या धोतरांत मी माझे हृद्य, माझे सारे जीवन ओतले आहे. त्या धोतरांची किंमत द्यायची असेल तर हृद्य मला द्या. त्या धोतरांत भावना आहेत, प्रेम आहे. मला भावना द्या, प्रेम द्या. दगडधोंडे देऊ नका. त्या पाच रुपयांना माझे पंचप्राण गुदमरून जातील. ते पाच दगड माझ्या प्राणाची समाधी बांधतील,” वेणू म्हणाली.
“वेडीच आहे वेणू,” रघुनाथ म्हणाला.