नामदेव व रघुनाथ देवपूरला गेले. ते आधी आश्रमांत उतरले. नंतर रघुनाथ नामदेवाला बरोबर घेऊन घरी गेला. वेणू चरक्यावर सूत कांतीत होती. तोंडाने गाणें म्हणत होती. वेणू म्हणजे एकादी देवताच दिसत होती. शांत पवित्र गंभीर.
“वेणू, आम्ही आलो ना,” रघूनाथने वेणूची तंद्री मोडली.
“केव्हा रे आलेत? उद्या ना येणार होतेत,” वेणू चरका थांबवून बोलूं लागली.
“स्वामी म्हणाले आजच जा. या सुटीत खूप काम करावयाचे आहे,” रघुनाथ म्हणाला.
“तुम्ही चौघे पांचजण का एकढा रस्ता तयार कराल? तुम्ही का सुग्रीव मारुती आहात वाटते?” वेणूने विचारले.
“अमळनेरची शंभर मुले येणार आहेत. सेवा सैनिकाची छावणी देवपूरला पडणार आहे. रात्री निजावयास नदीचे वाळवंट, दिवसां पडावयास थंडगार मशीद! शंभर मुले येणार! वेणू, आपल्या गांवचे भाग्य थोर आहे. भिका व जानकू यांचे हे श्रेय आहे. वेणूची तपश्चर्याहि त्याला कारण आहे,” रघुनाथ म्हणाला.
“भाऊ, तू एकटाच आलास? तुझे मित्र घरी गेले वाटते? ते नाही इकडे येणार?” वेणूने विचारले.
“ते कशाला इकडे येतील? ते का असे काम करतील? त्यांच्या घरी संत्र्यांचा मळा आहे. तो थंडगार मळा सोडून येथे का उन्हांत मरायला येतील? सुखांत वाढलेले ते,” रघुनाथ थोडे हंसत बोलत होता.
“का रे त्यांची निंदा करतोस? पुण्यास मी आले होते, तेव्हां त्यांनी भांडी घासली. सुखांत वाढलेले भांडी घासतील वाटते? सुखांत वाढलेले कंदिलावर हात भाजून घेतील वाटते? येतील, ते सुद्धां येतील. स्वामींची हाक ऐकताच ते आल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामीन त्यांच्याबद्दल किती प्रेम वाटते! ते एखांदे वेळेस त्यांच्या खूप गोष्टी सांगतात. स्वामींचा कंदील कसा पुशीत, बागेत पाणी कसे घालीत- सारे मला माहीत आहे. ते सुद्धां येतीलच. इतर मुले येतील. भाऊ! मला काय आणले आहेस? सांग, तुझ्या आंधळ्या वेणूला काय आणले आहेस?” वेणूने विचारले.
“तुला एक काठी आणली आहे, काठीच्या आधाराने नीट चालता येईल,” रघुनाथ म्हणाला.
“भिका-याने मला चांगली दिली आहे काठी! मी त्याच काठीला झेंडा लावते. प्रभात फेरीच्या वेळेला मुली माझा हात धरतात. ती शहरांतील काठी कशाला? असेल विलायती!” वेणू म्हणाली
“मी का विलायती घेईन? मग स्वामींचे तोंडच पहावयास नको. त्यांच्याजवळ इतके दिवस राहून इतकेहि नाही वाटते तुझा भाऊ शिकला?” रघुनाथ खिन्नपणे म्हणाला.
“भाऊ थट्टेने बोलले त्याचा वाटते राग आला? अरे, प्रेमाने कोणी कोणी विलायती घेतात हो. स्वामीच म्हणत होते की, ‘पुष्कळ वर्षापूर्वी त्यांनी जपानी लेखणी कोणा नातलगाच्या मुलाला भेट म्हणून दिली!’ स्वामी स्व:ता विदेशी घेत नसत. परंतु मित्राच्या मुलावरील प्रेमासाठी स्वदेशीला त्यांनी चाट दिली! प्रेमामुळे कधी कधी कर्तव्य आपण विसरतो असे स्वामींच्या दैनिकांत मी वाचले होते. बघू दे मला काठी. मला दिसणार आहे. थोडीच? बघू दे,” वेणूने उठून हात पुढे केला.