मेळा करण्यासाठी स्वामींनी काही संवाद लिहिले. मधून मधून पदे घातली. नाताळची सुट्टी होती. मेळ्यांत काम करणारी मुले घरी गेली नाहीत. ती संवाद पाठ करीत. जनार्दन पेटी वाजवी व गावातील श्रीराम तबला वाजवी. सहज अभिनव कसा करावा ते स्वामी शिकवीत. निरनिराळ्या विषयांवर संवाद होते. शाळेतील शिक्षण, अस्पृश्योद्धार, खादी, स्वराज्य, सावकारी पाश, मजुराचे हाल सुरेख संवाद होते. चार तासांचा भरगच्च कार्यक्रम होता. मे महिन्यांत मेळा घेऊन गावोगाव जावयाचे असे ठरले होते. जर बरे पैसे मिळाले तर दोन प्रचारक ठेवण्याचे स्वामींच्या मनांत होते.
उन्हाळ्याची सुट्टी केव्हा लागते इकडे सर्वांचे लक्ष होते. मेळ्यांतील मुले नापास होऊ नयेत म्हणून स्वामी काळजी घेत होते. ते त्या मुलांना शिकवीत, त्यांच्या शंका निरसन करीत.
“तुम्ही कोणी नापास होऊ नका, म्हणजे आपली अब्रू राहील. छात्रालयाचे नाव राहील. पालकांचा दोष येणार नाही. गोपाळरावांना बोल लागणार नाहीत,” असे पुन्हा पुन्हा स्वामी बजावून सांगत. शक्य तो नापास न होणारीच मुले त्यांनी निवडली होती.
परीक्षा झाली व सारी मेळ्याची मुले पास झाली.
“कनक ! तू पास होशील असे वाटले नव्हते,” स्वामी म्हणाले.
“भारतमाताकी जय! भारतमातेचा आशीर्वाद. तिची सेवा करण्यास निघालेली मुले नापास कशी होतील?” कनक म्हणाला.
“आपण केव्हा निघावयाचे?” माधवने विचारले.
“आता ठरवू. परंतु आधी अमळनेरलाच कार्यक्रम करू. येथे तिकिटे पुष्कळ खपवू. दुस-या गावांचा कार्यक्रम आधी निश्चित करून तेथे तिकिटे खपविण्याची व्यवस्था आधीपासून करायला हवी,” स्वामी म्हणाले.
“जळगाव, भुसावळ, धुळे, चोपडा, चाळीसगाव ही पाच गावे तरी. घ्यावयाचीच.”
“मालेगाव धुळ्याहून जवळ आहे, तेथेहि जाऊ.”
“तालुक्याची सर्व गावे घ्यावी. धरणगावहि घ्यावे,” एकजण म्हणाला.
अमळनेरात आज मेळ्याचा कार्यक्रम होता. अमळनेर रसिक होते. गणेश गायनसमाज होता. अमळनेरात गाण्याचे, संगीताचे कार्यक्रम पुष्कळ वेळा होत असत. नजरखांचे सतारीचे प्रोग्रॅम कितीदा तरी होत नजरखां, खरोखरच उत्कृष्ट सतार वाजवी. गावात हिंडून हिंडून मुले तिकिटे खपवीत होती.
‘देवपूरच्या आश्रमाच्या मदतीसाठी’ असे शब्द जाहिरातींत मुद्दाम घातले होते. अमळनेरांत याच गोष्टीची सर्वत्र चर्चा चालली होती. वकिलांच्या क्लबांत, व्यापा-यांच्या बैठकीत, स्त्रियांच्या देवदर्शनाच्या वेळी मेळ्याच्याच गोष्टी चालल्या होत्या.