वेणू पडून राहिली. शांत पडून राहिली.

“वेण्ये, जेवायला ऊठ. थोडे खा आणि पड. तुला काय होते आहे?” आई कनवाळूपणे म्हणाली.

“मला भूक नाही. मला गाण्याची भूक आहे. गाणी गात उडून जावे असे मला वाटते. आई, नको मला भाकर. मी पडून राहाते लागली भूक तर तिसरे प्रहरी खाईन,” वेणू म्हणाली.

वेणू जेवली नाही. तिच्या आत्म्याला ते जड अन्न नको होते. खाली पृथ्वीशी डांबून ठेवणारे ते अन्न नको होते. तिला हवेत उंच घेऊन जाणारे, या पृथ्वीचा विसर पाडणारे, सभोवतालच्या संसाराचा विसर पाडणारे, भावनांच्या हजारो तारा छेडू लागणारे दिव्य संगीत पाहिजे होते. वेणू का पृथ्वीवरची नव्हती? मर्त्यलोकासाठी नव्हती?

“वेणू, हे बघ पत्र आले आहे, रघुनाथचे पत्र,” भिका आश्रमांतून येऊन म्हणाला.

“बघू दे. भाऊचे पत्र. मला आले होय?” वेणूने विचारले.

“हो. माझ्या पत्रात ही तुला स्वतंत्र चिठ्ठी होती,” भिका म्हणाला.

“मी जातो हा. ते ठाण लौकर विणून द्यावयाचे आहे.” असे म्हणून भिका निघून गेला.

वेणूने ते पत्र वाचले. कितीदा तरी वाचले. तिने आईला वाचून दाखविले.

“चिरंजीव वेणूस सप्रेम आशीर्वाद.

आम्ही आनंदात आहोत. येथला आमचा संसार पुन्हा सुरू झाला आहे. आम्ही हातानेच स्वयंपाक करतो. रात्री भात करीत नाही. भाकर करतो. तुझ्या भाकरीची आठवण येते. नामदेव म्हणाला, ‘मी वेणूच्या भाकरीसारखी भाजतो हा.’ परंतु त्याला साधली नाही. कलावान नामदेवाला भाकरी साधेना. नामदेवाने वाजवावे, गावे, चित्रे काढावी. परंतु भाकरी रघुनाथानेच भाजावी. वेणूच्या भाऊने. ‘माझ्या वेणूजवळ भाकरी भाजायला शीक,’ मी त्याला म्हटले. तो म्हणाला, ‘मी तिच्याजवळ भाकरी शिकू, परंतु तिला मी काय शिकवू?’ मी म्हटले, ‘बासरी वाजवायला शिकव.’ काल आम्ही कॉलेजच्या बागेत फिरत होतो. एका कृष्णकमळीच्या वेलीवर दोन कमलें फुलली होती. मीं म्हटलें, ‘नामा, हीं बघ दोन फुलें.’ तो म्हणाला, ‘तुझ्या वेणूच्या डोळ्यांसारखीं आहेत. कसे आहेत वेणूचे डोळे !’ मी त्याला म्हटले, ‘माझ्या वेणूच्या डोळ्यांवर दृष्ट पडेल हो.’ नामदेव म्हणाला, ‘चांगल्या वस्तूवर सर्वांची दृष्ट पडते. चंद्र सुंदर दिसतो म्हणून तर त्याला दृष्ट लागली. त्याच्यावर डाग पडले. त्याला क्षयवृद्धि लागली.’ आमचा वेळ आनंदात जात आहे. भावासारखे आम्ही वागत आहोत. तुझी, आईची आठवण येते. वाईटहि वाटते. आईला म्हणावे की चिंता नको करू. सारे चांगले होईल. वेणू, वाचीत जा. लिहीत जा. चांगली हो. वेणू म्हणजे गोपाळकृष्णाची वेणू होऊ दे. सर्वांना मोहून टाकणारी, सर्वांची समाधि लावणारी, सुखदुःखाचा विसर पाडणारी, मोक्ष देणारी वेणू ! आईला माझा व नामदेवाचा नमस्कार. नामदेवाचे तुला आशीर्वाद, सप्रेम आशीर्वाद. तू पत्र पाठव.

तुझा भाऊ.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel