२३२

ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥

यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥

आणिती शिदोर्‍या आपाअपल्या । जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥

शिळ्या विटक्या भाकरी दहीं भात लोणी । मिळेवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥

एका जनार्दनीं अवघ्यां देतो कवळ । ठकविलें तेणें ब्रह्मादिक सकळ ॥५॥

२३३

वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वनां ॥१॥

धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥

बाळ ब्रह्माचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एकमेंकां ॥३॥

दहीं भात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी वाढितसे ॥४॥

श्रीहरी वाढिलें गोपाळ जेविलें । उच्छिष्ट सेविलें एका जनार्दनीं ॥५॥

२३४

बैसोनी कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥

नानापरीचीं पक्कान्नें । वाढिताती उत्तम गुणें । सर्वां परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥

वडजा वांकुडा पेंदा । आणि सवंगडी बहुधा । काल्याच्या त्या मुदा । घेती आपुलें करीं ॥३॥

लोणचें ते नानापरी । वाढिताती कुसरीं । सर्व वाढिलें निर्धारी । परिपुर्ण अवघीयां ॥४॥

एका जनार्दनीं म्हणे । कृष्ना कवळ तुं घेणे । गडियांसी देव म्हणे । तुम्हीं घ्यावा आधीं ॥५॥

२३५

गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्हीं ॥१॥

गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आतां । म्हणोनी रुदोनी तत्त्वतां । चालिला कृष्ण ॥२॥

कृष्णा नको जाऊं जाण । तुझें ऐकूं वचन । म्हणोनि संबोखुन ।आणिला कृष्ण ॥३॥

एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनीं । महिमा वदवी ॥४॥

२३६

काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी बैसवुनि हरी । कवळ घेती ॥१॥

कृष्ण अपुलेनी हातें । कवळ घाली गडियातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ॥२॥

मुखामाजीं कवळ । सवंगडे घालिउती सकळ । वैकुंठीचा पाळ । ब्रह्मानंदें डुल्लत ॥३॥

तृप्त झाला जनार्दन । एका वंदीतसे चरण । काया वाचा मन । खुन भक्त जाणती ॥४॥

२३७

मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं ।

गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥

काला मांडिला वो काला मांडिला वो । नवलक्ष मिळोनी काला मांडिला वो ॥धृ॥

नानापरींचे शोभती दहीभात । पंक्ती बैसविल्या पेंदा बोबडा वाढीत ।

जो जया संकल्प तें तया मिळत । अनाधिकारिया तेथें कोणी न पुसत ॥२॥

पुर्वसंचित खालीं पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी ।

नामस्मरणाची क्षुधा पोटीं आगळीं । तेणें तृप्ती होय सहजीं सकळीं ॥३॥

ऐसे तृइप्त जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें ।

एक जनार्दनीं अभेदं । शुद्ध समाधिबोधें मुखसंवादें ॥४॥

२३८

अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥

हरिनामाचा कवळू घेतां। तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥

एका कवळासाठीं । गणीका बैसविली वैकुंठीं ॥३॥

एका जनार्दनीं कवळ । सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥

२३९

बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥

धाउनी गळां पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढें येक ॥२॥

टिरीया माडिया वाजविती पाय । हरुषें नाचताहे देवराया ॥३॥

ऐसें नित्यानित्य क्रीडा ते करिती । देव ते पाहाती विमानीं तें ॥४॥

म्हणताती देव वंचलों या सुखा । एका जनार्दनीं देखा गोवियलें ॥५॥

२४०

देवा परिस उदार । भक्त जाणा निर्धार ॥१॥

याजसाठीं धावें पाठीं । देत लंगोटीं आपुली ॥२॥

आपण दिगंबरची असे । भक्त वस्त्र भूषणें सौरसें ॥३॥

म्हणोनि भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं तिष्ठत ॥४॥

२४१

देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण ॥१॥

धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचें । ठेवणें सदाशिवाचें खेळतसे ॥२॥

उच्छिष्ट तें काय खाय तयाचेनी होतें । नाहींकंटाळत तयालागीं ॥३॥

एका जनार्दनीं भक्तांची आवडी । वाढवीत गोडी नित्य नवी ॥४॥

२४२

नित्य तो सोहळा करिताती सुरवर विचार पहावयाला देव येतो ॥१॥

अंतरी सुरवर विचार करिती । काला श्रीपती करित स्वयें ॥२॥

उच्छिष्ट प्रसाद सेवुम धणीवरी । मत्स्यरुप निर्धारी घेती सर्व ॥३॥

एका जनार्दनीं जाणतसे खुण । म्हणोनि विंदान आरंभिलें ॥४॥

२४३

गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणें अंतरलों ॥१॥

करिती विचार इंद्रादी देव । हें सुखवैभव न मिळे आम्हां ॥२॥

शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी । पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥

ऐसा विचार करुनियां देव । मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥

गोपाळासी सांगे वैकुंठीचा रावो । आजी नवलावो तुम्ही करा ॥५॥

कवळ खाउनी हात टिरी पुसा । यमुनें सहसा जाऊं नका ॥६॥

कां तो सांगे हरी न कळे तयासीं । एका जनार्दनासी गुज पुसे ॥७॥

२४४

गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं आला भेवो यमुनेंत ॥१॥

जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । बाऊ आला आहे तया ठायीं ॥२॥

तयांचे बालेणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती चाड संवगडे ॥३॥

एका जनार्दनींऐकोनि वचन । पढती वचन पेंदा बोले ॥४॥

२४५

गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥

हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥

ऐकोनियां पेंदा नाचतो दुपांडी । गदियांची मादि सवें घेत ॥३॥

बाऊ पहावया गडे हो अवघे चला । या कृष्णबोला राहुं नका ॥४॥

एका मागें एक गडी ते निघाले । एका जनार्दनीं आले यमुनेटीं ॥५॥

२४६

नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं । उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥

खल्लाळाचा शब्द कानीं तो ऐकिला । पेंदा पुढें झाला सरसाउनी ॥२॥

पेंदा म्हणे गडिया आपणा पाहुनी यमुना । हुंबरी घेती जाणा पहा पहा ॥३॥

एका जनार्दनीं पाहुनिया देव । करितां उपाव नवलाचा ॥४॥

२४७

आजी कांहो कृष्ण वर्जिली यमुना ।बाऊ तो जाणा कोठोनि आला ॥१॥

कैसा आहे बाहु पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे ॥२॥

वारितां वारितां पेंदा पै गेला । पहातसे उगला यमुनेंत ॥३॥

बाऊ तो न दिसे कोठें खल्लाळ वाजत । पेंदा तया म्हणत क्रोधयुक्त ॥४॥

म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण । स्त्री तूं होऊन हुंबरी घेसी ॥५॥

मी कृष्णदास घेसी तुं हुबरी । तुज निर्धारी बळ बहु ॥६॥

मी काय निर्बळ घेसी तुं हुबरी । आतांची निर्धारी पाहें माझें ॥७॥

म्हणोनियां पेंदा तेथेंची बैसला । हुबरीं तो तयाला घालीतसे ॥८॥

पेंदा कां नये काय जाहलें त्याला । कृष्णें पाठविला दुजा एक ॥९॥

तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तों सकळ आलें तेथें ॥१०॥

उरलेसे दोघे कृष्ण आणि राम । गुंतलें सकाम गडी तेथें ॥११॥

काय जाहलें म्हणोनि आले उभयंता । पाहुनी तत्त्वतां हांसताती ॥१२॥

सावध करितां न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ॥१३॥

एका जनार्दनीं कौतुकें कान्हया । आली असे दया भक्तांची ते ॥१४॥

२४८

गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आलें । ते असे देखिले रामकृष्णें ॥१॥

मोहरी काढोनि लावियली मुखा । नांदे तिहीं लोकां मोहियलें ॥२॥

तयांमध्ये म्हणे गडे हो ऐका । पळालीसे देखा भिउनी तुम्हां ॥३॥

मोहियलें मन सर्वांचे भावें । एका जनार्दनीं देवें नवल केलें ॥४॥

२४९

पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥

मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥

कळवळला देव जाहालासे घाबरा । मुरली अधरा लावियेली ॥३॥

मुरलीस्‍वरे चराचरी नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेंगीं ॥४॥

यमुनाहि शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध व्हा रे ॥५॥

पेंदीयानें तो शब्द ऐकिला कानीं । एका जनार्दनीं स्थिर झाला ॥६॥

२५०

ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥१॥

सावध हो उनी गडी ते पहाती । स्थिर पई होती यमुना ते ॥२॥

एकाजनार्दनीं ऐसा दासाचा कळवळा । म्हणोनि भक्तलळा पाळितसे ॥३॥

२५१

येवोनि गोपाळ कृष्णासी बोलतीं । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ॥१॥

धन्य बळीया आम्हीं की वो त्रिभुवनी । धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती अवनी ॥२॥

एका जनार्दनीं ऐकोनी तयांचे बोल । आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ॥३॥

२५२

पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥

देव म्हणे गोपाळ धन्य तुम्हीं बळी । पळविला बळी बाऊ तुम्हीं ॥२॥

ऐसें समाधान करी मनमोहन । एका जनार्दनीं चरणीं लागे ॥३॥

२५३

वाऊगे तें वायां । कुंथाकुंथी खेळावया ॥१॥

हा खेळ नोहेरे बरा । गाई आधी ते आवरा ॥२॥

करा आपुले स्वाधीन तेणें तुटेल बंधन ॥३॥

एका गुंतूं वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥

२५४

खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥

आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ सांडावया भाई ॥२॥

धांवती संवगडी पाठोंपाठ लवलाह्मा । गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥

येवोनि दीन मुख करिती हरिपुढें । एका जनार्दनीं तया पाहतां प्रेम चढें ॥४॥

२५५

गोपाळ म्हणती कान्हा । सांभाळीं आपुल्या गोधळा ।

पळतां सैराट धांवती राना । गेल्या ठेल्या त्या तुम्हीं जाणां ॥१॥

कान्होबा पुरे पुरे तुझी गडी । आम्हा गाईनें केली ओढाओढी ॥धृ॥

तूं बैससी टेकावरी । आम्हीं श्रमतों वेरझारीं ।

ऐसें कैसें तुझें मुरारी । आपुलीं गोधनें जतन करीं ॥२॥

तुझ्या न लगती आम्हां गाई । तुझी संगती पुरे भाई ।

जरी कोपेल तुझी आई । तरी करील आमचें काई रे ॥३॥

तुझी गोधनें सैराटें । दाहीं पळतां दाही वाटे ।

वळितां कष्ट होताती मोठे । ठेचा लागुनी फुटली । बोटें ॥४॥

पैल श्रवणीं पाहे गाये । ते साद होये तिकडे जाये ।

उभी क्षणभरीं न राहे । वळितां जाती आमुचे पाय ॥५॥

पैल सावळीं डोळे सुटी । देखोनि धांवे हिरवटी ।

वळीतां धाप न साहे पोटीं । ती तु सांभाळी जगजेठी ॥६॥

पैले हुंगी कैसा सुजाण । स्वाद घे परी न खाये तृण ।

इसी हिंडवया थोडकें रान । वळीतां जाती आमुचे प्राण ॥७॥

पैल चोरटी रसाळ रंगी । कळप सांडोनी वाढे वेगीं ।

वळितां न वळे ती आम्हालांगीं । तुझी संगत नको वेंगीं ॥८॥

पैल सर्वांग सुकुमार मोठी । चहूंकडे ती धांवत खोटीं ।

मऊ रान देखोनियां अंग लोटी । तिसी वळितं जालों हिंपुटी ॥९॥

पैल लोभिष्ट हुंबरे कैशी । उगा न राहे हुंबरे द्वेषी ।

वळीतसं न वळे ती आम्हांसी । ती तु सांभाळी हृषीकेशी ॥१०॥

पैल हाताळ वोढाळ येकी । तेणे पाते गुड हाकी ।

ऐशी खट्याळ नाहीं आणिका । वळितां वळित्या घेती निकी ॥११॥

पैल पाय करिती भारी । उभी न राहे क्षणभरीं ।

वळतां शिणलों बहु मुरारी । तें तुं आपुलें जतन करीं ॥१२॥

पैल पोटफुगी खादाड । कैशी खाउनी हागे बाड ।

धुतां कधींच नव्हे धड । तुझीं गोधने न लगती गोड ॥१३॥

पैल मुतरीं मुंजी लांडी । कैशी सांचलीं घेत होडी ।

धांवे जेथें गोड लागे तोंडीं । वळतां पडती आमुची मुरकुंडी ॥१४॥

पैल मनमोहन सुंदर । कोणें काळी नव्हें स्थिर ।

इसी हिंदावया थोर वावर । हांव धरुनी धावती फार ॥१५॥

ऐसी गोधनें आमुच्या माथां । घालूं पहातोसी अनंता ।

एका जनार्दनीं विनवितं कृपा आली आलिंगी निजभक्ता ॥१६॥

२५६

काकुलते गोपाळ म्हणती रे कान्हया । गाई न येती माघारी कोन बळी कासया ॥१॥

आमुची खुंटली गति आवरीं तुं हरी । तुजवांचुनी कोण रेखा आमुचा कैवारी ॥२॥

नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुणा करी ॥३॥

२५७

गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळां ॥१॥

घेउनी मोहरीं गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलें गोपाळा सकळां ॥२॥

नको वेरझारा पुरे आतां हरी । एका जनार्दनीं ऐशी करुना करी ॥३॥

एका जनार्दनी विश्वांचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिला सर्वासी ॥४॥

२५८

भक्तांसी सान न धरीच मान । खाय भाजीपान भाविकांचें ॥१॥

उच्छिष्टांची आस धरुनिया जीवीं । गोकुळीं तें दावी चोज सर्व ॥२॥

खेळे विटिदांडुं हमामा हुंबरी । वाजवी मोहरी सवंगडियासी ॥३॥

एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनि तिष्ठत उभा असे ॥४॥

२५९

काळे गोरे एकापुढें एक । धांवताती बिदो बिदीं देख ।

अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ॥१॥

गाईवत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा ।

जो नये वेदा अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ॥२॥

जें योगिजनांचे ध्येय ध्यान । ज्याकरणें अष्टांग योगसाधन ।

तयांसि नोहे कधीं दृश्यमान । तो गौळ्यांचें उच्छिष्ट खाय जाण गे माय ॥३॥

एका जनार्दनीं व्यापक । सर्वां ठायीं समसमान देख ।

अरिमित्रां देणें ज्यांचे एक । तो हा नायक वैकुठींचा ॥४॥

२६०

कृष्ण देखतांचि गेलें । शेखीं बुडविली महिमान ॥१॥

भली नव्हें हे कृष्णगती । सखे पळविलें सांगाती ॥२॥

मायेचा करविला बंदु । शमशमादि पळविलें बंधु ॥३॥

द्रष्टा दृश्य आदि दर्शन । तिन्हीं सांडिलें पुसुन ॥४॥

ब्रह्माहमास्मि शुद्ध जाण । तेथील शून्य केला अभिमान ॥५॥

एका जनार्दनाची प्राप्ती । ज्ञान अज्ञान हारपती ॥६॥

२६१

करुनियां काला सर्व आले गोकूळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ॥१॥

वोवाळिती श्रीमुख कुर्वडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ॥२॥

जाहला जयजयकार आनंद सकळां । एका जनार्दनीं धणी पाहतां डोळां ॥३॥

२६२

जाहला अस्तमान आले गोकूळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळां ॥१॥

जाती सवंगंडी आपुलाले घरां । राकाकृष्ण दोघे आले मंदिरां ॥२॥

नानापरीचीं पक्कान्नें वाढिती भोजना । यशोदा रोहिणी राम आणि कृष्णा ॥३॥

एका जनार्दनीं पहुडले देव । गोकुळामाजीं दावी ऐसें लाघव ॥४॥

२६३

अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ॥१॥

आपुलिया गृहीं रामकृष्ण आले । यशोदेनें केलें निंबलोण ॥२॥

षड्रस पक्वान्नीं विस्तारिलें ताट । जेविती वैकुंठ नंदासवें ॥३॥

नंदासवें जेवीं वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्यांची ॥४॥

एका जनार्दनीं ऐसी लीला खेळे । परब्रह्मा सांवळें कृष्णरुप ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel