१५९१

धन जयासीं मृत्तिका । जगीं तोचि साधु देखा ॥१॥

ज्यासी नाहीं लोभ आशा । तोचि प्रिय जगदीशा ॥२॥

निवारले क्रोधकाम । तोचि जाणा आत्माराम ॥३॥

एका जनार्दन पाय धरी । भुक्ति मुक्ति नांदे घरीं ॥४॥

१५९२

साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी ॥१॥

जयापाशी नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥२॥

ऋद्धिसिद्धि त्यांच्या दासी । भुक्ति मुक्ति पायांपाशी ॥३॥

एका जनार्दनीं साधु । जयापाशी आत्मबोधु ॥४॥

१५९३

सर्वांभुतीं दया । साधु म्हणावें ऐशिया ॥१॥

जग ब्रह्मरुप जाण । हेंचि सांधुचें लक्षण ॥२॥

सर्वाभुतीं समदृष्टी । तोचि साधु इये सृष्टी ॥३॥

एका जनार्दनीं संत । नित्य साधी आत्महित ॥४॥

१५९४

ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जगीं सिद्ध ॥१॥

लोभ मोह नाहीं ज्याशी । तोचि साधु निश्चयेंसी ॥२॥

गेले मद आणि मत्सर । साधु तोचि निर्विकार ॥३॥

एका जनार्दन साधु । त्याचे चरण नित्य वंदूं ॥४॥

१५९५

वेधिलें ज्यांचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥१॥

प्रपंच परमार्थ त्यासी पैं सारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥२॥

एका जनार्दनीं एकरुप भाव । नाहीं भेदा ठाव तये ठायीं ॥३॥

१५९६

देहीं असोनी विदेही । चाले बोले सदा पाही ॥१॥

असे अखंड समाधी । नसे कांहीं आधिव्याधी ॥२॥

उपाधीचे तोडोनी लाग । देहीं देहपणें भरिलें जग ॥३॥

एका जनार्दनीं संग । सदा समाधान सर्वाग ॥४॥

१५९७

काम क्रोध नाहीं अंगीं । तोचि नर जन्मला जगीं ॥१॥

तयाचें होतां दरुशन । तुटे देहाचें बधन ॥२॥

अरुणोदयीं जाण । तम निरसे सहज आपण ॥३॥

एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥४॥

१५९८

जें जें बोले तैसा चाले । तोचि वहिलें निवांत ॥१॥

अंगी असोनी जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥२॥

निंदा अथवा वंदा । नाहीं विषय ती बाधा ॥३॥

शांतीचा मांदूस । भरला असे सदोदित ॥४॥

एका जनार्दनीं धन्य । त्याचें दरुशन जगमान्य ॥५॥

१५९९

मज कोनी न देखावें । मज कोणी नोळखावें ॥१॥

मान देखोनियां दृष्टी । पळे देह उपेक्षा पोटी ॥२॥

मी एक लौकिकी आहे । ऐसें कवणा ठावें नोहे ॥३॥

सांडावया अहं ममता । मान न पाहे सर्वथा ॥४॥

त्याचे पोटीं दृढ अभिमान । तो सदा इच्छि सन्मान ॥५॥

सन्मान घ्यावया सर्वथा । ज्ञातेपण मिरवी वृथा ॥६॥

ऐसा निरपेक्ष सज्ञानी । एका शरण जनार्दनीं ॥७॥

१६००

ऐशीं शांती ज्यासी आहे । त्याचे घरीं देव राहे ॥१॥

हा अनुभव मनीं । पहा प्रत्यक्ष पुराणीं ॥२॥

धर्माघरीं वसे । अर्जुनाचे रथीं बैसे ॥३॥

अंकित दासाचा होय । एका जनार्दनीं देव ॥४॥

१६०१

आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष । तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥

वैराग्याचें कवच अंगीं । नाचताती प्रेमरंगीं । ज्ञान शस्त्र तें निसंगीं । छेदिती संग ॥२॥

अनुभव तीक्ष्ण शर । सोडिताती निरंतर । वर्मी खोचले तें वीर । क्रोधादि असुर ॥३॥

सांडोनि देहाभिमान । तोचि जीवन्मुक्त जाण । एका जनार्दना शरण । रामकृष्ण जपताती ॥४॥

१६०२

भाग्यवंत श्रीहरीचे दास । धरितां कास तारिती ॥१॥

धन्य त्यांचा उपकार । पावविले पार बहुत ॥२॥

वर्णितां त्यांचें उत्तम गुण । होय जन्मांचेंखंडन ॥३॥

शरण एका जनार्दनीं । धन्य धन्य तुमची वाणी ॥४॥

१६०३

विठ्ठल नाम घेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊनियां वंदिती पायां ॥१॥

धन्य धन्य हरिभक्त जगीं । वाहाताती टाळी नाचताती रंगीं ॥२॥

पेमभरित सदा करिती कीर्तन । एका जनार्दनीं वंदूं तयाचे चरण ॥३॥

१६०४

हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥

धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥

हरुषे नाचे कीर्तनांत । प्रेम न खंडे शुद्ध चित्त ॥३॥

एका जनार्दनीं शरण । वंदीन तयाचे चरण ॥४॥

१६०५

सदा सर्वकाळ वाचे । नाम जया श्रीहरीचें ॥१॥

धन्य जन्मोनी संसारीं । सदा मनीं धरी हरी ॥२॥

रात्रंदिवस ध्यानीं मनीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥

१६०६

आसनीं भोजनीं शयनीं । जो चिंती रुप मनीं ॥१॥

जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्यान रुप चित्तीं ॥२॥

नसे आणिके ठायीं मन । एका शरण जनार्दन ॥३॥

१६०७

न्याय मीमांसा सांख्य पातंजली । व्याकरण वेदांत बोली सर्व एक ॥१॥

ते माझे सोई रे जिवलग जीवाचे । जे अधिकारी साचे संतजन ॥२॥

एका जनार्दनीं मन तया ठायीं । होऊनिया पायीं उतराई ॥३॥

१६०८

ऐसें जाणोनि वेदमत । संतसेवा सदोदित ॥१॥

पुराणे शास्त्रें अनुवादिती । संतसेवन दिनरातीं ॥२॥

संतचरणीं ज्यांचें मन । तयां सुखा काय उणें ॥३॥

एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥

१६०९

भाग्य उजळलें आतां । संत सभाग्यता भेटले ॥१॥

पाप ताप दैन्य गेलें । संत पाउलें देखतां ॥२॥

तुटली बंधनाची गांठी । पाय पोटीं आठवितां ॥३॥

एका जनार्दनीं शरण । संतचरण दुर्लभ ॥४॥

१६१०

ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसें जाणती ते अति दुर्गम । तयांची भेटी जालिया भाग्य परम ॥१॥

ऐसें कैसियानें भेटती ते साधु । ज्यांचा अतर्क्य तर्कवेना बाधू । ज्यासी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमनांदी उद्धोधु ॥२॥

पवना घालवेल पालाण । पायीं चढवेल गगन । भुत भविष्य कळों येईल वर्तमान । परी त्य साधूचें न कळे महिमान ॥३॥

चंद्रामृत सुखें सेववेल । रवि अस्ता जातां धरवेल । बाह्मा हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल ॥४॥

जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान । ज्ञेय ज्ञाता विवर्जित ज्ञान । ज्ञाना ध्यानाचे मुळ हे साधुजन ॥५॥

निजवृत्तीचा करवेल विरोधु । जीवाशिवाचा भोगवेल आनंदु । एका जनार्दनीं निजसाधु । त्याच्या दर्शनें तुटे भवबंधु ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel