६९१

जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागें ॥१॥

ऐसा उदार पंढरीराणा । पुरवी खुणा मनींच्या ॥२॥

एक वेळ दरुशनं । तुटतीं बंधनें निश्चयें ॥३॥

एका जनार्दनीं ऐक्याभावें । काया वाचा मनें गावें ॥४॥

६९२

सकळ सुरां मुगुतमणीं । जो का त्रैलोक्याचा धनी ।

भक्ता अभयदानी । उदारपणें ठाकला ॥१॥

आठवावा वेळोवेळां । भय नाहीं कळिकाळा ।

लागलासे चाळा । न फिरोचि माघारीं ॥२॥

मागां बहुतां अनुभव । तारियेले पापीं सर्व ।

एका जनार्दनीं स्वयमेव । पंढरीराव पुरवीत ॥३॥

६९३

न धरी लौकिकाची लाज । तेणे सहज नामगावें ॥१॥

अनायासेंदेव हातां । साधन सर्वथा दुजे नाहीं ॥२॥

साधन तें खटपट । नाम वरिष्ठ नित्य गावें ॥३॥

एका जनार्दनीं सोपा । विठ्ठलनाम मंत्र जपा ॥४॥

६९४

बोल बोलता वाचें । नाम आठवींविठ्ठलाचें ॥१॥

व्यर्थ बोलणें चावटी । नामावांचुनी नको होटी ॥२॥

नाम हें परमामृत । नामें पावन तिन्हें लोक ॥३॥

नाम सोपें भूमंडळीं । महापापां होय होळी ॥४॥

एका जनार्दनीं शरण । नाम पतीतपावन ॥५॥

६९५

चांदाळादि ब्राह्मण सर्व नारिनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥

नामाविण गति नसेचि आणिक । वैकुंठनायक सुलभ देखा ॥२॥

नाम विठोबांचे घ्यावें निशिदिनीं । चौर्‍यांशंची खाणी तेव्हा चुकें ॥३॥

एका जनार्दनीं पूर्णता एकपणीं । नाम घ्या निशिदिनीं सर्वकाळ ॥४॥

६९६

विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्याय । विठ्ठलासी पाहे वेळोवेळां ॥१॥

विठ्ठल विसावा सोडवला जीवां । म्हणोनि त्याच्या गांवा जावें आधीं ॥२॥

विठ्ठलावाचुनी सोयरा जिवलग । विठ्ठलाचि मार्ग जपा आधीं ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठलावांचोनि । दुजा नेणे स्पप्नी संग कांही ॥४॥

६९७

त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठ्ल ॥१॥

तया गावें वेळोवेळी । आणीक चाळा विसरुनी ॥२॥

संसाराचें नुरे कोड । पुरे चाड अंतरीची ॥३॥

एका जनार्दनीं शरण । देव स्वयें तिष्ठे आपण ॥४॥

६९८

करावें पुजन मुखीं नामस्मरण । अनुदिनीं ध्यान संतसेवा ॥१॥

आणिक न लगे यातायाती कांहीं । वाचें विठोबाई वदे कां रे ॥२॥

एका जनार्दनीं संतांचे सांगात । त्यांचे वचनें मात कळों येत ॥३॥

६९९

बरें वा वाईट नाम कोणी घोका । तो होय सखा विठोबाचा ॥१॥

कोणत्या सहावासें जाय पंढरीसी । मुक्ति दारापाशी तिष्ठे सदा ॥२॥

विनोदें सहज ऐके कीर्तन । तया नाहीं पतन जन्मोजन्मीं ॥३॥

एक जनार्दनीं ऐशीं माझी भाष । धरावा विश्वास विठ्ठलनामीं ॥४॥

७००

धरा अंतरीं शुद्ध निष्ठा । पहा श्रेष्ठा विठ्ठला ॥१॥

वाचें उच्चरितां सहज । अधोक्षज तोषतो ॥२॥

सहज अमृत पडतां मुखीं । होय शेखीं अमर तो ॥३॥

नामामृत घेतां वाचे । कोटी जन्मांचे सार्थक ॥४॥

एका शरण जनार्दनीं । घेत नामामृत संजीवनीं ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel