३८१

बहु मार्ग बहुतापरी । परी न पावती सरी पंढरीची ॥१॥

ज्या ज्या मार्गे जातां वाता । कर्म कर्मथा लागती ॥२॥

जेथें नाहीं कार्माकार्मा । सोपें वर्म पंढरीये ॥३॥

न लगे उपास तीर्थविधी । सर्व सिद्धि चंद्रभागा ॥४॥

म्हणोनि पंढरीसी जावें । जीवेभावें एका जनार्दनी ॥५॥

३८२

व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतित चिंतनी । येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ॥१॥

मिळोनि सर्वांची मेळ । गाती नाचती कल्लोळ । विठ्ठल स्नेहाळ । तयालागीं पहाती ॥२॥

करिती भीवरेचें स्नान । पुंडलिका अभिवंदन । एका जनार्दनीं स्तवन । करिती विठ्ठलाचें ॥३॥

३८३

देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ॥१॥

म्हणती जावें पंढरपुरा । पाहूं दीनांचा सोयरा ॥२॥

आनंदें सनकादिक । पाहूं येती तेथें देख ॥३॥

विठ्ठलचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

३८४

देव भक्त एके ठायी । संतमेळ तया गांवीं ॥१॥

तें हें जाणा पंढरपुर । देव उभा विटेवर ॥२॥

भक्त येती लोटांगणीं । देव पुरवी मनोरथ मनीं ॥३॥

धांवे सामोरा तयासी । आलिगुन क्षेम पुसीं ॥४॥

ऐशी आवडी मानी मोठी । एका जनार्दनीं घाली मिठी ॥५॥

३८५

उभारुनी ब्राह्मा पाहतसे वाट । पीतांबर नीट सांवरुनी ॥१॥

आलियासी इच्छा मिळतसे दान । जया जें कारण पाहिजे तें ॥२॥

भुक्ति मुक्ति तेथें लोळती अंगणीं । कोन तेथें मनीं वास नाहीं ॥३॥

कामधेनु कल्पतरु चिंतामणी । लोळती अंगणीं पढरीये ॥४॥

एका जनार्दनीं महा लाभ आहे । जो नित्य न्हाये चंद्रभागे ॥५॥

३८६

जो परात्पर परेपरता । आदि मध्य अंत नाहीं पाहतां ।

आगमानिगमां न कळे सर्वथा । तो पंढरीये उभा राहिला ॥१॥

धन्य धन्य पाडुरंग भोवतां शोभें संतसंग ।

धन्य भाग्याचे जे सभाग्य तेचि पंढरी पाहती ॥२॥

निरा भिवरापुढें वाहे । मध्य पुडंलीक उभा आहे ।

समदृष्टी चराचरी विठ्ठल पाहें । तेचि भाग्याचे नारीनर ॥३॥

नित्य दिवाळी दसरा । सदा आनंद पंढरपुरा ।

एका जनार्दनी निर्धार । धन्य भाग्याचे नारी नर ॥४॥

३८७

तयां ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ॥१॥

तें हें जाणा पंढरपूर । उभ देव विटेवरी ॥२॥

आलिंगनें काया । होतासे तया ठाया ॥३॥

चंद्रभागे स्नान । तेणें पुर्वजा उद्धरणा ॥४॥

एका जनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुंठ जाण ॥५॥

३८८

पंढरीये अन्नादान । तिळभरी घडती जाण ॥१॥

तेणें घडती अश्वमेध । पाताकापासोनि होती शुद्ध ॥२॥

अठरा वर्न यती । भेद नाही तेथें जाती ॥३॥

अवघे रंगले चिंतनीं । मुर्खी नाम गाती कीर्तनीं ॥४॥

शुद्ध अशुद्धची बाधा । एका जनार्दनीं नोहे कदा ॥५॥

३८९

वसती सदा पंढरीसी । नित्य नेमें हरी दरुशनासी । तयां सारखे पुण्यराशी । त्रिभुवनीं दुजे नाहीत ॥१॥

धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढे पुंडलीक समोर । तेथें स्नान करती नर । तयां जन्म नाहीं सर्वथा ॥२॥

करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्याच्यां पार नाहीं पुण्या । जगीं धन्य ते मान्य । एका जनार्दनीं म्हणतसे ॥३॥

३९०

पाहुनियां पंढरीपुर । मना आनंद अपार ॥१॥

करितां चंद्रभागें स्नान । मना होय समाधान ॥२॥

जातां पुंडलीकाचे भेटीं । न माय आनंद त्या पोटीं ॥३॥

पाहतां रखुमादेवीवर । मन होय हर्षनिर्भर ॥४॥

पाहा गोपाळपूर वेणूनाद । एका जनार्दनी परमानंद ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
श्यामची आई
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
कथा: निर्णय
गावांतल्या गजाली
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
रत्नमहाल