१८०१
वेदान्त सिद्धांत पाहणें ते आटी । जनार्दन भेटी निरसली ॥१॥
आगम निगम कासया दुर्गम । जनार्दन सुवर्म सांगितलें ॥२॥
न्यायमीमांसा पांतजली शास्त्रें । पाहतां सर्वत्र निवारलें ॥३॥
एका जनार्दनीं पूर्ण कृपा केली । भ्रांती निरसली मनाची ते ॥४॥
१८०२
गुरुच्या उपकारा । उत्तीर्ण नव्हे गा दातारा ॥१॥
माझें रुप मज दाविलें । दुःख सर्व हारविलें ॥२॥
तन मन धन । केलें गुरुसी अर्पण ॥३॥
एका जनार्दनीं आदर । ब्रह्मारुप चराचर ॥४॥
१८०३
दृष्टी देखे परब्रह्मा । श्रवनीं ऐके परब्रह्मा ॥१॥
रसना सेवी ब्रह्मारस । सदा आनंद उल्हास ॥२॥
गुरुकृपेचें हे वर्म । जग देखें परब्रह्मा ॥३॥
एका जनार्दनीं चराचर । अवघे ज्यासी परात्पर ॥४॥
१८०४
देवाचरणीं ठाव । तैसा गुरचरणीं भाव ॥१॥
गुरु देव दोन्हीं समान । ऐसें वेदांचें वचन ॥२॥
गुरु देवमाजीं पाहीं । भिन्न भेद नाहीं नाहीं ॥३॥
देवा पुजितां गुरुसी आनंद । गुरुसी पुजितां देवा परमानंद ॥४॥
दो नामाचेनि छंदें । एका जनार्दनीं परमानंदें ॥५॥
१८०५
श्रीगुरुंचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्रं ॥१॥
श्रीगुरुचें चरणत्रीर्थ । सकळां तीर्था करी पवित्र ॥२॥
श्रीगुरुच्या उपदेश । एका जनार्दनीं तो रस ॥३॥
१८०६
श्रीगुरुचें नाममात्र । तेंचि आमुचें वेदशास्त्र ॥१॥
श्रीगुरुंचे तीर्थ मात्र । सकळ तीर्था करी पवित्र ॥२॥
श्रीगुरुंचे चरणरज । तेणें आमुचें जाहलें काज ॥३॥
श्रीगुरुंची ध्यानमुद्रा । तेंचि आमुचि योगनिद्रा ॥४॥
एका जनार्दनीं मन । श्रीगुरुचरणीं केलें लीन ॥५॥
१८०७
श्रीगुरुच्या चरणागुष्ठीं । वंदिती ब्रह्मादी देव कोटी ॥१॥
सकळ वेदांचि निजसार । श्रीसदगुरु परात्पर ॥२॥
श्रीगुरु नांव ऐकतां कानीं । यम काळ कांपतीं दोनी ॥३॥
सदगुरुसी भावें शरण । एका जनार्दनीं नमन ॥४॥
१८०८
गुरु परमत्मा पुरेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वयें संचला त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनीं गुरुदेव । येथें नाहीं बा संशय ॥३॥
१८०९
तारिलें वो येणें श्रीगुरुनायके । बोधाचिये कासे लावुनि कवतुकें ॥१॥
या भवसागरीं जलासी तुं तारुं । परतोनियां पाहो कैंचा मायापुरु ॥२॥
एका जनार्दनीं कडिये । संचला प्रपंच लाउनी थडीये ॥३॥
१८१०
गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥
थोर पडतां सांकडें । गुरु रक्षी मागें पुढें ॥२॥
काया वाचा आणि मन । गुरुचरणींच अर्पण ॥३॥
एका जनार्दनीं शरण । गुरु एक जनार्दनीं ॥४॥
१८११
आमुचिये कुळीं दैवत सदगुरु। आम्हांसी आधारु पाडुरंग ॥१॥
सदगुरु आमुची माता सदगुरु तो पिता । सदगुरु तो भ्राता आम्हालांगीं ॥२॥
इष्ट मित्र बंधु सज्जन सोयरे । नाहीं पै दुसरें गुरुवीण ॥३॥
सदगुरु आचार सदगुरु विचार । सदगुरुचि सार साधनांचें ॥४॥
सदगुरुचि क्षेत्र सदगुरु तो धर्म । गुरुगुह्मा वर्म आम्हांलागीं ॥५॥
सदगुरु तो यम सदगुरु नियम । सदगुरु प्राणायाम आम्हांलागीं ॥६॥
सदगुरु तो सुख सदगुरु तो मोक्ष । सदगुरु प्रत्यक्ष परब्रह्मा ॥७॥
सदगुरुचें ध्यान अखंड हृदयीं । सदगुरुच्या पायीं वृत्ती सदा ॥८॥
सदगुरुचें नाम नित्य आम्हां मुखीं । गुणातीत सुखी सदगुरुराज ॥९॥
एका जनार्दनीं गुरुकृपादृष्टीं । दिसे सर्व सृष्टी परब्रह्मा ॥१०॥
१८१२
म्यां गुरु केला म्यां गुरु केला । सर्व बोध तेणें मज दिधला ॥१॥
घालुनियां भक्ति अंजन । दावियेलें विठ्ठलनिधान ॥२॥
कान फुकुनि निगुती । दिधलें संताचिये हाती ॥३॥
एका जनार्दनीं गुरु बरा । तेणें दाविलें परात्परा ॥४॥
१८१३
गेलों गुरुलागीं शरण । माझें हारपलें मीतुपण ॥१॥
द्वैतभाव गेला देशोधडी । बोध दिठा मज संवगडी ॥२॥
मंत्र सांगे त्रिअक्षर । परात्पर निजघर ॥३॥
जपतां मंत्र लागलें ध्यान । सहज खुटलें मीतूंपण ॥४॥
एका जनार्दनीं समाधी । सहज तुटली उपाधी ॥५॥
१८१४
धन्य श्रीगुरुनाथें । दाखविलें पाय तुमचें ॥१॥
मी अभागी दातारा । मज तारिलें पामरा ॥२॥
करुनि दास्यत्व । राखियेलें माझें चित्त ॥३॥
ऐसा मी हीनदीन । शरण एका जनार्दनीं ॥४॥
१८१५
अभिनव गुरुनें दाखविलें । ओहं सोहं माझें गिळिलें ॥१॥
प्रपंचाचें उगवोनि जाळें । केलें षडवैरीयांचें तोंड काळें ॥२॥
उदयो अस्तावीण प्रकाश । स्वयें देहीं दाविला भास ॥३॥
मीपण नाहीं उरलें । एका जनार्दनीं मन रमलें ॥४॥
१८१६
धन्य गुरुकृपा जाहली । अहंता ममता दुर गेली ॥१॥
घालुनि अंजन डोळां । दाविला स्वयं प्रकाश गोळा ॥२॥
बोधी बोधविलें मन । नाहीं संकल्पासी भिन्न ॥३॥
देह विदेह निरसले । एका जनार्दनीं धन्य केलें ॥४॥
१८१७
सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥१॥
माझें मज दावियलें माझें मज दावियलें । उघडें अनुभविलें परब्रह्मा ॥२॥
रविबिंबापरी प्रकाश तो केला । अंधार पळविला कामक्रोध ॥३॥
बांधलों होतो मायाममतेच्या पाशीं । तोडिलें वेगेंसी कृपादृष्टी ॥४॥
एका जनार्दनीं उघडा बोध दिला । तोचि ठसावला हृदयामाजीं ॥५॥
१८१८
अनुभवें पंथें निरखिता देहभाव । देह नाहीं विदेहीं म्हणो वाव ।
लटिका नसतां साचार कैसा ठाव । गेला गेला समूळ भवाभाव ॥१॥
सदगुरुकृपें कल्याण ऐसें जाहलें । द्वैताद्वैत निरसुनी मन ठेलें ॥ध्रु॥
कैंचा भाव अभाव उरला आतां । देव म्हणें तोटा नाहीं भक्ता ।
समरस करितां तो हीन होतां । शून्य भरला सदगुरु जनार्दन दाता ॥२॥
ऐशी खुण दावितां गुरुराव । नुरेचि तात्काळ देहीं सोहंभाव ।
सुखदुःखाचा भेद गेला वाव । एका जनार्दनीं फिटला भेव ॥३॥
१८१९
सेवेची आवडी । आराम नाहीं अर्धघडी ॥१॥
नित्य करितां गुरुसेवा । प्रेम पडीभर होत जीवा ॥२॥
आळस येवोची सरला । आराणुकेचा ठावो गेला ॥३॥
तहान विसरली जीवन । भूक विसरली मिष्टान्न ॥४॥
जांभईसी वाव पुरता । सवड नाहींची तत्त्वतां ॥५॥
ऐसें सेवे गुंतलें मन । एका जनार्दनीं शरण ॥६॥
१८२०
माझे मज कळलें माझें मज कळलें । नाहीं परतें केलें आपणातुनीं ॥१॥
उदकीं लवण पडतां न निघे बाहेरीं । तैशी केली परी जनार्दनें ॥२॥
एका जनार्दनीं एकपणें भाव । सर्वाभूतीं देव दाखविला ॥३॥