८८१

तुमचें तुम्हां सांगतों साचें । मनें वाचे रामनाम ॥१॥

तेणें उतराल पैलथडी । चुकेल बेडी चौर्‍याशींची ॥२॥

प्रपंचाचें भोवर जाळें । यांत सगळे अटकाल ॥३॥

काया वाचा आणि मनें । एका जनार्दनीं आठवावा ॥४॥

८८२

नामें प्रायश्चिती शिक । हाचि देख परमार्थ ॥१॥

श्रेष्ठ नाम पावन जगीं । तरतीं अंगीं अधम जन ॥२॥

नेणती यांसी सोपें वर्म । जाणती कर्म सर्वही ॥३॥

कळाकुसरी कांहीं नका । वाचे घोका रामनाम ॥४॥

एका एकापणें मीनला । एका जनार्दनीं भेटला ॥५॥

८८३

विश्रांतीचें आसन घालुनियां जपा । मंत्र तोचि सोपा रामनाम ॥१॥

सर्व याती वर्णा आहे अधिकार । रामनाम उच्चार सोपा बहु ॥२॥

कल्पना अविद्या टाकुनी उपाधी । रामनामें समाधि उघड दिसे ॥३॥

एका जनार्दनीं नाम पवित्र परिकर । साधनाचें सार हेंचि एक ॥४॥

८८४

लावुनी आसन बैससी समाधी । तों तों उपाधी सहज लागे ॥१॥

नाममुखीं गातीं जोडे सायुज्यता । उपाधि तत्त्वतां दूरी पळे ॥२॥

घडती कोटी यज्ञयागांचें तें फळ । मुखीं रामनाम सबळ असो ॥३॥

एका जनार्दनीं जयी ऐसा नेम । तोचि पुरुषोत्तम जनामाजीं ॥४॥

८८५

देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखीं सदा ॥१॥

काया वाचा मनें संतासींशरण । तेणें नारायण तुष्ट होय ॥२॥

नामापरतें साधन आणीक नाहीं दुजें । एका जनार्दनीं निज नाम सार ॥३॥

८८६

कळिकाळसी दरारा । रामनाम स्मरण करा ॥१॥

भुक्ति मुक्ति लागती पायां । करितां दया वैष्णवांनीं ॥२॥

सुगम सोपें हेंचि वर्म । नको श्रम मज दुजा ॥३॥

एका जनार्दनीं नाम सार । नाहीं बडिवार दुसरा ॥४॥

८८७

देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तूं गाये सदोदित ॥१॥

कला हें कौशल्या अवघे विकळ । मंगळां मंगळ रामनाम ॥२॥

एका जनार्दनीं नाम मुखीं गातां । मुक्ति सायुज्यता पाठीं लागे ॥३॥

८८८

जगामाजीं कीर्ति ऐक श्रीराम । वाउगा तुं श्रम न करीं जना ॥१॥

सदा सर्वकाळ आठवी वेळोवेळां । मग सुखसोहळा काय उणें ॥२॥

येणें यातायाती चुकती संसार । भवभ्रम निर्धार दुरी ठाके ॥३॥

सांपडलें वर्म आम्हां इह जनीं । एका जनार्दनीं नाम गाऊं ॥४॥

८८९

जयां नामाचा विश्वास । धन्य तेंचि हरिचे दास । वंदीन पायंस । वारंवार तयांच्या ॥१॥

कुळ तारिलें सकळ । वाचे नामावळी अढळ । गाती रामनाम सरळ । नोहे क्षण आराणूक ॥२॥

ते भाग्याचे नरीनर । ज्यांचा ऐसा निर्धार । एका जनार्दनीं साचार । दृढ भाव रामनामीं ॥३॥

८९०

भवरोगियांसी औषध हें नाम । सेवावे परम आवडीनें ॥१॥

सर्वकाळ करा नामाचें चिंतन । सदा समाधान होय तेणें ॥२॥

एका जनार्दनीं रामनामीं वृत्ती । वृत्तीची निवृत्ती सहज होय ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel