सूर चढूं लागला

गंगा आरंभी लहान परन्तु पुढें एवढी विशाल होते कीं, मोठमोठीं गलबतें तिच्यांतून जा ये करितात.  वामनाचें पाऊल प्रथम लहान असलें तरी पुढे त्या पावलांत त्रिभुवन सामावतें.  सूर्याचे बिंब प्रथम बेचक्याएवढें दिसतें, परन्तु पुढें त्याच्या तेजाने सारे विश्व धवलते. वटवृक्षाचे बी मोहरीहून बारीक असतें, परन्तु पुढे त्याचा विस्तार वर आकाशाला, खाली पाताळाला व सभोवती दशदिशांना कवटाळतो.

सर्व थोरांचे असेंच आहे.  सर्व सुंदर वस्तूंचे असेंच आहे.  लहानशी कळी, परन्तु वाढत वाढत शेवटी सर्वत्र सुगंध पसरते व त्यांना उतावीळ नसते.  कलाकृति घाईने होत नाहीत.  सुंदर गोष्टी घाईने होत नाहीत.  आई नवमास गर्भ वाढवते व मग सुंदर बाळ जन्मास येते.  विनतेने घाई केली तर पांगळा अरुण मिळाला.  परन्तु तिनें धीर धरला व विष्णूला पंखावर घेऊन ऊड्डाण करणारा गरुड जन्मास आला.

ऊत्कृष्ठ गवयाच्या गाण्यांत प्रथम रंग भरत नाही.  अधीर लोक कांही अर्थ नाही म्हणून ऊठून जातात.  परन्तु जे धीराने बसतात, त्यांना संगीताची अमर मेजवानी प्राप्त होते.  उत्कृष्ट भावनाप्रधान वक्ता आधी हलक्या आवाजांत सुरुवात करतो, परन्तु पुढें आवाज एवढा वाढतो की, लाखांना खुशाल ऐकूं जावा.

महात्माजी असेच कलावान आहेत.  कर्मकुशलता म्हणजे योग.  महात्माजींजवळ अधीरपणाला वाव नाही.  ऊतावीळपणा नाही.  परन्तु निश्चित ध्येय डोळयांसमोर अखंड असते. स्वत:च्या सामर्थ्याचा आत्मप्रत्यय असल्यामुळे ते सदैव आशावान असतात. सिंह, कुत्र्यांप्रमाणे येता जाता भुंकत नाही बसत.  परन्तु वेळ आली म्हणजे अशी घनगर्जना करतात की, सारे चुपचाप बसतात.

महायुध्द सुरू झाल्यापासून महात्माजींचा सूर कसा हळु होता.  पुन:पुन्हा ब्रिटिशांची ते नाडी पहात होते.  शत्रूच्या ऊद्गारांत अधिकांत अधिक अर्थ पहावा. त्याच्यावर जास्तीत जास्त विश्वास प्रकट करून त्याच्याजवळ बोलणे करायला जावे.  परन्तु शेवटी प्रतिपक्षाचे दुष्ट नष्ट स्वरूपच प्रकट व्हावे. महात्माजींच्या या सत्याग्रही वृत्तीमुळे सरकारचे अंतरंग अधिकच काळेकुट्ट दिसते.  या पार्श्वभूमीवर नोकरशाहीचें कुटिल व हिडिस स्वरूप अधिकच स्पष्टपणे सर्व जगाच्या नजरेस भरतें.  महात्माजींच्या बाजूला जास्तींत जास्त नैतिक सामर्थ्य येऊन ऊभे रहातें.

व्हॉइसरायांना भेटून आल्यावर कांही निष्पन्न झालें नाहीं असें जरी महात्माजी म्हणत होते तरी 'अद्याप दार लागलें नाहीं.  अजून वाटाघाटींची शक्यता आहे ' असे त्यांनी लिहून ठेवलें.  त्या लेखांत, केव्हा लढयाची वेळ येईल याचा नेम नाहीं तरी जनतेनें तयारीनें असावें, असाहि इशारा त्यांनी दिला होता.  त्यानंतर लॉर्ड झेटलंड ह्यांचे तें उपमर्दकारक भाषण झालें.  त्याला महात्माजींनी स्पष्ट उत्तर दिलें, व इंग्लंडला निश्चितपणें बजावलें कीं भारताला स्वातंत्र्याची उत्कट इच्छा आहे, हें मी गंभीरपणें सांगूं इच्छितों. त्यानंतर पुन्हां त्यांनी जो परवां लेख लिहिला आहे, त्यांत ब्रिटिश सरकार हिंदुस्थानावरची पकड दूर करूं इच्छित नाहीं ही दु:खाची गोष्ट आहे, असें सांगितलें आहे.  हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याची ब्रिटिशांची इच्छा नाही, इच्छा असती तर मार्ग सापडता.  हिंदी स्वातंत्र्याच्या आड ब्रिटिश लोकांनीं चार धोंडे ऊभे केले आहेत.  युरोपियन लोकांचे हिंतसंबंध, लष्कर, संस्थाने व जातीय तेढ या चार दगडांच्या आड ब्रिटिश सरकार लपत आहे.  त्यांना आपली पिळवणूक व लूट कायम करायची आहे.

युरोपियन [त्यांत ब्रिटिश आलेच]  व्यापा-यांचे कोट्यवधि भांडवल येथें गुंतलेलें आहे.  कोट्यवधि रुपयांचे त्यांचे कर्ज हिंदुस्थान सरकारला आहे.  ही चंदी सुखासुखी ब्रिटिश व युरोपियन व्यापारी कशी सोडणार? हिंदुस्थान आपलें संरक्षण कसें करणार ही दुसरी चिंता इंग्रजांना आहे.  पहिल्या चिंतेंतून ही दुसरी चिंता उत्पन्न झाली आहे.  हिंदुस्थानची चिंता इंग्लंडला का?  त्यांचे अपरंपार भांडवल गुंतलेलें आहे म्हणून. हा हिंदी संरक्षणाच्या प्रेमाचा पुळका नसून स्वत:ची लूट चालावी म्हणून हें सारें आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel