प्रश्नोत्तरें  ४

[ एकदां राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक माझामित्र भेटला होता.  त्याचीं माझीं प्रश्नोत्तरे देत आहें.]

प्रश्न :-- तूं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कां नावें ठेवतोस? देशातील तरुण नीट सुसंघटित होऊं नयेत असें का तुला वाटतें?
उत्तर :--  असें कोणाला वाटेल?  आपल्या देशांतील मुलीमुलें नीट सुसंघटित, चपळ, संघटित, तेजस्वी, कणखर होऊं नयेत असें का मला वाटतें ?   कसा तरी वेडावांकडा ऊभा राहतो, कोठे तरी बघतो, सद्रयाला गुंडी नाहीं, टोपी कशी तरी डोक्यावर घातलेली, असा बावळट मुलगा अत:पर हिंदुस्थानांत असूं नये, असें मलाहि वाटतें.

प्रश्न
:-- मग अशा चळवळीस कां विरोध? का तुम्ही अहिंसावादी आहांत म्हणून विरोध?  परंतु हिंदुस्थानला लष्करी शिक्षणाची जरूर नाहीं का?
उत्तर :-- उगीच वेडयासारखें बोलूं नकोस.  लष्करी शिक्षण नकों असें कोण म्हणतो?  बिहारमध्ये लष्करी शिक्षण देण्यासाठी कॉलेज निघणार आहें.  श्री. गोपालचारी यांनी तरुणांस लष्करी शिक्षण घ्या असा उपदेश केला.  इतर कां. मंत्रिमंडळेहि या बाबतींत लक्ष घालणार आहेत.  उद्यां स्वराज्य मिळालें तर आम्हांस लष्कर ठेवावें लागेल.  महात्माजी मागें म्हणाले होते 'लष्कर ठेवावेंच लागणार नाहीं असा काळ अद्याप माझ्या डोळयांसमोर नाही.  माझीं ध्येयें प्रत्यक्ष संसारांत यावयास अद्याप ५-१० हजार वर्षें लागतील.'  स्वत: महात्माजींनीं ३० साली ज्या ११ मागण्या मागितल्या, त्यांत शस्त्रास्त्रें वापरण्यास परवानगी असावी असे मागितलें होतें.  शस्त्रास्त्रें हातीं असूनहि तीं अहिंसेनें न वापरणें ही निराळी गोष्ट आहे.  अहिंसा बुळयांची नसून बलवंतांची आहे.  महात्माजींनी दुबळेपणाला कांहीं उत्तेजन दिलें नाहीं.

प्रश्न
:-- मग आमच्या या चळवळीस कां विरोध? अडचण कोठें येते?
उत्तर :-- तुम्ही हिंदुस्थानचे तुकडे करूं पाहतां.  हिंदुस्थान हिंदूंचा हा मंत्र मला योग्य वाटत नाहीं.  तुम्ही हिंदुस्थान हिंदूंचा म्हणतां, मग मुसलमान म्हणतात उत्तर हिंदुस्थान मुसलमानांचा बनवा.  एक अखंड भारत बनवावा असें आम्हांला वाटतें.  आपण तें ध्येय डोळयांपुढें ठेवून वागले पाहिजे.  येथें जे मुसलमान आहेत ते का परदेशांतून येथे आले आहेत?  आपलेच ते जातभाई होते.  स्वधर्मांतील जुलमामुळें, परधर्मीयांच्या छळामुळें व कांही स्वत:च्या स्वार्थामुळें  या धर्मांत गेले.  हिंदुस्थानांत त्यांची जन्मभूमि व पितृभूमि, कोठें जाणार ते?  आज हिंदुस्थानांत एक कोटी ख्रिश्चन आहेत.  ते का या देशांतील नाहींत  येथेच ते हजारों वर्षें नांदत आले आहेत.  कोठें जातील ते?  सारांश, मुसलमान व ख्रिश्चन यांचीहि हिंदुस्थान हीच मायभूमि आहे.  पितृभूमि आहे ही गोष्ट नाकारणें म्हणजें इतिहास नाकारणें होय.   

प्रश्न :--  मुसलमान अलगच राहूं इच्छितात.  आपली लिपी, आपली भाषा सारें स्वतंत्र ठेवू इच्छितात.  अशाने ऐक्य कसें होणार?
उत्तर :--  या बाबतींत रशिया तुमचा गुरु आहे.  आज रशियांत शेंकडों भाषा बोलणारे प्रांत आहेत.  रशियांतील कम्युनिस्ट सरकारनें सर्वांना भाषा- स्वातंत्र्य दिलें आहे.  त्यांत काय बिघडलें? दोन लिप्या व दोन भाषा राहूं द्या. आपणांस बंधुभाव वाढवावयाचा आहे ना?  दोन भाषा शिकूं, दोन लिप्या कांहीजण शिकूं.  एकदा आपण सर्वांनी स्वातंत्र्य जाहीर करूं या, म्हणजे संशय उरत नाहीं.  उरला तर त्यास इलाज नाही.  तो अनुभवानें जाईल.  महान देशावर जबाबदारी अधिक.  रशियांत अनेक सोव्हिएटस आहेत.  त्यांचे युनियन आहे.  त्यांचें संयुक्तसरकार.  उगीच अहंकार व अभिमान यानें ऐक्य होत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel