परवां अंमळनेरला साक्षरतेचें महत्त्व मी कोठें सांगत होतों. चीनमध्यें, रशियामध्यें किसान कामगारांनी ज्ञानाचा, साक्षरतेचा, प्रचार केला होता. आणि रशियांत तर शेतकरी कामकरी राज्य झाल्यावर सर्वांना साक्षर करण्याची प्रचंड मोहीम झाली. म्हातारे मुलांबरोबर शाळेंत जाऊं लागले. माझ्या या भाषणांत एका मित्राला विसंगति दिसली. ते म्हणाले, '' सारें व्याख्यान परस्परविरोधी वचनांनी भरलेलें होतें. रशियांत क्रान्ति झाल्यावर मग त्यांनी सर्व साक्षर करण्याचें काम हातीं घेतलें, क्रान्तीच्या आधीं नाहीं.'' माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नव्हता कीं, क्रान्तीच्या आधी सर्व प्रदर्शित केले. परन्तु ज्यांना क्रान्ति करावयाची असते, त्यांना लोक साक्षर करावे लागतात. जे होणार नाहींत त्यांना स्वराज्य मिळाल्यावर करूं. परन्तु क्रान्तीच्या मार्गाकडे जात असतां वाटेंत लोकांना शिकवीत जावें लागतें. स्पेनमध्यें शेतकरी कामकरी कसे वर्ग चालवीत, चीनमध्यें क्रांति होण्यापूर्वी तरुण लोक चिनी शेतक-यांस वाटेतच दोन अक्षरें कशीं शिकवीत याचे इतिहास त्या मित्रास माहित असते तर त्यांस विसंगति दिसली नसती. क्रांति झाल्यावर सत्ता हातीं येते व उरलेलें काम झपाटयानें करतां येतें. परंतु क्रांतिपथावर असतांनाहि साक्षरतेचें शस्त्र जितक्या अधिक प्रमाणांत जनतेच्या स्त्री-पुरुषांच्या हातीं देतां येईल तितकें द्यावे लागतें.
त्या मित्रास माझें भाषण विसंगतींने भरलेलें वाटलें. परन्तु माझी दृष्टि त्याच्याजवळ असती, तर त्यात सुसंगति दिसली असती. मी आज दुतोंडीच झालों आहें. माझा कमी विकास आहे. मला तर शततोंडी, सहस्रतोंडी व्हावयाचें आहे. दुतोंडीच लेखणी काय, ती सहस्रतोंडी व्हावी अशी मला तहान आहे.
'सुताने स्वर्गास जातां येतें.' या माझ्या वाक्यामुळें या गृहस्थास एकदम 'मी खादीची टिंगल केली आहे.' असा अजब शोध लागला! हे दिव्य सत्यशोधक, दुस-याच्या अंतरंगाचा ठाव घेणा-या तुझ्या दिव्य दृष्टीस या पापात्म्याचे सहस्र प्रणाम! सुतानें स्वर्गास जातां येतें ही मराठींतील सनातन म्हण आहे. ही म्हण कोणी वापरली कीं एकदम खादीची टिंगल होत नसते. बेटा जमाल, सत्यसंशोधन इतकें स्वत नाहीं रे बाबा!
काँग्रेस शुध्दिसमितीनें 'इतर गटांत असणारे लोक काँग्रेसमध्यें नकोत.' असा उघड व स्पष्ट ठराव आणला असता तर त्यांत प्रामाणिकपणा तरी दिसला असता. परन्तु जवाहिरलालांनी याला विरोध केला. तो हेतु जेव्हां मग निवडणुकीचे नियमांत बदल, सत्याग्रह परवानगी वगैरे ठराव आले तेव्हां पुन्हां साध्य केला गेला. यालाच मी कारस्थान म्हणतो. राजकारणांत कारस्थानें लोक करतात. परन्तु तुम्ही सत्य अहिंसेचें ब्रीद पाळता व आम्हाला त्याचे डोस पाजीत असतां. म्हणून माझ्यासारखा म्हणतो, जेथे कारस्थान आहे, तेथे सत्याचा खून आहे. कारस्थानें करून नका घालवूं. उघड नकोत हे लोक असा ठराव करा.
बहुमत हें जेव्हां थोडें फार मिळतें घेणारें असतें, त्यांत सूड नसतो, तेव्हां तें शोभून दिसतें. शौर्य विजयानें शोभतें. बहुमत खेळीमेळीनें शोभतें. एखादा सशक्त मनुष्य अशक्ताशीं खेळीमेळीनें वागतो. त्याच्याहि थोडें कलानें घेतो, त्या वेळेस त्याच्या शक्तीचे कौतुक करावेंसें वाटतें. परंतु आपल्या शक्तीच्या ताठरपणामुळें तो जर सर्वांस थपडा मारूं लागेल तर त्याचे पोवाडे गाणारे कमी होतील. त्याच्या शक्तींचे कौतुक वाटेनासें होईल.
बहुमताचें असेंच आहे. काँग्रेसमधील बहुमत थोडें थपडा खाणारें झाले आहे. सुभाषबाबू कलकत्त्यास वर्किंग कमिटींत आमचे पांच घ्या, दोन घ्या, असें दातांच्या कण्या करीत विनवीत होते. परंतु सत्य व अहिंसा ताठरच राहिली. राष्ट्रानें ज्यास अध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्यास संपूर्ण शरण येण्यास लावणे ही केवढी अहिंसा!