असो. जपानी लोक हे अत्यंत थोर देशभक्त आहेत. देश हा त्यांचा देव आहे. देशासाठी ते स्वत:चे प्राण फुलांप्रमाणे देऊन टाकतात. या शतकाच्या आरंभी जें रूसोजपानी युध्द झालें त्यामध्यें तोंडांत बोटें घालण्यास लावणारीं शेंकडों कृत्यें बायकापुरुषांनी केलीं. आपल्या एकुलत्या एक मुलास रणांगणावर जाण्यास मिळावें म्हणून एका आईनें स्वत:स मारून घेतलें. पोर्ट ऑर्थर बंदरात मुद्दाम बोटी बुडवावयाच्या होत्या. शत्रूचें येथील आरमार बंदर बुजवून कोंडून टाकावयाचे होंते. या बोटी बुडविण्यास व त्यांबरोबर बुडण्यास शेंकडों तरुणांचे अर्ज आले व कांहींनी आपल्याला आधी पसंत केलें जावें म्हणून आपले अर्ज स्वत:च्या रक्तानें लिहिले. जपानी वीर रणांगणावर गेले म्हणजे त्यांच्या बायका देवळांतून जात व आपले केंस कापून टाकीत जणूं आम्ही विधवा झालों असें त्या दाखवीत. पण एवढाच हेतु केंस कापण्यांत नसे, तर पुन्हां आम्ही लग्न करणार नाहीं असाहि त्या निश्चय करीत. ते कापलेले केंस पांढ-या कागदाच्या पट्टींत बांधून देवळाच्या गाभा-याच्या दारावर टांगून ठेवीत. पुष्कळ बायकांचे असे केंस तेथें जमले म्हणजे त्यांची दोरी वळीत व ती दोरी लष्करांत व आरमारी गलबतावर पाठवून देत. या दोरींत आश्चयर्कारक शक्ति आहे अशी त्यांची समजूत आहे. जपानी पुरुष काय, स्त्रिया काय -- देशासाठीं सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार असतात. जपानी लोकांची राजावर फार भक्ति. राजा मेला तर कित्येक लोक स्वत:ची आत्महत्या करतात. अशा कृत्यास ' हाराकिरी ' म्हणतात. पाश्चात्य राष्ट्रें याला रानटी चाल म्हणतात.
जपानमध्यें शस्त्रास्त्रें तयार करण्याचे, लढाऊ गलबतें बांधण्याचे मोठमोठे कारखाने आहेत. कोणत्याहि बाबतीत परावलंबी राहावयाचें नाहीं असा जपानचा बाणा आहे. जपानमध्यें क्यूरो या ठिकाणीं मोठमोठया गोद्या आहेत. क्यूरों येथें सर्व शस्त्रास्त्रें-- टापेंडो, तोफा, क्रुझरें सर्व होतें. जपानी लोकांनी या सर्वा विषयीं ज्ञान करून घेतलें आहे. एक जपानी इंजिनीअर दहा वर्षे इंग्लंडांतील गोद्यांत शिकत होता व या दहा वर्षा त एकदांसुध्दा तो घरी गेला नाहीं. हे लढाऊ गलबतें वगैरे बांधण्यांचे काम शिकून तो स्वदेशांत गेला व इतरांस तो शिकवू लागला. याला म्हणतात ध्येयनिष्ठा. जपानांतील मजूरसुध्दां स्वदेशाबद्दल फार भक्ति धरतात. जपानी मजूरांचे पुढील वर्णन किती उदात्त आहे!
Surely no other People take such a conscientious interest in their work as the Japanese. The labourers are contented with their lot and are happy. You never see a sullen face such as is only too common among English and Continental workmen. Trade Unions are unknown, pay is small, and work is hard, but what does that matter if their Country is to benefit by their labours? There are no private interests in Japan at the time of national danger. All are content to work for the week. The humble coolie driving a nail into the place of a torpedo-boat does not lose interest in the nail as soon as it is driven home; he follows each movement of the boat in the little sheets on which the war news is distributed, and when he sinks a battleship he goes to his friends and proudly tells them that he has contributed towards the achievement; that is the spirit of the Japanese nation, and that is the spirit which will make them the paramount power.
भावार्थ :-- जपानी लोकांप्रमाणें आपआपल्या कामांत मनापासून लक्ष घालणारे लोक दुसरे क्वचिंतच असतील. मजूर मिळेल त्यानें संतुष्ट असतात. त्यांच्या तोंडावर युरोपांतील मजुरांच्या चेह-यावर असतात, तशा आंठया कधीं दिसणार नाहींत. पगार थोडा आणि काम पुष्कळ असें जरी असलें तरी जर आपल्या राष्ट्राचा त्यामुळें फायदा होत असेल तर सर्व कांही मिळालें असें त्याला वाटतें. राष्ट्रावर संकट आलें म्हणजे जपानी मनुष्याला स्वत:चे वैयक्तिक कांहीच दिसत नाहीं, सर्व राष्ट्रांचे त्याला दिसतें. टॉर्पेडो बोट तयार करतांना मजुरानें तेथें जो खिळा ठोकला तेवढयानेंच त्याचें काम संपत नाही. त्या बोटीनें काय काय केलें, लढाईत काय पराक्रम केले हें तो वाचतो. आणि त्या टॉर्पेडो बोटीनें जर शत्रूंचे गलबत वगैरे बुडवलें तर तो मजूर आपल्या मित्राकडे जातो व म्हणतो, 'त्या टॉर्पेडो बोटींत मी खिळे ठोकण्यास होतों. राष्ट्राला विजय मिळाला त्यांत माझाहि भाग आहे!' जपानी लोकांची ही वृत्ति आहे. आणि तिच्यामुळें ते स्वत:चे राष्ट्र पहिल्या प्रतीचें करतील यांत शंका नाही.
आपण बारीकसारीक कामें करूं किंवा मोठी करूं ती राष्ट्राच्या हितासाठीं, असे वाटणें हें आपणास जपानपासून शिकावयाचें आहे.
-- विद्यार्थी मासिकांतून.