शिवाजी महाराजांच्या वेळेस शस्त्रास्त्रें होतीं. राष्ट्र नि:शस्त्र नव्हतें. शिवाय महाराष्ट्रापुरता प्रथम प्रश्न होता. आज शस्त्रास्त्रें नाहींत. सर्व हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. जगांतील बलाढ्य साम्राज्याशीं सामना द्यावयाचा आहे. शस्त्रास्त्रांचा मार्ग मोकळा नाहीं हें पाहून नि:शस्त्राचा लढा महात्माजींनी सुरूं केला. राष्ट्राला प्रचंड त्याग शिकविला. भिक्षांदेहि दूर केली. स्वावलंबनाचा मंत्र दिला. स्त्री-पुरुष, मुलें- वृध्द यांचा आत्मा जागा केला. गिरिकंदरांतून वंदे मातरम् चे निनाद होऊं लागले. ही क्रांति एका लुंगीवाल्यानें केली. स्वराज्य जवळ आणलें. कोंडी फोडली. संघटणा प्रांतांप्रांतात ऊभी केली. एका भाषेनें बोलायला शिकविलें. खादीची ऊब दिली. त्यायोंगें खेड्यांतील जनतेंत कार्यकर्ते जाऊं लागले. राष्ट्र एक होऊं लागले. ब्रि. साम्राज्यसत्तेला महात्माजींनी हलविलें असें जग म्हणूं लागलें. महात्माजी आमचा खरा शत्रू असें ब्रिटिश साम्राज्यवालें म्हणूं लागले. महात्माजींनी सांगितलेल्या गोष्टी सर्वजण निश्चयानें, श्रध्देनें अंमलात आणते तर आज स्वतंत्र झालोंहि असतों. तुरुंगात असतांना एक आयरिश सुपरिटेंडेंट म्हणाला, ' तुम्हांला २० सालींच महात्माजींनी स्वराज्य दिलें असतें, परन्तु तुमची श्रध्दा नव्हती. ' महात्माजींना बोल न लावतां स्वत:स लावा.
(२) महात्माजींची लुंगी म्हणजे सोवळेपणा नव्हे ; तो धगधगीत त्याग आहे. कोटयवधि लोक उघडे असतां मला कपडयाचे ढीग कशाला? त्यांनी राऊंड टेबलला जात असतां एडनहून महादेवभाई वगैरेंनी बरोबर घेतलेले अधिक कपडे परत पाठविलें व ते म्हणाले, 'दरिद्री नारायणाचा प्रतिनिधी म्हणून मी जात आहें. मला हा संसार शोभत नाहीं. ' समर्थांच्या कफनीला नांवे ठेवाल कां? एक भगवी छोटी शिवाजी महाराजांचे निशाणासाठीं समर्थांनी दिली. तो का सोंवळेपणा होता? भगवी लुंगी महाराष्ट्रांतील स्वराज्याचें चिन्ह होतें. राज्य गरिबांसाठी आहे, राजाने संन्याशाप्रमाणे रहावें, याची ती जळजळीत खूण होती. परंतु आम्हीं भगव्या लुंगीचा जरिपटका केला आणि महाराष्ट्राचें स्वराज्य गेलें. कारण शिवाजी महाराजांचे गरिबांचे राज्य जाऊन, सरदार दरकदार, जहागीरदार यांचे राज्य सुरू झालें. शेतकरी पुन्हां लुटला जाऊं लागला. सरंजामी सरदार जरीपटक्यानें शोभूं लागले. लुंगीत असा हा महान् अर्थ असतो. कोट्यवधि जनतेच्या भाकरीसाठीं तळमळणा-या लुंगीत ब्रि. साम्राज्याला वांकविण्याची शक्ति असते. परंतु दृष्टि असेल त्याला हें दिसेल.
(३) पंडित जवाहरलालांनी आपल्या विश्वेतिहासांत श्री शिवाजी महाराजांविषयीं कांही गैर लिहिलें त्याची त्यांनी क्षमाहि मागितली. दुस-या आवृत्तीत बदलीन असें तें म्हणाले. शर्ट वरील जाकीटांत असा दिलदारपणा आहे ; परंतु आपल्या पगडींत मात्र तो दिसत नाहीं. आणि आपण आज पूर्वीच्या इतिहासाकडे नवीन दृष्टीनें बघतों. आपण नवीन ध्येयें, नवीन कल्पना यांनी बघतों. आपण पूर्वजांच्या खांद्यावर ऊभे राहून आणखी दूरचें बघतों. आपणांस आणखीं दूरचें दिसलें तर त्यांत पूर्वजांचा अपमान नाहीं. प्राचीन कालापासून अनेक थोरामोठया व्यक्तींनी इतिहास बनवीत आणला. त्याचें मूल्यमापन आज आपण करतों. त्यांत अपमानाचा हेतु नसतो. किंवा त्या थोर ऐतिहासिक विभूतींपेक्षां आपण मोठे झालों असाहि अर्थ नसतो. तें शुध्द ऐतिहासिक विवेचन असतें. शुध्द मनुष्य चूक दिसली तर कबूल करतो. असें हें इतिहास शास्त्र असतें. तेथें त्यागमूर्ति जवाहिरलालांचे जाकीट काढणें सदभिरुचीस शोभत नाहीं. कृपण व अनुदार बुध्दीचें हें लक्षण आहे. नेहरूंना शिवाजी महाराजांवर टीका करण्याचा अधिकार नाहीं, आणि नेहरूंवर या कोर्टातील किडयांना टीका करण्याचा अधिकार पोंचतो का?