२२ चीनमधील क्रांतिकारक स्त्रिया
जपान व चीन यांचा झगडा बरेच दिवस चालला आहे याचा शेवट काय होईल ते सांगतां येत नाहीं. शेवटीं चीन जपानला चीत करील अशी आशा वाटते. परंतु तें कांही असो. चीन आज खडबडून जागा झाला आहे. सारें राष्ट्र आज आत्मरक्षणासाठीं झटत आहे. लहान असो, वृध्द असो, स्त्री असो पुरुष असो, सारे कामांत आहेत. या लढयांत चिनी स्त्रिया फार महत्त्वाचें कार्य करीत आहेत.
आजच्या नव चीनमधील स्त्रियांचे कार्य आश्चर्यकारक आहे. जपानचा हल्ला आला आणि चिनी स्त्रियांनी रूढींचे किल्ले पाडून राष्ट्रीय सेवेस वाहून घेतलें. आई-बाप, नातलग, अधिकारी यांची पर्वा न करतां राष्ट्रधर्माची त्यांनी दीक्षा घेतली. १९३७ च्या ऑगस्टच्या १ तारखेस 'राष्ट्रीय संरक्षण नारीमण्डळ' स्थापण्यांत आलें. चीनभर या मण्डळाच्या शाखा निघाल्या. शाखांच्या स्त्री सभासदांनी पैसे, कपडे, औषधें गोळा केली. अनाथ मुलांची काळजी घेतली. गरजू कुटुंबांनां मदत केली. निराश्रितांना आधार दिला. १९३८ च्या मे महिन्यांत चीनमधील सर्व प्रमुख स्त्रियांची एक सभा भरली. घरगुती धंद्यांना उत्तेजन देण्याचें ठरले. घरोघर खादी, हातमाग सुरू करून भरपूर कपडा निर्माण करण्यांचे ठरलें.
बहुतेक मोठया शहरांतून सुविद्य घराण्यांतील तरुणींनी प्रथमोपचार पथकांतून नांवे दिली. या सेविका वैमानिक हल्ल्यांत जखमी झालेल्यांस मदत करितात. त्यांना करमणुकींसाठी वाचून दाखवतात. त्यांची पत्रें लिहितात. परन्तु चिनी तरुणी इतकेंच करून थांबल्या नाहींत. त्या आघाडीवर लढण्यासाठींहि निघाल्या. क्वांग्सी प्रांतांतील ५०० स्त्रियांचे पथक रणांगणावर लढण्यासाठीं गेलें. कांही स्त्रिया आघाडींवर जाऊन रणगीतें गात शिपायांस स्फूर्ति देत तर हजारों स्त्रिया आपापल्या घरांतून फाटके कपडे शिवणें, नवीन कपडें तयार करणें अशा कामांत असत.