बंकीमचंद्र हे उत्कृष्ट पहिल्या दर्जाचे गद्य-लेखक होते.  त्यांनी पद्य मात्र मुळींच लिहिलें नाहीं असें म्हटलें तरी चालेल.  एक दिवस बंकीमबाबूंच्या मुलीनें त्यांना प्रश्न विचारला, 'बाबा, तुमि तो बहुत गद्य लिखते पारे तार पर पद्य कि ना लिखत्ते जारी? ' तेव्हां बंकीमबाबू तेजस्वी दृष्टींने म्हणाले, ' बाळ मी एकच कविता लिहिली आहे.  एकच गाणें रचलें आहे.  परंतु तें गाणें तुझ्या पित्याचें नांव अजरामर करील.'  बंकीमचंद्रांचे असें काणतें बरें तें गाणें?  होय तेंच ' वंदे मातरम् ' हेंच तें उत्कृष्ठ  देशभक्तींचें गाणें.  डोळयांतील अश्रूंनी हृदयाच्या वीणेच्या अनंत तारा सामस्यानें वाजत असतां हें लिहिलेले आहें. वाल्ट व्हिट्मन हा अमेरिकन कविता म्हणत असे, 'माझ्या काव्याच्या पुस्तकाला जो कोणी हात लावील, तो पुस्तकास हात लावीत नसून पुस्तककर्त्याच्या हृदयालाच जणूं स्पर्श करतो.' त्याप्रमाणें या गीतामध्येंहि गीतकाराचें हृदय ओतलेलें आहे.  ज्या वेळेला आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पाडून मनुष्य वर्ण्य वस्तूंशी तन्मय होते, तेव्हां त्या दिव्य समाधीमध्येंच असें गीत बाहेर पडतें!

बंकीमचंद्रासारख्या साहित्यसम्राटानें हें गीत रचलें व प्रथम वंगीय कविसम्राट रवींद्र यांनी कलकत्त्याच्या एका सभेंत तें गाऊन दाखविलें.  बंकीम हें कांही संगीतज्ञ नव्हते.  त्यांनी स्फूर्तीच्या रंगात गीत तर रचिलें.  भराभरा शब्दरत्नें आलीं, तशी त्यांनी जडावाची माळ केली!  या गाण्याला कोणता ताल लावावा कोणता राग लावावा, हें संगीतज्ञांनीं पाहून घ्यावें.  जडावाची माळ आहे, ती पटवेक-याकडें नेऊन कशी पटवावी, कोणते गोंडे लावावे, कोणत्या रंगाचा गोप लावावा, हें ज्याचें त्यांनें ठरवावें.  रवींद्रनाथ हे बंकीमांहून वयानें लहान.  त्या वेळेस रवींद्र अगदीं तरुण होते.  रवींद्र उत्कृष्ठ  गाणारे आहेत त्यांचा आवाज मधुर, उंच, कोमल हवा तसा आहे.  कलकत्त्याला एकदां सभा भरली असतांना तरुण रवींद्राला बंकीम म्हणाले, 'तुमि ओई गीत गुलि गाय छो - तुम्ही हें गीत म्हणून दाखवा.'  रवींद्रानीं म्हणून दाखवलें.  ते दिव्य गीत स्वर्गीय कंठांतून सुस्वर आलापानें बाहेर पडलें व स्वर्ग पृथ्वी तटस्थ झाली.  त्या दिवसापासून हें गीत सर्वत्र  पसरलें.  ही तान हिंदुस्थानच्या कानाकोप-यांत वायुदेवानें नेली.  त्या दिवसापासून या गीताने सर्वांना वेडें केलें; अनंतांना देशभक्ती शिकविली; देशप्रीति दाखविली; मरायला आणि हंसायला तयार केलें;  भारतमातेची पूजा करावयास तेहतीस कोटीं लेकरें तयार होऊं लागली.


* * * * * * *

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel