तरुणांच्या मनांत देशभक्ति उत्पन्न न होण्याचें तिसरें कारण म्हणजे लष्करी शिक्षणाचा अभाव. प्रत्येक स्वतंत्र राष्ट्रांतील तरुणांस असें वाटतें की मी माझ्या राष्ट्रासाठी वेळ आली तर लढेन, मरेन. राष्ट्रासाठी सर्व तरुण मरण्यास, लढण्यास तयार होतील अशी अपेक्षा स्वतंत्र राष्ट्रांतील तरुणांबद्दल केली जाते. परंतु आम्हांस तशी संधि कोठें आहे? आमच्या देशावर स्वारी आली तर इंग्रज बहाद्दर रक्षण करण्यास तयार आहे. त्यांनी आम्हांस शस्त्रास्त्रांस पारखे, नामर्द व षंढ बनविलें आहे. ज्या राष्ट्रासाठी आपण लढूं शकत नाही, ज्या आपल्या देशासाठी आपण मरूं शकत नाहीं, त्याबद्दल आपणांस प्रेमहि तितकें वाटत नाहीं. ज्या वस्तूवर आपण प्रेम करितों, तदर्थ स्वार्थ त्याग करण्याची संधि न लाधली तर तें त्या वस्तूवरील प्रेमहि कमी होतें. ज्या प्रमाणांत देशार्थ मरण्याची संधि कमी, त्या मानानें देशभक्ति व देशप्रीति पण कमी असते ; जी कांही असते तीहि परिणामहीन व काल्पनिक असते, तिच्यांत जोर व तेज नसतें.
अशी ही हिंदी तरुणांची स्थिति आहे. उज्ज्वल ध्येय, साहस याच्या कल्पनाच त्यांचा मनात येत नाहीत; ज्याच्यासाठी आपण जगूं, ज्याच्यासाठी मरूं असें त्यास दिव्य व उत्कट कांही दिसत नाही. त्याची दृष्टि फार संकुचित होते. स्वत:च्या देशासाठी कांही करावें हे त्याच्या मनांत येत नाहीं. परिस्थितीच्या बागुलबुवानें तो कायमचा पछाडला गेलेला असतो. पोटाला कसे मिळवावें, जीवित सुरळीत कसें चालेल हेंच सारखें त्याच्या मनांत रात्रंदिवस असतें. स्वत:च्या पोटापलीकडे त्याला कांही दिसत नाहीं. आपल्या देशाची सेवा करावी हे विचार त्याच्यापासून फार दूर असतात: त्याचें ध्येय मर्यादित असतें. स्वत:च्या वैयक्तिक गरजांपलीकडे तो पहातच नाहीं. मोठमोठया गोष्टी करण्यांस लागणारें शारीरिक, मानसिक व नैतिक बल याचा त्याच्या ठायी अभाव दिसून येतो. असें म्हणतात कीं-- इंग्लंडच्या ऑक्सफर्ड, केंब्रिजसारख्या विद्यापीठांतून बाहेर पडणारा तरुण आपणांस जगांतील कोणत्याहि गोष्टींत लायक समजतो, कोणतीहि गोष्ट आपणांस अशक्य आहे, हें त्याच्या मनांतहि येत नाहीं. लाथ मारीन तेथें पाणी काढीन ही त्याच्यांत धमक असते व ही आपली धमक जगाने ओळखावी, मान्य करावी अशी त्याची इच्छा असते; त्याच्या डोळयांसमोर मोठमोठया कल्पना, मोठमोठीं ध्येयें असतात; आत्मविश्वास त्याच्या रोमरोमांत भरलेला असतो. परंतु आमचे तरुण अल्पसंतोषी आहेत. त्यांच्या दृष्टीसमोर ऊत्कट, भव्य, मोठें असें कांही नसतें. गवतात सरपटणारे ते किडेच आहेत. महिन्याची दोन्ही टोकें अशी मिळवितां येतील हीच विवंचना सध्यांचे शिक्षण तरुणांस लावीत असतें. आपणांस राष्ट्रासाठीं लढण्याची संधि पण नाहीं, आणि अशी संधि आली तरी आपण तयार नाहीं. हिंदी तरुणांची सर्व दृष्टीच अशी खिन्न, निराश दिसते. अशा तरुणांची देशभक्ति काय किंमतीची असणार हें उघडच आहे. केव्हां तरी आपल्या देशास सुस्थिति येईल, बरे दिवस येतील हें स्वप्न मनांत घोळविणें एवढेंच फक्त त्यांचे काम. शिक्षणाचा हेतु पुरुषार्थ साधणारे पुरुष निर्माण करणें हा आहे. Education makes the man परंतु सामाजिक किंवा राजकीय कार्य क्षेत्रांत धडाडीनें, उज्ज्वल ध्येयानें आमचे तरुण पडतील असें सध्याचे शिक्षणांत कांही एक नाहीं, ते शिक्षण नसून राष्ट्र मारणारें विष आहे.
सध्याचे जें राजकारण त्याचाहि तरुण विद्यार्थांस संपर्क न होऊं देण्याबद्दल खबरदारी घेण्यांत येतें. विद्यार्थांनीं ठरीव पुस्तकें वाचावीं, ठरलेल्या परीक्षा द्याव्या आणि देशांत काय चाललें आहे ह्याबद्दल त्यांनी लक्ष देऊं नये, आपला अभ्यास बरा कीं आपण बरें असें त्यांनी करावें असें कांही सरकारी अधिका-यांकडून व सरकारच्या कच्छपी लागलेल्या स्वार्थी लोकांकडून सांगण्यांत येतें. मोठा साळसूदपणाचा आव आणून बेटे वरील उपदेश करतात. खरोखरच विद्यार्थांच्या हितासाठीं जर हा उपदेश असेल तर तो चांगला म्हटलाच पाहिजे. परंतु तारुण्याच्या उदार भावना ; उष्ण रक्त ज्याच्यामध्यें आहे, अशा तरुणाचें शिक्षण चार रद्दी क्रमिक पुस्तकें वाचल्याने पूर्ण झालें असें मानणें म्हणजे मूर्खपणा आहे. ज्या राष्ट्राचा तो एक घटक आहे, अशा राष्ट्राचें हिताहित, यशापयश ज्या सद्य:कालीन गोष्टींवर अवलंबून आहे, ज्या गोष्टींवर त्याचा सर्व भविष्यकाळ अवलंबून आहे, त्या गोष्टींचा त्यास स्पर्श होऊंन देणें याहून मूर्खतर व आत्मघातकीपणाची कोणती गोष्ट आहे?
नि:स्वार्थ सेवा जर कोणी करूं म्हणेल, जर कोणी करणें शक्य असेल तर तो तरुण होय. राष्ट्रासाठीं पवित्र, निर्मळ भावना त्याच्या मनांत असतात ; मोठमोठया गोष्टींबद्दल, उज्ज्वल ध्येयाबद्दल तो पूज्यबुध्दि बाळगतो, स्वार्थ त्याग करण्यास सन्मुख असतो. अशा तरुणाच्या मनांत देशाबद्दल, थोर गोष्टींबद्दल प्रेम उत्पन्न करणें व त्या प्रेमार्थ सर्वस्व देण्यांस त्यास शिकविंणें तयार करणें, हाच शिक्षणाचा खरा हेतु होय; हेंच कार्य होय. सर्व देशांतील स्वातंत्र्य चळवळींचा परिणाम प्रथम तरुणांच्या निर्मळ मनावर झाला; त्यांनीच त्या चळवळींचा पुढाकार घेतला. चीन, ईजिप्त वगैरे देशांत तरुणांनीच चळवळी चालविल्या आहेत. हिंदुस्थानांतील तरुणच या गोष्टींस अपवाद कसे होतील? त्यांनीहिं राजकीय, सामाजिक चळवळींत लक्ष घातले पाहिजें.