११  जगीं धन्य दोघे खरे ब्रह्मचारी

माघ महिन्यांत दोन थोर जगद्वंद्य पुरुषांच्या पुण्यतिथी येतात.  हे दोघेहि महान् ब्रह्मचारी होते.  माघ महिन्याच्या शुक्लपक्षांतील अष्टमीचे दिवशीं भगवान् भीष्म हे निजधामास गेले.  म्हणून ही अष्टमी भीष्माष्टमी म्हणून प्रसिध्द आहे.  याच माघ महिन्याच्या कृष्णपक्षांत नवमीच्या दिवशीं श्रीसमर्थ रामदासस्वामी हे निजधामास गेले म्हणून ही नवमी दासनवमी या नांवाने प्रसिध्द आहे.

महाभारतांतील अनेक महनीय विभूतींत भीष्म ही विभूति सर्वश्रेष्ठ आहे.  केवढा त्यांचा स्वार्थत्याग, केवढी विरक्तता, केवढी पितृभक्ति!  आपल्या पित्याचें मन धीवर कन्या सत्यवती हिच्यावर बसलें आहे हें कळतांच तो त्या कोळयाकडे जातो.  'माझ्या मुलीच्या संततीकडे राज्यपद जावें हें कबूल करशील तर मी मुलगी देतों.' असें तो धीवर म्हणाला.  भीष्मांनीं सांगितलें, 'कबूल, मला राज्याचा अभिलाष नाहीं.'  परंतु तेवढयानेंहि समाधान न होतां तो कोळी म्हणाला,  'तूं विवाह करशील व तुझ्या मुलांकडे राज्यपद जाईल.'  भीष्म म्हणाले, 'मी आमरण ब्रह्मचारी राहीन, मग तर झालें?' सत्यवती शंतनूस मिळाली.  याच प्रतिज्ञेमुळें देवव्रत यांस भीष्म हें नांव प्राप्त झालें.

सत्यवतीस झालेला पुत्र विचित्रवीर्य हा संततिहीन मरण पावला.  तेव्हां राज्यांस कोणी वारस पुढें पाहिजे म्हणून सत्यवती भीष्मास विवाह करण्यास आग्रह करिते.  ती म्हणते 'तूं लग्न कर व हें राज्यपद घे.' परंतु प्रतिज्ञेची पूजा करणारे भीष्म म्हणाले, ' पृथ्वी आपला गंध सोडील, पाणी आपला वाहण्याचा धर्म सोडील, ज्योति तेजाचा त्याग करील, वायु स्पर्श गुण सोडील, पराक्रमी इंद्र पराक्रमाचा त्याग करील, यमधर्म धर्म सोडून वागेल, परंतु मी माझें व्रत सोडणार  नाहीं.'

मुलांनो, आज भीष्मासारखे सत्यप्रतिज्ञ व दृढनिश्चयी तरुण राष्ट्रसेवेस पाहिजे आहेत.  आज स्वदेशी कपडा वापरण्याची प्रतिज्ञा करणारे, व उद्यां विदेशी परिधान करणारे, आज चहा - विडी वगैरेंचा त्याग करूं म्हणणारे, पण पुन्हां त्यांचे गुलाम होणारे असे तरुण नको आहेत.  दृढ निश्चयानें राष्ट्राचीं अनेक  कार्यें अंगावर घेणारे व पार पाडणारे अनेक लोक पाहिजे आहेत.  भीष्मांचे ब्रह्मचर्य व भीष्मांचा दृढ निश्चय यांची जितकी महती गावी तेवढी थोडीच आहे.  या ब्रह्मचर्याच्याच जोरावर भीष्म पितामह वृध्द झाले होते, तरी अर्जुनासारख्यांस त्यांनी त्राहि भगवान् करून सोडलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel