अधिकांत अधिक किसान व कामगार काँग्रेसमध्ये कसें येतील याची आम्हांस तहान हवी. लब्धप्रतिष्ठित लोक काँग्रेसमधून कसे जातील हें आम्हीं पाहिलें पाहिजे. खादी वापरण्याचे अटीऐवजी तुझ्या उत्पन्नाचा शतांश काँग्रेस-कामास दरसाल देत जा अशी म्हणावें अट घाला. व्याज शें. ३ टक्केच घेईन, कुळांना आधीं खायला ठेवीन, कामगारांना नीट वागवीन अशा अटी घाला परंतु या प्राणमय अटी कोण घालतो?
खादीची शुध्दि बहुजन समाजांत कमी असेल. परंतु श्रम करून करून ते पवित्र झालेले आहेत. जे संपत्ति श्रमून निर्माण करतात त्यांच्याइतकें पवित्र कोण? अंगावर खादी घालणारे परंतु कधी संपत्ति निर्माण करण्यासाठीं न श्रमणारे अशानीं अंगावर खादी नसलेल्याहिं किसान कामगारांच्या पायां पडावें. आपण खादीधारी-पांढरपेशे, शेट सावकार, कारखानदार अशुध्द आहांत, बेशुध्द आहोंत, मेलेले आहोंत. आपण दुस-यांस कोणत्या तोंडाने अशुध्द म्हणावें?
महात्माजी पुरुषसिंह बॅ. अभ्यंकरांस नागपूरच्या सभेंत म्हणाले होते, ''अभ्यंकर, तुम्हांला अजून जेवावयाला मिळत आहे. ज्या दिंवशीं तुम्हांला खाण्याची ददात पडेल त्या दिवशीं मी आनंदाने नाचेन.'' खाण्याची ददात किसान कामगारांस नेहमींच आहे. परंतु त्यांची ही ददात मिटावी म्हणून सेवा करावयास निघालेले धनिक किती उपाशी राहूं लागले? शेतक-यांच्या झोंपडया पाहून यांना इतकें दु:ख होतें कीं, यांचे रंगीत बंगले नवीन उठू लागतात! किती जीवनांतील शुध्दि !
महात्माजींच्या मुखीं सत्य अहिंसा शोभते. परंतु ज्यांच्या जीवनांत सत्य अहिंसेचा पत्ता नाहीं, अधिकार व सत्ता हातीं असण्यासाठी कारस्थाने करण्यांत ज्यांच्या बुध्दीची कृतार्थता, दुस-याला पैशानें मिंधे करून त्यांचे मत-स्वातंत्र्य नष्ट करणें असे ज्यांचे खेळ त्यांनी आम्हांस सत्य अहिंसेचे डोस पाजावे हें कसेंतरी वाटतें.
सारांश, सामर्थ्याचा झरा जनता-जनार्दनाजवळ आहे. जनता-जनार्दनास काँग्रेस दूर लोटील तर ना ऊरेल तिच्याजवळ सत्य, ना उरेल अहिंसा. श्रीमंताच्या डुरकावणीस भीक न घालता आम दु:खी जनतेच्या सुखासाठीं काँग्रेस निश्चयानें उभी राहील तेव्हांच ती विशुध्द स्वरूपांत अतुल तेजांने व अपार सामर्थ्यानें शोभेल ; खरे स्वातंत्र्य जवळ येईल.
-- वर्ष २, अंक ८