प्रश्न :--  यांच्या सभेला म्हणे मुसलमानहि गेले होते?
उत्तर :-- हाच तर चावटपणा आहे.  हिंदु मुसलमान हे खरे भेद नाहींत ; ते ज्यांस भरपूर मिळतें अशांचेच आहेत.  भविष्यकाळांत हिंदुस्थानांतील मुस्लीमलीगचे नबाब, हिंदुमहासभेला पाठिंबा देणारे सारे जमीनदार, सावकार, इनामदार हे एक होतील व गरीब हिंदु-मुसलमानांस चिरडूं पाहातील.

प्रश्न :-- यासाठींच का ते संघ आहेत?  प्रत्येक शहरांत आहेत.  खेडयांत हें विष अद्याप आलें नाहीं.
उत्तर :-- हिंदुमहासभेचें तें भावी लष्कर आहे.  तें भांडवलवाल्यांचे लष्कर होईल आणि शेतकरी व कामक-यांना दडपील.

प्रश्न :-- स्पेनमध्यें असेंच झालें म्हणतात तें खरें का?
उत्तर :-- होय.  तेथें शेतकरी कामकरी राज्य होतांच बडे लोक एक झाले.  जमीनदार, मठवाले, सरदार, इनामदार सारे एकत्र होऊन उठले.  आज पुन्हां या भांडवलवाल्यांची सत्ता येथें स्थापन झाली आहे.

प्रश्न :-- आपल्याकडे असेंच का होईल?
उत्तर :-- होय.  हिटलर, मुसोलिनी हे या लोकांचे गुरू आहेत.  आपापल्या स्वयंसेवकांच्या पलटणींच्या जोरावर तेथील शेतकरी, कामकरी त्यांनी आज दाबून ठेवले आहेत.  त्यांना बोलण्याचें स्वातंत्र्य नाहीं, लिहिण्याचें स्वातंत्र्य नाहीं.  जर्मनींतून परवां एक गृहस्थ आहे.  ते म्हणाले, जर्मनीच्या मानाने हिंदुस्थानांत किती स्वातंत्र्य!  तेथें तोंड उघडतां येत नाही आपल्या देशातील संघ हे पुढें आपणां सर्व गरीबांच्या मानगुटीस बसतील.  तुम्ही सावध रहा.

प्रश्न :-- मग आम्हीं काय करावें?
उत्तर :-- तुम्हीं हिंदुमुसलमान असल्या भेद पाडणा-या चावटपणास बळी पडूं नका.  शेतकरी तेवढा एक,  कामकरी तेवढा एक असें करा.  आपली पोलादी संघटना करा. दिवसभर नांगर चालवावा.  रात्रीं तिरंगी झेंडा रोंवा.  लाठी शिकावी.  कवाईत शिकावी.  निर्भय व्हावें.  गांवोगांव तरुण किसान सेना स्थापा.  मधून मधून हजारोंनी एकत्र जमून बाजे लावून शिस्तीनें मिरवणुका काढा.  असे कराल तरच आशा आहे.  नाहींतर तुम्हां गरीबांचा कठीण काळ आहे.  काँग्रेसच्या साध्या सुधारणांसहि हे बेटे विरोध करीत आहेत.  जो आम्हांला पोटभर भाकर देईल त्याला म्हणावें मत.  काँग्रेस भाकर देईल.  तिचें हृदय तुमच्याकडे आहे.  जरा जपून ती जात आहे.  धीर, धीर धरा.       

प्रश्न
:--  खेडयांत म्हणतात सारें कर्ज कां रद्द केलें नाही?
उत्तर :--  खरोखर तसेंच केलें पाहिजे.  पण तसें काँग्रेस केव्हा करील? जेव्हां सर्व सत्ता तिच्या हातीं येईल.  जळगांवला सावकार म्हणाले ''मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावूं. ''  कोणाच्या जोरावर हे असें करणार? प्रांतिक सुधारणा ज्या मिळाल्या आहेत, त्यांचे असें एक कलम आहे कीं अल्पसंख्य लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारवर, गव्हर्नरवर आहे.  आज साधें कर्जबिल आणलें तर हे सावकार म्हणतात कीं राजीनामें द्यायला लावूं.  जर सर्वच कर्ज रद्द करा असें बिल आणलें तर हे सावकार छाती बडवीत गव्हर्नरच्या दारांत जातें व ''पाहि मां पाहि मां'' महाराज आमचें रक्षण करा, काँग्रेस आम्हांला अगदीं धुळीस मिळवीत आहे असें म्हणाले असते.  मग गव्हर्नर मंत्र्यास म्हणतात, '' हे असें बिल नको, तर जरा सौम्य करा. ''तुमची तयारी असती सर मंत्र्यांनी राजीनामे दिले असते.  तुमची कोठें आहे पुरी तयारी? सावकार सारे बंद केले तर तुम्हांला कर्ज देण्यासाठीं भरपूर भांडवलाच्या बँका हव्यात.  त्यांत भांडवल असावें म्हणून पैसे हवेत.  लष्कराचे खर्च, ऑफिसरांचे पगार यांना काट मारल्याशिवाय कोठून येणार पैसे?  यासाठी सत्याग्रह करावा लागेल.  त्यासाठी तयार रहा.  आज काँग्रेस जेवढी शक्ति आहे त्या मानानें सारें करीत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel