युरोप-अमेरिकेंतील लोकांना रोमन रोलंड हे दिव्य संदेश सांगणा-या देवदूतासारखे वाटतात,  त्यांचे वय ६५ वर्षांचे आहे.  या त्यांच्या आयुष्यांत त्यांनी अनेक युध्दप्रसंग पाहिले आहेत.  अगदीं लहानपणापासून युध्द म्हटलें कीं त्यांच्या अंगावर कांटा उभा राहत असे.  एक भयंकर युध्द होणार आणि त्यांत लक्षावधि लोक मृत्युमुखीं पडणार अशीं त्यांना पूर्वीपासून स्वप्नें पडत असत.  त्यामुळें त्यांचे बाळपणाचे दिवस देखील या चिंतेतच गेले.  आपल्या ग्रंथातून त्यांनी भावी युध्दाची आगाऊच सूचना दिली होती ; या युध्दापासून अलिप्त रहा असा इषाराहि दिला होता;  परंतु संपत्तीच्या मदानें आणि ऐश्वर्यानें धुंद झालेल्या युरोपनें त्यांचा संदेश नीट ऐकला नाहीं;  आणि म्हणूनच १९१४ सालीं जर्मनी आणि फ्रान्स यांचेमध्यें गेलें महायुध्द सुरू झालें आणि या युध्दाचा वणवा युरोपांत किंबहुना सर्व जगांत पेटणार हें पाहून त्यांचा विश्वावर प्रेम करणारा मृदु आत्मा करपून गेला.  जर्मन, फ्रेंच, इंग्लिश इत्यादि एकाच संस्कृतीच्या लोकांनी परस्परांचे प्राण घ्यावयास उद्युक्त व्हावें हें आश्चर्य नव्हे काय?  मग जगाचा ऊध्दार कसा होईल?  जगांत विश्वबंधुत्व नांदावें हें आपलें ध्येय -- ज्याच्या प्रसाराकरतां आपण आजपर्यंत प्रयत्न केला--तें सर्व थोतांड म्हणून टांकून द्यावें काय असा क्षणभर त्यांच्या मनांत व्यामोह ऊत्पन्न झाला.  परन्तु ते मोठें आशावादी आहेत.  त्यांच्या ध्येयवादित्वाला एवढा अकल्पित धक्का बसला तरी मनुष्याच्या सत्प्रवृत्तीविषयीं त्यांची श्रध्दा अढळच राहिली.  विश्वबंधुत्व हें जगांतून पार मेलें नाहीं;  फार तर त्याला तात्पुरतें ग्रहण लागलें असें म्हणता येईल.  परन्तु लवकरच हें ग्रहण सुटेल आणि सर्व लोक बंधुभावानें पुन्हां नांदूं लागतील असा त्यांचा दांडगा विश्वास होता.  आपल्या मातृभूमीबद्दल-फ्रान्सबद्दल- त्यांच्या ठिकाणीं अकृत्रिम प्रेम असलें तरी तिच्याकरितां जर्मनीचा द्वेष करणें आणि त्याच्याविरुध्द सुध्दां युध्दाकरितां सज्ज होणें पाप आहे असें त्यांस वाटत होंते म्हणून शेवटपर्यंत ते शंतिवादीच आहेत.  आणि त्याकरिता लोकनिंदाहि त्यांनीं सहन केली.  युध्द समाप्तीनंतर जिज आणि जेते असा भेदभाव न करितां तह करा आणि बंधुत्वाचा प्रसार करा असा जाहीरनामा त्यांनी काढला.  दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या जाहीरनाम्याला मान दिला असता तर जेते व जित अशीं सर्वच राष्ट्रें आजच्यासारखीं डबघाईला आलीं नसती.

सन १९१४ सालापूर्वी रोमन रोलंड यांची फ्रान्समध्येंहि फारशी प्रसिध्दी नव्हती.  पॅरिसमधील नॉर्मल स्कूलमध्यें लेक्चररचें काम करावें आणि फावल्या वेळांत ग्रंथलेखन करावें हा त्यांचा व्यवसाय होता.  त्यांना पैशाची किंवा कीर्तीची हांव नव्हती.  लोकांत फारसें न मिसळतां एका बाजूला राहून आपला ग्रंथलेखनाचा उद्योग चालवावा एवढाच त्यांचा हेतु होता.  लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती.  प्रत्यक्ष त्यांच्या मातेंनें त्यांना संगीताचे धडे दिले होते.  संगीत आणि ललित कला यांविषयींचे सामान्य लोकांचे औदासिन्य पाहून त्यांना अत्यंत हळहळ वाटत असे.  लोकांमध्यें संगीत आणि ललित कला यांविषयीं अभिरुचि वाढविण्यांकरितां त्यांचे अहर्निश प्रयत्न चालू होते.  त्याकरीतां त्यांनी बरेचसें ग्रंथहि लिहिले आहेत.  राजकारणांतहि त्यांनी थोडासा भाग घेण्याचा प्रयत्न केला.  परंतु राजकारण कुटिल नीतीनें भरलें आहे, असे आढळून आल्याबरोबर त्यांनी त्यांतून आपलें अंग काढून घेतले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel