हिंदुस्थानांत शेंकडो जातिधर्म आहेत. पण एकच विशेष परंपरा दिसून येईल, शेंकडों प्रकारच्या जातींना त्यांच्या संस्कृति, धर्मांना एकत्र आणण्यांचें, एकरूप करण्याचें परम कर्तव्य या देशानें आज शतकानुशतकें चालविलें आहे.  पूर्वी येथे अनार्य , द्रविड होते त्या नंतर आर्य आले.  कांही दिवस भांडणे चाललीं, पण अखेर उभय संस्कृति एकरूप झाल्या.  मंथनानंतर अमृत निष्पन्न झालें ना?  तसेंच जातीजातींतील या आजच्या भांडणानंतर ऐक्याचें अमृत, एक नवीन समान संस्कृति निर्माण होईल.  हिंदुस्थानचा इतिहास हा अनेक संस्कृतींच्या मिलाफाचा इतिहास आहे.  आम्हीं भांडलों भांडलों पण अखेर एक झालों.  हिंदुमुसलमानांच्या मोठमोठया लढाया ब-याच झाल्या असतील, पण इतिहासांत हैदरअल्ली हिंदु देवतांना मोठमोठया देणग्या पाठवीत असे त्याचा ऊल्लेख कुठें आहे?  हिंदुराजे मुसलमानांचे सण साजरे करीत तें कुठें लिहिलें आहे का? अकबरानें सर्वधर्मीय संस्कृति एकरूप करण्याचा प्रयत्न केलाच होता ना?  जुन्याच गोष्टी कशाला, आमच्या अमळनेरला सखाराम महाराजांच्या रथाला पहिली मोगरी मुसलमान अजूनहि देतात!  कां रे बाबा?  हिंदूंचा रथ आणि त्याला मुसलमान मोगरी देणार?  पण ही भावना त्यांच्यांत नाहीं.  जळगांवच्या मशिदीपुढें हिंदूंना भजन करण्याची विनंती तेथील मुसलमान बांधवांनी केली! का?  दोन्ही समाज एकाच देवाचीं लेंकरें ना!  चला, करा आमच्याहिं देवापुढें प्रार्थना! केवढी ही सहिष्णुता?  काय हा मनाचा मोठेपणा?  शिवाजी महाराज गोब्राह्मणांचे प्रतिपालक होते असें सांगण्यांत येतें पण शिवाजी महाराज गोरगरिबांचे प्रतिपालक होते असें आपणास इतिहास सांगेल.  त्या काळीं प्रत्येक गांवी एक गढिवाल असे.  गढिवाल म्हणजे प्रत्येक खेडयांतील सुलतान!  लोकांनी मेहनत करायची आणि त्या मेहनतींचे सर्व फल या गढिवालानें लुबाडायचें.  असलें जुलमी गढिवाल दूर करण्यासाठीं शिवाजी महाराजांचा अवतार होता.  अफजुलखान म्हणजे तरी कोण?  अनेक गांवाचा गढिवाल.  अनेक गढिवालांचा एक गढिवाल.  चंद्रराव मोरेहि तसाच.  शिवाजींने क्रांति केली पण कां केली व कशी केली हें पाहिलें पाहिजे.  बहुजनसमाजाच्या सुख-दु:खनिवारणासाठीं बहुजन समाजाच्या मदतीनें शिवाजी लढला - शिवाजींने क्रांति केली.  शिवाजींचें राजकारण धार्मिक नव्हतें, आर्थिक  होतें.  स्पेन दोन वर्षे असाच लढला.  नादिरशहास हांकलून लावण्यासाठीं बाजीराव दिल्लीच्या बादशहाच्या मदतीस धांवला!  का?  आपल्याच देशांत माळव्यांत तो बादशहाविरुध्द झगडत नव्हता का?  पण नादीरशहा परका-ति-हाईत दरोडेखोर! त्याच्या विरुध्द बादशहास मदत करण्यास तो दिल्लीस धांवला.  त्यास नसतें का, दोन्ही मुसलमान आहेत.  झगडूं दे आपआपसांत, असें म्हणता आलें? पण नाहीं.  परके लुटारूच  आपले पहिले शत्रु!  बादशहांचे उद्या बघून घेऊं ही बाजीरावाची वृत्ति समंजसपणाची नव्हती काय?  आज व्हाइसरॉय आपल्या जातीय मतभेदांकडे अंगुलीनिर्देश करतो आहे.  ही  संधि त्याला कां मिळावी ?  धर्माच्या प्रश्नापुढें बहुजन एक होतो.  हिंदु आणि मुसलमान किंवा स्वजन आणि परजन अशी फाळणीं करूं नका.  भांडवलवाले आणि गरीब ; सुजन आणि दुर्जन हेंच वर्गीकरण बरोबर आहे.  लुटतो कोण?  भांडवल वाले,  पैसेवाले - लुटल्याखेरीज का कोणी श्रीमंत होते? तेव्हां सुजन एक होऊं या! हे सारे प्रश्न तुम्ही पडताळून पहा.  कोणत्या तत्त्वावर कोण कसे एक होतात तें पहा.  धर्मावर एक होत नाहींत.  भाकरीच्या प्रश्नावर एक होतात.

आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे पाहूं या! आज रशियाखेरीज एकहि देश खरा लोकशाहीवादी नाहीं.  इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेंत लोकशाही आहे म्हणे  पण कसली लोकशाही?  बॉम्ब टाकणारी, नाहीं तर दुसरी कसली ? आज पोलंडच्या स्वातंत्र्यासाठीं, लोकशाहीसाठीं इंग्लंड झगडा खेळतें पण हिंदुस्थानांत काय करते?  फ्रान्सनें आपला प्रजापक्ष हाणून पाडलाच ना? अमेरिका जपानला चीनविरुध्द - एका स्वातंत्र्यरक्षणासाठीं झगडणा-या राष्ट्राविरुध्द लढाऊ विमानांची मदत करतेच कीं नाहीं?  जगामध्यें आज लोकसत्ता नाहीं.  श्रीमंत आणि गरीब यांचेमधील झगडयावर आजवर मग चाललें आहे.  समाजाचे हेच शास्त्रीय विभाग आहेत.  बाकी विभाग  कृत्रिम आहेत.  जगांत विभागणी केव्हा व कुठें होते?  चीन व जपान यांचे धर्म एकच आहेत, पण चीनविरुध्द जपान उठलाच ना!  अमेरिकाहि मिळाली त्याला! त्यांचा धर्म का एक होता?  होय, आर्थिक धर्म मात्र एकच होता लुच्च्यांचा! लुटण्याचा! लुटणारे आज एक होत आहेत.  संयुक्त प्रांतात सारे जमीनदार मग ते हिंदु असोत, मुसलमान असोत, नाहीं तर दुसरे कोणी असोत एक होत आहेत.  लुटणारे एक होत आहेत, तर आपण लुटले जाणारे एक होऊं या.  रेडिओनें सारें जग एकत्र जवळ आले आहे.  तर आपणांस एक होण्याला काय अडचण आहे? आपणाला आघाडीवर राहायला हवें आहे.  आपण आपसांत फाटाफुटीला वाव देतां कामा नये.  खानदेशांत गिरणी कामगारांचा संप झाला तेव्हां मालकानें फाटाफुटीचा प्रयत्न कसा केला माहीत आहे?  खानदेश व सोलापूर अशा दोन ठिकाणच्या कामगारांत तो तसला भेद माजविण्याचे त्यांचे प्रयत्न चालू झाले.  पण कामगार कुठला कां असेना, काय फरक असतो त्याच्या राहणींत, त्याच्या दारिद्रयांत, त्याच्या पिळवणुकींत?  झगडया-झगडयांतून नव संस्कृतीची निर्मिति ही हिंदुस्थानची परंपरा आहे.  नदी पवित्र मानली जाते.  का?  तर तिच्यांत निरनिराळया ठिकाणचे प्रवाह एकत्र वहात असतात.  सर्व प्रवाहांचे एकरूप एकजीव झालेला असतो नदींत.  समुद्र नदीहून पवित्र मानला जातो. कां? तर त्यांत अनेक नद्यांचा सांठा एकत्र येतो, एकत्र मिसळून जातो.  मानव नदी, मानव समुद्रहि असाच पवित्र नाहीं का?  निरनिराळया धर्माचे, निरनिराळया जातींचे प्रवाह अखेर एक.  एका मानव-जातींत समावलें जातात - तो मानव समुद्र महत्त्वाचा नाहीं का? पवित्र नाहीं का? या मानव समुद्रांत विद्यार्थांनी आलें पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel