अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥
ही तिची थोर प्रतिज्ञा आहे. अशी ही महान् निर्मळ काँग्रेसमाता २६ जानेवारीचा स्वातंत्र्यदिन पाळावयास सांगत आहे.
उद्यांचे स्वातंत्र्य सर्वांचे आहे. म्हणून गरीब श्रीमंत, हिंदुमुसलमान, स्पृश्यास्पृश्य सारें या; वृध्द या, तरुण या; स्त्रिया या, पुरुष या ; विद्यार्थी या, शिक्षक या, तिरंगी झेंडयाखालीं येऊन महान् भारत मातेस प्रणाम करून तिला स्वतंत्र करण्याची आणभाक घेऊं या.
२६ जानेवारी म्हणजे येता शुक्रवार. त्या दिवशींच्या उगवत्या सूर्यांचे घरोघर लाखों तिरंगी झेंडे उभारून स्वागत करा. हजारों इन्द्रधनुष्यांची भूतलावर प्रभा पसरून स्वर्गीचे देव सोहळा पहावयास खाली येवोत. आधीं ४ दिवस गल्लीगल्लींतून घरोघर जाऊन २६ तारखेस राष्ट्रीय झेंडा लावा अशी हात जोडून प्रार्थना करा. २६ जानेवारीस सकाळी प्रभातफे-या काढा. हरिजनांस प्रेम द्या. स्नेहसंम्मेलनें भरवा. खादी खपवा. एकत्र येऊन सूत कांता. विद्यार्थी व कामगार यांनी दहा दहाच्या तुकडया करून तालुक्यांतील ५० तरी गांवी स्वातंत्र्यदिन साजरा करून यावें. तालुक्याच्या मुख्य ठिकाणीं सभा ठेवावीं. पोवाडे, संवाद ठेवावे स्वातंत्र्याच्या निनादानें हिंदुस्थान दुमदुमवा. महात्मा गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयांत व्हाइसरायांकडे गेले तर २६ तारखेच्या या विराट सामर्थ्यांने जाऊं देत. ही २६ तारीख म्हणजे आपली शिस्त, संघटना व सामर्थ्यं यांचे गंभीर दर्शन. ही गोष्ट लक्षांत ठेवून उठूं या सारे.
वन्दे मातरम् ।
-- वर्ष २, अंक ४१