२८ तारखेस नवीन वर्किंग कमिटी भरेल व २९ तारखेस ऑ. इं. काँ. कमिटी भरेल. अनेकांचे अनेक ठराव येणार आहेत. कम्युनिस्ट मंडळी 'महायुध्द सुरूं झालें तर कोणतें धोरण असावें' याविषयी ठराव आणणार आहेत. प्रो. रंगा वगैरे किसान कार्यकर्तें करावी, फैजपूर वगैरे ठिकाणी पास झालेला जनता कार्यक्रम, किसान कामगार कार्यक्रम मंत्रिमण्डळानें अधिक त्वरेने व तीव्रतेने अंमलांत आणावा, राष्ट्रीय मागणीच्या त्रिपुरीच्या ठरावास येरव्हीं जोर असणार नाहीं, अशा अर्थाचा ठराव आणणार आहेत. काँग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमण्डळांनीं मुसलमान व अल्पसंख्यांक या बाबतीत कसे धोरण ठेवलें याची चौकशी करणारा ठराव येणार आहे. अशा अनेक ठरावांच्या नोटिसा मिळाल्या आहेत. कलकत्त्याच्या २८/२९ तारखेस होणा-या घडामोडींकडे राष्ट्राचे लक्ष लागून राहिलें आहे. परिषदेची तयारी होत आहे. बंगाली प्रेक्षकांनी गडबड करूं नये, शांत रहावें अशी राष्ट्रपतींनी इच्छा व्यक्त केली आहे. बंगाली लोक दंगल माजवतील, म्हणून सभेच्या वेळेस प्रेक्षकांस येऊं देऊं नये असें कोणी सुचवीत आहेत. सुभाषचंद्रांचा याला विरोध आहे. परिषदांचे काम कसें चालतें तें पाहून जनतेला शिक्षण मिळतें. कोणी गडबड केल्यास त्यांना जा सांगण्याचा हक्क आहेच. परन्तु आधींपासून प्रेक्षकांस बंदी करूं नये.'' असें त्यांचे म्हणणें आहे. हा सर्व कारभार यशस्वी होवो, राष्ट्रांस नीट मार्गदर्शक होवो, क्षुद्र वैयक्तिक भेद गंगेत वाहून जावोत व नवीन झगडयासाठी राष्ट्र एका आवाजानें उठून उभे राहो, दुसरें काय?
- वर्ष २, अंक ३