३४ हिंदुमहासभावाले

जळगांवचे कांहीं हिंदुमहासभावाले वकील अंमळनेरला येऊन काँग्रेसला शिव्या देऊन कृतार्थ होऊन परत गेले.  या वकिलांनी या सभेत जीं भाषणे केलीं ती ऐकून त्यांच्या पोरकटपणाची कींव येत होती.  त्यांच्या भाषणांतील मुद्दे पुढीलप्रमाणें होते.

(१)  शिवाजी महाराजांनी २० वर्षांत स्वराज्य मिळविंले.  महात्मा गांधींना अद्याप २० वर्षांत मिळवितां आले नाहीं.
(२)  सोवळीं नेसून दुस-या बाजीरावानें स्वराज्य घालविलें, मिळविलें नाहीं.  त्याप्रमाणें लुंग्या नेसून स्वराज्य मिळत नसतें.  महात्माजींची लुंगी म्हणजे सोवळयांचाच प्रकार.
(३)  पं.जवाहरलाल नेहरू मारे शर्टवरून जाकीट घालतात.  ते शिवाजी महाराजांस नांवे ठेवतात.  जाकीट घालून अधिकार येत नाहीं.
(४)  सं. प्रांतात पहा मुसलमानांना किती सवलतीं.  हिंदूंकडे कोणी पाहील तर शपथ!
(५) नेहमींप्रमाणें  मुसलमानधार्जिणी काँग्रेस वगैरे.
(६)  मुसलमानांचे अत्याचार वगैरे.

अशा अर्था चीं ती भाषणें होतीं.  त्या पोरकट भाषणांस उत्तर देणें म्हणजेहि कमीपणा.  परंतु मुलांची व वरवर विचार करणा-यांची दिशाभूल होते म्हणून थोडें लिहितो.

(१)  शिवाजी महाराजांनी २० वर्षांत स्वराज्य स्थापिलें.  त्यांना ही शक्ति कोणी दिली? कशी मिळाली?  त्यांनी जनतेचा कार्यक्रम हातीं घेतला.  जुने सरदार जहागिरदार त्यांना विरोध करावयास उभे राहिले.  शिवाजी महाराजांनी त्यांना दूर केलें.  जनतेच्या गवताच्या काडीसहि हात लावूं नये;  जनतेनें पोटच्या पोराप्रमाणें वाढविलेलीं झाडें, त्यांची फळें कोणी नेऊं नये असे हुकूम सोडले.  खायला न मिळणा-या शेतक-यांची बाजू शिवाजींनें घेतली.  कोणास जहागिरी दिली नाहीं;  गढीवाले दूर केले.  जनतेचें शेतक-यांचे राज्य स्थापिलें.  जनतेतूनच नवीन शूर सेनानी त्यांना मिळाले.  क्रान्ति तेव्हा करता येते, जेव्हा लुबाडणा-यांस दूर करून जनंतेची बाजू घेतली जाते.

आजहिं क्रांति करतां येईल.  परन्तु जनतेची, श्रमणा-या जनतेची बाजू घेतली पाहिजें.  परन्तु काँग्रेसने साधा कुळकायदा आणला, साधें कर्जनिवारण बिल आणलें, तरी तुम्ही हिंदुमहासभावालें ओरडतां.  तुमचीं पत्रें ओरडतात.  महात्माजी स्वराज्यासाठीं जनता उठावीं म्हणून तिचे प्रश्न सौम्यपणे व मर्यादेने  घेतात तरीहि तुम्ही त्यांच्याविरुध्द ऊठतां.  मग शिवाजी महाराजांप्रमाणें गरिबांच्या आड येणा-या सर्वांस सफा करावयाचें कोणीं ठरवलें तर काय म्हणाल?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel