जपानांतील कागदांचे कारखाने फारच प्रसिध्द आहेत.  कांही कांही कागद तर इतके चिवट असतात कीं, कमावलेल्या कातडयांऐवजीं या कागदांचाच उपयोग करतात.   मेण-कापड, कांचेचीं भांडीं, पंखे, रबरी व कचकड्याचीं खेळणीं, आगपेटया, कापूर, धातूंची व चिनई मातीचीं सुंदर भांडी या बाबतीत जपान अग्रेसर आहे.   रेशमाचा व्यापारहि फार आहे.  अलीकडे हिंदुस्थानांतून कापूस वगैरे जाऊन जपान दुसरें इंग्लंडच होऊ पहात आहे.  मोत्यांचा व्यापारहि - कृत्रिम मोत्यांचा - अलीकडे सुरू झाला आहे.  जपानी लोक हुषार व कष्टाळू असल्यामुळें त्यांनी औद्योगिक क्षेत्रांत विलक्षण प्रगति घडवून आणली आहे.  खेड्यापाड्यांतील घरधंदे त्यांनी बुडविलें नाहींत.  जपानांत यंत्र व हात यांचे मोठें सहकार्य आहे.

जपानांत वरचेवर भूकंप होतात, यास्तव घरें दगडधोडयांची बांधीत नाहींत.  कारण अशीं घरें वरचेवर बांधणें कठीण आणि अंगावर घर कोसळलें तर चक्काचूर व्हावयाचा.  जपानांतील घरें बांबूंची असतात.  जपानांत बांबू मोठमोठे ७/८ इंच जाडीचे होतात. ते वजनाला हलके असतात पण भक्कम असतात.  छप्परहि जपानांतील बांबूंच्या कांबट्यांचे व घरांच्या भिंतीहि या कांबट्यांच्याच.  घरें वरतीं पेंढयानें शाकारलेली असतात.  पत्रें व कौलें घरांवर नाहींत.  ज्या भागास थंडी फार तेथे या कांबटीच्या भिंतीस आतून गिलावा करतात.  आपल्याकडे घर बांधतांनाच जितक्या खोल्या वगैरे लागतील तितक्या बांधून ठेवाव्या लागतात;  परंतु जपानांत तशी जरूरी नसते.  एकाद्या घरांत सकाळीं तीन खोल्या असतात तर सायंकाळीं चार होतात; चाराच्या पुन्हां दोन होतात!  कळकाचें पार्टींशन घातलें कीं झाली नवीन खोली-तें काढलें कीं, मोडली खोली!  पाहुणा आला तर एकदम नवीन खोली निर्माण होते.

घरांतील जमीन सुध्दां बांबू ठेचून घालून केलेली असते.  जमिनीवर चटया आंथरतात व बसण्यास गाद्या व टेकण्यांस तक्के लोड असतात.  घरांती जमिनीवर आंथरलेली चटई स्वच्छ व मृदु असते.  जपानी लोक टापटीप व स्वच्छता  यांचे फार भोक्ते. घरांत येतांना दाराशीं जोडा काढून ठेवतात व घरांत कॅन्व्हासचा किंवा जाड कापडाचा जोडा वापरतात.

झोपतांना दिवा जळत ठेवतात.  अंधारांत झोंपणें अभाग्याचें मानतात.  एक कागदाचा चौकोनी डबा म्हणजेच हा दिवा.  ह्यांत एक वाटींत तेल वात घालून तेवत ठेवतात.  जपानी लोकांना बागांची फार हौस.  प्रत्येक घराजवळ बाग असतेच.  शिवाय शहरांतून व इतरत्र मोठमोठया बागा असतात.  कधीं कधीं शहरांपासून दूर रमणीय भागी बागा करतात.  व त्या पहावयास हजारों लोक देशी, विदेशी जातात.  या बागा तयार करण्यांत जपानी लोकांची कल्पकता चांगलीच दृष्टीस पडते.  या बागांतून कृत्रिम टेंकडया करतात;  त्यांच्यापासून पाण्याचा प्रवाह नदीसारखा आणतात.  -- या नदीला वाटेंत धबधबे करतात; नदीमध्यें बेटें करतात, पूल बांधतात! बागेंत कारंजी असतात; चित्रविचित्र फुलें असतात.  जपानांत फुलें फार.  बागेंत लहानसें बुध्दाचें देऊळ व पुतळा असतो!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel