चित्र :-- या एका चित्रांत दोन भाग आहेत.  या इकडे बाजारांत माळणी भाजी विकण्यास बसल्या आहेत.  एक पोलिस येऊन त्यांची भाजी खुशाल उचलीत आहे.  परन्तु या दुस-या चित्रांत बघा.  एक माळीदादा हातांत कागद-पेन्सिल घेऊन उभा आहे.  तो पोलिसांस नांव विचारीत आहे.  पोलिस हात जोडीत आहे.  ही खरी गोष्ट आहे.  पोलिस पुन्हां माळणीस त्रास द्यायला आला नाहीं.  त्या माळणी माळयाला म्हणाल्या, 'तूं काय मंत्र म्हटलास? तें भूत आतां येत नाही.'  माळी म्हणाला, 'ज्ञानाचा मंत्र, नांव टिपतो म्हणतांच पळाला.'  तुम्हीहि लिहायला शिका.  ज्ञान म्हणजे देव.  तो जवळ असला म्हणजे भीति नाहीं.  शिकलेला मनुष्य सर्वत्र जाईल.  आपणाला सर्वत्र भीति.  शिका म्हणजे निर्भय व्हाल.

चित्र :-- या चित्रांत ही बाई आहे.  ती घरचें पत्र दुस-याकडून वाचून घेत आहे.  मग ओशाळली आहे.  आपल्या घरांतील भानगडीं दुस-यास कळल्या म्हणून तिला लाज वाटत आहे.  परन्तु तिला स्वत:ला लिहितां वाचतां येत असतें तर घरची अब्रू घरांत राहती.  अडाण्याची अब्रू जगांत रहात नाहीं.  अब्रूसाठीं तरी शिका. 

चित्र :--  ही बाई दु:खी आहे.  तिचें मूल डोळे चोळून ओरडत आहे.  का बरें?

या पहा दोन बाटल्या.  एकींत जखमेवर लावावयाचे औषध आहे.  त्याला ऑयोडिन म्हणतात.  दुस-या बाटलींत डोळयांचे औषध आहे.  बाटल्यांवर चिठया आहेत.  परन्तु बाईला वाचता येंत नाहीं.  तिनें ऑयोडिन डोळयांत घातलें.  डोळयांची आग होऊन मुलगा रडत आहे.  मुलाचा डोळा फुटला तर कोण जबाबदार? पदोपदीं लिहिण्यावाचण्याविना अडतें.

चित्र :-- एका खेडयांतील शेतक-याकडें हा पोष्टमन् मनिऑर्डर घेऊन आला आहे.  तो त्याला विचारतो, 'सही येते का? ' शेतकरी म्हणतो, 'नाही ' 'मग साक्षीदार आण.'  पोष्टमन् म्हणतो, साक्षीदार त्या वेळेस मिळत नाहीं.  पोष्टमन् त्यावेळेस मनिऑर्डर देत नाहीं.  पुन्हां आठ दिशीं येईन म्हणतो.  घरांत बायको आजारी असते.  मुलगा पोष्टमन्ला हात जोडतो, म्हणतो.   'आईसाठीं दे.'  परन्तु पोष्टमन् जातो.  पहा हा परिणाम.  पैसे येऊनहि मिळत नाहींत.  अज्ञान दूर करा.

चित्र :--रेल्वे स्टेशनचा देखावा.  हे पंढरपूरला जाणारे एका खेडयांतील शेतकरी.  एक शेतकरी एका सुशिक्षितास हे तिकिट पंढरपूरचें का विचारतो आहे, तो होय म्हणतो.  शेतकरी विचारतो, 'किंमत काय? '  तो म्हणतो, '४॥  रुपये. 'शेतकरी म्हणतो, 'आमच्याजवळून ४ रुपये ११ आणे घेतले.  आम्हीं मास्तरला विचारलें, तिकीट का वाढलें? तो म्हणाला तिकीटाचे पैसे आषाढी एकादशीस वाढतात.'  तो सुशिक्षित म्हणाला, 'एकादशीला रताळीं, शेंगा, खजूर, यांचा भाव वाढतो.  रेल्वे तिकिटाचा कसा वाढेल?' शेतकरी म्हणतो, 'आम्हाला काय कळे? ' अशी अज्ञानानें फजीति होते.  स्टेशन कोणतें आलें कळत नाहीं.  तिकिट कोठलें आहे, त्याची किंमत काय आहे, तें समजत नाहीं.  गाडी कोठे जाणारी हें वाचतां येत नाहीं.  अज्ञानामुळें मनुष्य परावलंबी होतो.  फजित होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel